*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.दक्षा पंडित लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रकाशपर्व*
*षडाक्षरी*
भारतीयत्वाचा
आम्हा आहे गर्व
दिवाळीचा सण
प्रकाशाचे पर्व……१
तमास भेदण्या
दिव्यांची आरास
दिवाळी म्हणजे
चैतन्य,उल्हास……२
आकाश कंदिल
टांगला नभात
दिवाळी स्वागता
रांगोळी दारात……३
आरास दिव्यांची
रम्य, मनोहर
प्रकाश किरणे
दिसती सुंदर….४
आरास दिव्यांची
उत्साह, चैतन्य
दीपावली येता
मन हे प्रसन्न…..५
दीपावली येता
चाले लगबग
विविध दिव्यांची
पहा झगझग…….६
दिवाळीत दिसे
लख्ख रोषणाई
आतिषबाजी ची
किती अपूर्वाई……७
आकाश कंदिल
शोभतो नभात
दिव्यांची झळाळी
साठली नेत्रात…..८
देव्हारी उजळे
ज्योतीचा प्रकाश
सान तेलवात
जळे सावकाश……९
दिवाळीत लावू
दीप ह्रदयात
सर्वांंप्रति माया
स्नेह अंतरात……१०
पणती आशेची
लावूया घरात
निराशेची हार
उत्साह मनात……११
एक दिवा लावू
वंचितांच्या घरी
पावू समाधान
हास्य मुखावरी…..१२
एक ज्योत लावे
अनंत दिव्यांना
माया,प्रेम,स्नेह
देवूया सर्वांना…..१३
*डॉ दक्षा पंडित*
दादर,मुंबई