मालपे येथे आठ वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, मुलगा गंभीर
देवगड तालुक्यातील मालपे येथील ऋत्विक निलेश जुवळे (वय वर्ष आठ, रा. मालपे पोंभूर्ले) या चिमुकल्याला चार मोकाट कुत्र्यांनी अडवत त्याच्या हाताला व अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी चावा घेतला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ऋत्विक सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून शेजारच्या मळ्यात जात असताना समजीसकरवाडी येथे चार मोकाट कुत्र्यांनी त्याला आडवले आणि त्याच्या शरीराच्या विविध ठिकाणी चावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ऋत्विकने जोरजोरात आरडा ओरडा केला, ज्यामुळे बाजूलाच असलेल्या घरातील मंडळी धावत आली आणि त्याची सुटका केली. मात्र, कुत्र्यांनी त्याला अनेक ठिकाणी चावा घेतल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.
ऋत्विकला तातडीने फणसगाव येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या गंभीर जखमा पाहता, अधिक उपचारासाठी त्याला सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज ओरोस येथे हलवण्यात आले आहे.