गत काही दिवसांपासून व्हाट्स अॅपने येत्या ८ फेब्रुवारी २०२१पासून आपल्या धोरणांत बदल करणार असल्याचे जाहीर केले आहे़ नव्या धोरणांनुसार व्हाट्स अॅप वापरकर्त्यांची संपूर्ण माहिती फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियांवर शेअर करणार आहे़ यावर देशातील व्यापारी संघटनेने आक्षेप घेतला असून, व्हाट्स अॅपच्या मनमानीला रोखा अन्यथा केंद्र सरकारने फेसबुक, व्हाट्स अॅप आणि इंस्टाग्राम कंपन्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
व्हाट्स अॅप कंपनी आपली पालक कंपनी फेसबूकबरोबर ग्राहकांची माहीती शेअर करणार आहे. तसे करण्यापासून व्हाट्स अॅप कंपनीला प्ररावृत्त करावे अन्यथा या कंपन्यांवर बंदी घालावी, अशी मागणी व्यापा-यांच्या संघटनेने केली आहे.कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स(कैट) या संघटनेने असा दावा केला आहे की व्हाट्स अॅपच्या नव्या धोरणानुसार ग्राहकांची वैयक्तिक माहिती व्यवहाराची माहिती संपर्क होत असलेल्या व्यक्ती, ठिकाण आणि इतर माहिती दोन्ही कंपन्यात परस्परादरम्यान वारणार आहेत. संघटनेने माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, असे करण्यापासून व्हाट्स अॅपला रोखावे अन्यथा या कंपनीवर बंदी घालावी.
देशात २० कोटी वापरकर्ते
फेसबुकचे भारतामध्ये २० कोटी वापरकर्ते आहेत. जर या माहितीचा दुरुपयोग झाला तर अर्थव्यवस्थेवर आणि देशाच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. मात्र व्हाट्स अॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्ही पारदर्शकता वाढावी़ याकरिता नवीन धोरण जाहीर केले आहे. मात्र ज्या ग्राहकांना हे धोरण मान्य नसेल त्यांना व्हाट्स अॅप बंद करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
टाटाच्या नोकरदारांना सूचना
व्हाट्स अॅपच्या नव्या धोरणाचा धसका आता देशातील कंपन्यांनीही घेतला असून, टाटा स्टीलने आपल्या सर्व नोकरदारांना कंपनीसंदर्भातील कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती व्हाट्स अॅपवर शेअर न करण्याचे आदेश दिले आहेत़