छत्रपती संभाजीनगर :
पिसादेवी रोड हर्सूल येथून जवळच असलेल्या भोलेनाथ नगर येथे कु.स्वामींनी हिच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाची सुंदर आणि चविष्ट रंगत व सोबत कवितेची संगत असल्याने या वाढदिवसाच्या सोहळ्याला उच्चतेचे वलय प्राप्त झाले होते. या काव्य मैफिलीत परिसरातील बहुसंख्य रसिक उपस्थित असल्याने मैफिल अतिशय उत्साहात पार पडली. महिला वर्ग जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होता त्यामुळे नात्याच्या व सामाजिक कवितांच्या सादरीकरणाने मैफिलीत एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता. या मैफिलीसाठी साहित्यिक मेळ्यातील कवी, लेखक आदरणीय विजयकुमार रामराव पांचाळ यांनी बहारदार असे सूत्रसंचालन करून रसिक वर्गाला उत्साही ठेवले, आणि प्रत्येकाच्या रचनेला भरभरून दाद दिली. या मैफिलीमध्ये ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती होते असे कवी डॉ. सुशील सातपुते यांनी ‘बाप्पा’ हि कविता सादर करून मार्मिक भाष्य केले. कवी विजय कुमार पांचाळ यांनी ‘वंशाचा दिवा’ हि कविता सादर करून “मुला पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी” या उक्तीला जिवंत करण्याचा अतिशय मार्मिक प्रयत्न केला. कवयित्री सुनिता कपाळे यांच्या सुमधुर आवाजात सादर झालेल्या ‘लेक’ या कवितेच्या माध्यमातून स्वामीनी या गोड बाळाला हिला वाढदिवसाची काव्यमय शुभेच्छारुपी अविस्मरणीय भेट मिळाली. कवी रोहिदास शिखरे यांनी ‘ओवीबद्ध कविता’ व ‘पाळणागीत’ अशा स्वरूपात कविता सादर करून मुलगा व मुलगी यातील वैचारिक भेद कमी करण्याच्या भावनिक प्रयत्न केला.कवी दिपक नागरे यांनी प्रेमकविता सादर करून तरुणाईच्या अंत:र्मनाला साद घातली. कवी संदेश वाघमारे यांचा पहाडी आवाज सर्वच रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. तसेच कवी सागर कोलते यांच्या, गाढवात तुमच्यात काही फरक नाही या विनोदी कवितानी काव्य मैफिलीला हास्य मैफिलीचे स्वरूप प्राप्त करून दिले.
या सर्व साहित्यिक समूहाकडून स्वामींनीला सुंदर अशी भेट देण्यात आली. या परिसरावर ग्रामीणतेचा प्रभाव असल्याने रसिक खूप दर्दी स्वरूपाचे मिळाले. यामुळे कविता सादर करतांना सर्वच मान्यवर कविंचा आनंद द्विगुणित होत होता. अशी ही बहारदार काव्य मैफिल मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करणारे श्री.प्रमोद बाबासाहेब वाघ व त्यांच्या सौभाग्यवती शीतल ताई प्रमोद वाघ यांच्या या नवख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून खूप मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. शेवटी स्वादिष्ट भोजनाने काव्य मैफिलीची सांगता करण्यात आली. आपण सुद्धा आपल्या परिसरात वाढदिवसाचा निरर्थक खर्च करण्यापेक्षा अशा काव्य मैफिलीचे आयोजन करावे, असे आवाहन काव्यमैफिलीने केले आहे.