You are currently viewing दिवाळी: नवे अन्वयार्थ…

दिवाळी: नवे अन्वयार्थ…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*दिवाळी: नवे अन्वयार्थ…*

 

इंजि. प्रमोद गायकवाडांचा असाच दिवाळीच्या

आठ दहा दिवस आधी फोन आला. सोशल नेट

वर्किंग संस्थेमार्फत ते आदिवासी खेड्यांमध्ये जिथे तीव्र पाणी टंचाई आहे अशा खेड्यांमध्ये

लोकसहभागातून विहिरी खोदून आदिवासींच्या

घरांपर्यंत नळाने पाण्याची व्यवस्था करून देतात. ह्या संस्थेचे काम इतके चांगले आहे की नाशिक शहर ते महाराष्ट्रातून ते परदेशातूनही

लोक स्वेच्छेने त्यांना मदत करतात. आम्ही कुटुंबियही त्यात सक्रिय सहभागी असतो.

 

दिवाळीच्या आधी आठ दहा दिवस मग अनेक

डॅाक्टर्स व दानशूर, आदिवासींसाठी जीवनावश्यक वस्तूंपासून ते फराळा पर्यंत, वह्या

पुस्तकेही जमा करून एके दिवशी त्या गावी जाऊन त्यांची दिवाळी आधी साजरी करतात

व नंतर आपली. त्या दिवशी त्या गावात सडा

रांगोळ्या वाजंत्रीसह दिवाळी असते. आदिवासी

त्यांचे पारंपारिक नृत्य सादर करत पाहुण्यांचे

स्वागत करतात. खूप खुश असतात. पाहुण्यांना

आदिवासी पदार्थांचे जेवण असते. तेथील शाळा

व शिक्षक सारे वाटप करतात.एकूणच त्या उंच

डोंगरावरच्या आडवळणी गावात आनंदी आनंद

असतो. देणारे व घेणारेही खुश असतात. घरपोच

पाण्याबरोबर घरपोच फराळाचाही आनंद प्रत्येक चेहऱ्यावर दिसतो. फटाके दिले जात नाहीत. फटाके म्हणजे पैशांची राख करणे, जो

इतरांना अत्यंत दुर्लभ असतो.

 

हे एक उदा. मी तुम्हाला दिले. दिवाळी अशा पद्धतीने, इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून, गरजूंना मदत करून साजरी करण्यात

केवढे समाधान आहे. त्यांची तुलना पैशांचा धूर

काढण्याशी होऊच शकत नाही. भारतात अशा गरजूंची संख्या फार आहे. प्रमोद गायकवाडांनी

अनेक ठिकाणी ग्रंथालये निर्माण केली. त्याचा

फायदा शेकडो विद्यार्थ्यांना होऊन या पुस्तकांच्या वाचनामुळे विविध परीक्षा पास होऊन मुलांना नोकऱ्याही मिळत आहेत व ते

त्यांच्या पायावर उभे रहात आहेत.

पारंपरिक दिवाळी साजरी करू नका असे कुणीही म्हणणार नाही.

 

शेवटी सणाचे महत्व आपण जाणतोच ना?

त्या परंपरा, पूजाअर्चा, नटणे,मुरडणे,

फराळपाणी

आपल्याला अतिशय प्रिय आहेत. तो आपल्या

मनावर रूजलेला संस्कार आहे. त्याला फाटा द्या

असे कोण का म्हणेल? त्याची गरजच नाही मुळी. ही सारी परंपरा सांभाळून वास्तवाचे भान

ठेवत आपण आगळी वेगळी दिवाळी का साजरी

करू नये? उदा. आम्ही चार विद्यार्थिनी दत्तक घेतल्या आहेत. त्यांच्या शाळा. पुस्तकांचा, कपड्यांचा खर्च आम्ही करतो. सगळ्यांनी असंच

केलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. हा एक मार्ग

आहे एवढेच!

 

अशा प्रकारे अनाथालये, आश्रमशाळा झोपडपट्ट्या इ. ठिकाणी जाऊन आपण त्यांच्या

गरजा भागवून त्यांना मदतीचा हात देऊ शकतो.

मनात आणले तर आपण खूपकाही करू शकतो,

एवढेच मला सांगायचे आहे. हल्ली सर्वच प्रकारचे प्रदूषण इतके वाढले आहे की फटाके

वाजवून पैशांचा धूर काढणे आपल्याला अजिबात परवडण्या सारखे नाही. याचा खूप

गंभीरपणे आपण विचार केला पाहिजे.सुधा

मुर्ती मॅडम अशा गरजूंच्या गरजा ओळखून त्या

पूर्ण करतात. पैसे देत नाहीत. काय त्रूटी आहेत

त्याचा शोध घेऊन त्या पूर्ण करून देतात.

 

आपण आपल्या घरातील मोलकरणींपासून

सुरूवात करू शकतो. बाहेर जाऊन समाजकार्य

करण्याची गरज नाही. ती आपल्या घरापासून

सुरू करा. त्यांना अडचणीतून बाहेर पडायला मदत करा. उपकाराची भावना नको. स्वच्छ मनाने करा. त्यांना उभे करा. सन्मान द्या. फॅमिली

म्हणून वागवा. बघा ते जीवाला जीव देतात की नाही? तर अशा प्रकारे इतरांना उपकारक गोष्टी देऊन प्रकृतीला अपकारक गोष्टींना सहजपणे फाटा देता येऊ शकतो.

 

पणत्या घेतांना गरीबांकडून घ्या. त्यांना दोनपैसे

जास्त द्या. घासाघीस करू नका. आपल्या मूळ गावी कुणाला मदत हवी असेल तर ती करा. गरजूंना काय हवे याचा शोध घेऊन मदत केल्यास ती सार्थकी लागू शकेल. तसाच विचार

करा.मंडळी,तुम्हाला मदतीचे मार्ग माहित नाहीत

असे मला मुळीच म्हणायचे नाही. तुम्ही तुमचा मार्ग शोधून काढालंच, मी फक्त आठवण करून

दिली एवढेच. चला तर मग… लागू या कामाला,

नव्या अनोख्या मार्गाने दिवाळी साजरी करू चला. इतरांच्या जीवनात प्रकाश पेरू या चला.

ते खुश तर आम्ही ही खुश….देण्यात, त्यागात

महान आनंद असतो हे आपण नित्य अनुभवत

असतोच. होय ना?.. देण्यात खूप सुख आहे हो!

आपण निसर्ग होऊ या, आई वडील होऊ या,

गुरु होऊ या,जे सतत फक्त देत असतात, देत

असतात.. आपल्याला कर्ण होता येणार नाही,

किमान माणूस तरी व्हायचा प्रयत्न करू जो

दिवसेंदिवस आपल्यातून नष्ट होऊ पाहतो आहे.

चला तर मग.. स्वत: पासून सुरूवात करू या.

हो.. चांगल्या गोष्टींची सुरूवात स्वत: पासूनच

करायची असते, होय ना?

 

धन्यवाद…

 

जयहिंद.. जय महाराष्ट्र…

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा