*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
🪔 *आली दिवाळी*🪔
*वेध दिवाळीचे*
झाले स्वच्छ घरदार
अंगणात बाग फुले
येते थाटात दिवाळी
तिचे चैतन्य आगळे….
खरेदीची लगबग
घेऊ सुंदर दागिना
धन्यामागे भुणभुण
गडे पैठणीच आणा……
नवे कपडे मुलांना
फटाक्यांची ती रंगत
घरोघरी पाहुण्यांची
आता बसेल पंगत….
सुगंधित उटणेही
घरी करू निगुतीनं
गोडधोड फराळाचे .
गृहिणीला नसे चैन….
उभी आहे घरी बाई
धावे मन हे माहेरी
आठवणी दाटताच
डोळे टिपते पदरी …
काही समाजाची सेवा
उणे तेथेही देऊ या
घासातील एक घास
मुखी त्यांच्या भरवू या…
सजवुनी दीप ओळी
लख्ख प्रकाश उजळू
सुख समृद्धी लाभू दे
विनवते, त्या कृपाळू….।।
🪔🌺🌺🪔🌺🌺🪔🌺
*अरुणा दुद्दलवार@*✍️🙏