*सावंतवाडी विधानसभेची वाटचाल चौरंगी लढतीकडे*
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात चर्चेचा आणि रंगतदार लढत होण्याची चिन्हे दिसत असलेला कुठला मतदारसंघ असेल तर तो सावंतवाडी – दोडामार्ग – वेंगुर्ला..!
या मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेचे दीपक केसरकर, उबाठाचे राजन तेली आणि आता अपक्ष म्हणून सौ.अर्चना घारे परब यांनी उमेदवारी निश्चित केली असून भाजपाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब देखील उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत असल्याने सावंतवाडी मतदारसंघ महाराष्ट्राच्या विधानसभेत अधिक चर्चेत असलेला मतदारसंघ ठरणार आहे.
सावंतवाडी मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार, राज्य मंत्रिमंडळात दोन वेळा मंत्री राहिलेल्या शांत, संयमी, नम्र आणि राजकीय सारीपटावर कोणतीही खेळी करण्यात हुशार अशी ख्याती असलेल्या नाम. दीपक केसरकर यांच्या विरोधात विरोधी पक्षाकडून एकीने लढण्याची आवश्यकता असतानाच गेली दहा वर्षे तळमळीने कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी (श.प.) गटाच्या नेत्या सौ.अर्चना घारे परब यांना डावलण्यात आले आणि अचानक उबाठाच्या नेतृत्वाने माजी आमदार राजन तेली यांना आपल्या पक्षात घेत सावंतवाडी मधून त्यांना तिकीट दिले. राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या सावंतवाडी मतदारसंघात सौ.अर्चना घारे परब यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. परंतु अचानक राजन तेली महाविकास आघाडीचे उमेदवार ठरल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या सौ अर्चना घारे परब यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत शेकडो महिलांच्या अभूतपूर्व पाठिंब्यावर महाविकास आघाडी सोबत बंड करून आपली ताकद दाखविण्यासाठी, आपला पक्ष जिवंत ठेवण्यासाठी आपण दहा वर्षे मतदारसंघात केलेल्या समाजोपयोगी कामांच्या जोरावर आज सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयात जात अपक्ष उमेदवारी दाखल केली. सौ.अर्चना घारे परब यांच्या उमेदवारी मुळे सावंतवाडी मतदारसंघात आजच्या घडीला तिरंगी लढत होण्याची परिस्थिती असली तरी भाजपच्या विशाल परब यांनी उमेदवारी दाखल केल्यास चौरंगी लढत होण्याची देखील शक्यता वाटत आहे.
सावंतवाडी मध्ये सौ.अर्चना घारे परब यांचा आज कार्यकर्ता मेळावा झाला. यामध्ये अनेकांनी अर्चना घारे परब यांना अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची विनंती केली. अचानक घडलेल्या घटनांमुळे कित्येक महिलांना अश्रू आवरणे कठीण झाले. एका महिलेला प्रतिनिधित्व मिळते म्हणून अनेक महिला मनातून आनंदी होत्या. परंतु महाविकास आघाडीने या महिलांचा आनंद हिरावून घेतला होता. आज सौ. अर्चना घारे परब यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लढण्याची उमेद दिसून येत होती. सावंतवाडीत शिवसेनेच्या वर्षा पालव व काँग्रेसच्या सत्वशिलादेवी भोसले यांच्यानंतर प्रथमच एका महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत होती. मतदारसंघात तिने बऱ्यापैकी पकड मजबूत केली होती. परंतु महिला म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती राजकीय पक्षांकडून पुन्हा दिसून आली आणि दोन वेळा मतदारसंघात पराभवाची चव चाखलेल्या राजन तेलींवर विश्वास दाखविला गेला आणि सौ. अर्चना घारे परब यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणजे जनतेच्या विचारांशी पाईक राहिलेल्या अर्चना घारे परब यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून “रडणार नाही तर मी लढणार..” हा स्वाभिमानी बाणा दाखविला आहे.
परिणामी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात होणार काय..? याच प्रतीक्षेत मतदार आहेत.