निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
:राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनी 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पध्दत्तीनेही सादर करण्याचे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) संजय घोगळे यांनी केले आहे.
निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांचे हयातीचे दाखले देताना त्यांचे नावासमोर संबंधित निवृत्तीवेतनधारकाये सध्याचा मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक व आधार क्रमांकही माहिती अद्ययावत नमूद करणे आवश्यक आहे. तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाने शासनाकडे कोणत्याही प्राधिकरणात नोकरी स्विकारलेली नाही व पुर्नविवाह केलेला नाही आदि माहिती नमूद करुन हयात दाखला बँक अधिकारी यांच्या समक्ष स्वाक्षरी करून सादर करावेत. ही मोहिम 1 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधित राबविण्यात येणार असून या कालावधित सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनी ते ज्या बँकेतून निवृत्तीवेतन स्विकारत आहेत त्या बँकेच्या शाखेत जाऊन हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी यादी मधील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी.
ज्या निवृत्तीवेतनधारकांना बँकेमध्ये उपस्थित राहणे शक्य होणार नसेल त्यांच्यासाठी ऑनलाईन पध्दत्तीने हयातीचा दाखला सादर करण्यासाठी जीवनप्रमाण https://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मनीऑर्डरद्वारे निवृत्तीवेतन स्विकारणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे हयातीचे दाखले पोस्टामार्फत घरपोच पुरविण्यात येतील. त्यांनी त्यांच्या दाखल्यावर पोस्टमास्तर अथवा शासकीय राजपत्रित अधिकारी यांची सही, शिक्का घेऊन कोषागार कार्यालयास सादर करावेत. तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी यांनी नोकर भत्त्यासंदर्भात विधी व न्याय विभाग शासन निर्णय 5 जानेवारी 2011 नुसार स्वप्रमाणपत्र कोषागार कार्यालयात सादर करावेत.
1 नोव्हेंबर पूर्वी सादर केलेले दाखले गृहित धरले जाणार नाहीत तसेच 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत हयातीचे दाखले सादर न केल्यास अशा निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन माहे डिसेंबर 2024 पासून संगणक प्रणालीद्वारे आपोआप स्थगीत करण्यात येईल याची सर्व निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.