मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
‘‘शारदोत्सव २०२४ नवदुर्गांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांमुळे नवविचारांची रूजवणच विद्यार्थिंनीमध्ये झालेली आहे. ही रूजवण म्हणजेच विद्यार्थिंनीना मिळालेली शारदोत्सवाची शिदोरी आहे.’’ असे उदगार सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित शारदोत्सव २०२४ नवदुर्गा: नवविचार ‘वेध स्त्री मनाचा’ ह्या व्याख्यानमालेत प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी काढले. सलग नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या विषयांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. पहिल्या दिवशी पाटी पुस्तक तर दूरच पण अक्षर ओळखही नसलेल्या माऊलीने आशयघन असा खजिनाच महाराष्ट्राला त्यांच्या कवितेच्या माध्यमातून बहाल केला आहे. मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या-सरळ भाषेत अतिशय मोजक्या शब्दात बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून व्यक्त केले. सदर व्याख्यान ‘प्रतिभावंत बहिणाबाई’ हे क. जे. सोमय्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सुचेता नलावडे यांनी मांडले.
‘वेदकालीन स्त्रिया’ या व्याख्यानात डॉ. गौरी माहुलीकर यांनी स्त्रीची सौम्य, स्वतंत्र, उग्र अशी अनेक रूपे अन्नपूर्णा, दुर्गा, भद्रकाली या स्त्रियांच्या उदाहरणातून दिली. ऋग्वेद काळात स्त्रीला अनेक बाबतीत स्वातंत्र्य होते. धार्मिक यज्ञयागातही स्त्रिया भाग घेत होत्या. वेदकाळात स्त्रीला स्वतंत्र अधिकार होते. असे अनेक विचार त्यांनी आपल्या व्याख्यानातून मांडले. आकाशवाणी ही भारताच्या विविध प्रदेश, भाषांप्रमाणे अनेक वेगवेगळ्या सेवा पुरविते. ‘विविध भारती’ ही या सर्व सेवांमधली एक प्रमुख सेवा आहे. सर्वात जास्त व्यावसायिक तसेच सर्वात जास्त प्रसिद्ध सेवा आहे. आकाशवाणी हे मनोरंजनाचे व माहितीचे श्राव्य माध्यम आहे. आजही उत्तम निवेदकाला आणि लेखकाला आकाशवाणीत नवनवीन संधी उपलब्ध आहेत असे विचार तिसऱ्या दिवशी आकाशवाणी कार्यकारी अधिकारी नेहा खरे यांनी ‘आकाशवाणी….संवाद संधी’ या व्याख्यानात मांडले. स्त्रीदाक्षिण्य म्हणजे नेमके काय हे कोणाला कळले असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना असे मत श्रीमती तेजस्वी बोडके यांनी चौथ्या दिवशी ‘शिवरायांचे स्त्रीदाक्षिण्य’ या व्याख्यानात मांडले. त्यांनी केसरी सिंह, सखुजीराव बाबाजी पाटील अशी इतिहासातील अनेक उदाहरणे देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्रियांविषयीची सन्मानपूर्वक वागणूक कशी होती याचे दाखले दिले.
शारदोत्सवात रूजवण ही विचारांची होणे गरजेचे आहे त्याकरिता मन सजग असणे हे गरजेचे आहे. संवेदनशीलता आणि सहवेदना हे दोन गुण असतील तरच आपण आपल्याबरोबर समाजाचाही विकास करू शकतो. आपण आपल्या भाषेचाही आदर केला पाहिजे. आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे त्याचबरोबर पर्यावरण जपणे तितकेच गरजेचे आहे. असे सजग विचार पुष्पा आगाशे यांनी पाचव्या दिवशी ‘रूजवण’ या व्याख्यानात मांडले. सहाव्या दिवशी प्रा. स्नेहा केसरकर यांनी ‘स्त्रीशक्तीचा जागर’ ह्या व्याख्यानात संतांच्या विचारांचा आढावा घेत संत एकनाथांच्या भारूडांचे सादरीकरण केले. आजही त्या विचारांची काळाला किती गरज आहे हे विद्यार्थिंनींना पटवून दिले. ‘आजची युवती स्वप्न आणि वास्तव’ या व्याख्यानात सातव्या दिवशी डॉ. वंदना निकम चव्हाण यांनी आजची स्त्री ही उद्याचे भविष्य आहे. तुमच्याकडे अमर्याद क्षमता आहे. तुम्ही जगात सकारात्मक बदल घडवून आणू शकता. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता आणि एक यशस्वी आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकता. सदर व्याख्यानात आजच्या पालकांनी आणि पाल्यानी कोणत्या विचारांची कास धरणे गरजेचे आहे असे विचार मांडले.
‘नॅशनल कॅडेट कॉरप्सच्या वर्दीपासून ते पोलीस इन्स्पेक्टरची वर्दीपर्यंतचे स्वप्न सत्यात उतरवले. एका खडेगावातील मुलीचा मुंबईपर्यंतचा प्रवास खडतर होता, परंतु प्रामाणिकपणा आणि शिकत राहण्याची वृत्ती ठेवली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. वर्दी ही एक सेवा त्या सेवेत रूजू होण्यासाठी स्वतःला सक्षम बनवा. फक्त घर नाही तर राष्ट्राची, देशाची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे. स्वतः मधले गुण ओळखा आणि त्या दिशेने स्वतःचा प्रवास घडवा’ असे विचार महिला अत्याचार कक्ष विभागाच्या प्रमुख पोलीस इन्स्पेक्टर अपर्णा जोशी यांनी ‘वर्दीतील स्त्री’ या आठव्या दिवशीच्या व्याख्यानात काढले. सध्या समाजात अनेक सामाजिक आव्हाने आहेत. समाजातील समस्यांबद्दल अधिक जागरूक होऊन एकत्र येणे गरजेचे आहे त्यासाठी स्वयंसेवी संस्था सुरू करा व त्यातून सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे हित जपा असा संदेश प्रीमस पार्टनर्स लिमिटेडच्या व्यवस्थापन व समाजधुरीणी रसिका भुजबळराव यांनी नवव्या दिवशी ‘समाजधुरिणी’ या व्याख्यानात दिला.
नवदुर्गा नवविचार ‘वेध स्त्री मनाचा’ ह्या शारदोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन मराठी विभागाने केले होते. सदर व्याख्यानमालेस महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.