You are currently viewing माजी नगराध्यक्ष संजू परब कार्यकर्त्यांसह शिवसेनेत

माजी नगराध्यक्ष संजू परब कार्यकर्त्यांसह शिवसेनेत

*सावंतवाडी मतदारसंघातील समीकरण बदलणार ; मतदारांमध्ये संभ्रम*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुका, ज्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून निवडणुकीचे तिकीट मिळवण्याकरिता पक्ष बदल होताना दिसत आहेत. यात राणे कुटुंबियांच्या नावे शंख फुंकत माजी आमदार राजन तेली यांनी उबाठाची वाट धरली तर भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी खासदार डॉ.निलेश राणे कुडाळ मालवण मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याच्या हेतूने उद्या शिवसेना शिंदेगटात प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या पक्ष प्रवेशाच्या वेळी निलेश राणे यांचे कट्टर समर्थक सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत डेरेदाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील सत्तेची चित्र मात्र बदलणार असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईक यांच्या विरोधात कोण..? असा प्रश्न विचारला जात असतानाच काही काळापूर्वी दत्ता सामंत यांचे नाव पुढे येत होते. परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे खासदार झाले आणि दत्ता सामंत यांचे नाव पुन्हा उमेदवार म्हणून ऐकू आले नाही. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि निलेश राणेंचे नाव कुडाळ मालवण मतदारसंघासाठी पुढे आले. परंतु कुडाळ मालवण मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ असल्याने निलेश राणे यांना निवडणूक लढवायची असल्यास शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यावाचून पर्याय उरला नाही. त्यामुळे उद्या निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करत असून “जिथे निलेश राणे तिथे संजू परब” असे म्हणत उद्याच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांचे कट्टर समर्थक संजू परब कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा