सांगली: बेंद्रीचा जवान आंध्र प्रदेशात अपघातात ठार, गावावर शोककळा

सांगली: बेंद्रीचा जवान आंध्र प्रदेशात अपघातात ठार, गावावर शोककळा

बेंद्री ( ता. तासगाव) चे सुपुत्र, आयटीबीपी ५३ बटालियनचे जवान सचिन जाधव (वय ३०) हे आंध्र प्रदेश येथील चित्तूर येथे झालेल्या अपघातात ठार झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी (दि.९) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

सचिन जाधव यांचे पार्थिव आज दुपारपर्यंत आणण्यात येणार आहे. दुपारनंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती तहसिलदार कल्पना ढवळे यांनी दिली आहे. जवान सचिन जाधव यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे.

तासगाव शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंद्री गावात सचिन जाधव यांचे प्राथमिक शिक्षण झाले.

पुढे १२ वी पर्यंतचे शिक्षण तासगाव येथील महाविद्यालयात घेतले. यानंतर देशसेवेसाठी २०१० मध्ये भरती झाले. सध्या आयटीबीपी ५३ बटालियन, चित्तूर आंध्रप्रदेश येथे कार्यरत होते.

कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात काही महिने बेंद्री गावी होते. लॉकडाऊन नंतर आंध्र प्रदेशमध्ये नोकरीच्या ठिकाणी गेले. ६ वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांना तीन एक वर्षाचा मुलगा आहे. तर महिन्याभरापूर्वी कन्यारत्न झाले आहे. या कन्येच्या नामकरण विधीसाठी आंध्रप्रदेशहून गावाकडे निघाले असता झालेल्या अपघातात ते ठार झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा