You are currently viewing विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती…?

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती…?

*विकासाच्या मुद्द्यावर शांतताप्रिय दीपक केसरकर यांच्या पराभवासाठी राजन तेली घेणार हाती मशाल*

 

*मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून परतणार स्वगृही*

 

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होताच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उतावीळ असलेल्या अनेकांकडून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. स्व:पक्षाने निवडणुकीचे तिकीट न दिल्याने अनेकांचे दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश होताना दिसत आहेत आणि पुढील काही दिवसात दिसत राहतीलही हे मात्र नक्कीच..! सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघ देखील याला अपवाद राहिलेला नाही. सावंतवाडी मतदारसंघातून गेले एक दशक म्हणजे तब्बल दोन वेळा ना.दीपक केसरकर यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेले आणि दोन्ही वेळेस सपशेल पराभव झालेले राजन तेली विकासाच्या मुद्द्यावर दीपक केसरकर यांच्या पराभवासाठी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून त्यासाठी शुक्रवारी १८ ऑक्टोबरला मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून हाती मशाल घेत स्वगृही परतणार आहेत.

एकेकाळी शिवसेना पक्षात असतानाच नारायण राणे यांचे उजवा हात समजले जाणारे राजन तेली यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यापूर्वीच शिवसेनेला सोडचिठ्ठी देत बाहेर पडले होते.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने भाजपवासी झालेल्या राजन तेली यांना सावंतवाडीकरांनी बाहेरचा उमेदवार म्हणून तब्बल दोन वेळा नाकारले. त्यामुळे राजन तेली यांनी सावंतवाडी शहरात स्वतःचे घर बांधून सावंतवाडीवासीय बनले. परंतु सावंतवाडी मतदार संघ महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्यास गेल्याने राजन तेली यांना भाजपमधून सावंतवाडी मतदारसंघ लढविणे अशक्य बनले होते. अशावेळी स्वतःची महत्त्वाकांक्षा प्रिय असलेल्या राजन तेली यांनी आपल्यावर निष्ठा असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना एकत्र बोलावत आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. पण भाजपामधील वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी राजन तेली यांच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याने अवघ्या दोन दिवसात राजन तेली यांनी मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला. राजन तेली यांच्या निर्णयाला जुने शिवसैनिक नक्कीच उचलून धरतील, परंतु ज्या भाजपा पक्षातून राजन तेली यांनी बाहेर पडून विधानसभा लढविण्याचा विचार केला त्या भाजपाचे कार्यकर्ते राजन तेलीना मदत करतील का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.

काही वर्षांपूर्वी दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात बंड पुकारत संपूर्ण जिल्हा हादरवून सोडला होता. त्यामुळे निवडणुकीत पराभूत होऊन नारायण राणे बॅकफूटवर गेले आणि त्याचा फायदा झाला तो विनायक राऊत यांच्या खासदारकीला आणि वैभव नाईक यांच्या आमदारकीला.. परंतु त्याच केसरकरांना मंत्रिपदापासून डावलून मातोश्रीवर चुकीची वागणूक मिळाल्यामुळे केसरकरांनी शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांची साथ धरून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मानाने मंत्रिपद मिळविले आणि महाराष्ट्रात स्वतःची ओळख निर्माण केली. मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या सावंतवाडी मतदारसंघात तब्बल तीन वेळा आमदार होऊन हॅट्रिक करणारे शांतताप्रिय, संयमी, अंगी नम्रपणा, आदरातिथ्य करण्याची वृत्ती आणि साधी राहणी यामुळे दीपक केसरकर सर्वांनाच अत्यंत जवळचे वाटू लागले. दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात जरी केसरकर नसले तरी कार्यालयातील सहकाऱ्यांकडून येणाऱ्या जाणाऱ्याचे आदरातिथ्य केले जाते. केसरकर यांना कधीही फोन लावला तरी ते फोनवर बोलतात आणि जर उपलब्ध नसले तर पुन्हा फोन करून चौकशी करतात. यामुळे केसरकर यांची जनतेशी थेट नाळ जुळलेली आहे. परंतु दीपक केसरकर यांच्यावर एकच आरोप होतो तो म्हणजे केसरकर यांनी कार्यकर्ते मोठे केले नाहीत. हा प्रश्न जरी केसरकर यांचा खाजगी प्रश्न मानला तर शिक्षण मंत्री झाल्यापासून कुठल्याही शिक्षण मंत्र्यांनी जे निर्णय शिक्षकांच्या भल्यासाठी घेतले नव्हते असे निर्णय घेत शिक्षकांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे शिक्षक वर्ग केसरकर यांच्यावर मेहेरनजर असणार हे नक्कीच..!

पूर्वीच्या सुंदरवाडी म्हणजे आत्ताच्या सावंतवाडी शहरात श्रीमंत घराण्यात जन्माला आलेले केसरकर म्हणजे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले असे म्हटले जाते. केसरकर यांचे वडील सावंतवाडीच्या राजघराण्यात नगरशेठ म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे सावंतवाडी शहरातील सुसंस्कृत, सुशिक्षित चेहरा म्हणून शहरवासीयांनी दीपक केसरकर यांना प्रत्येक वेळी संधी देत सावंतवाडीचा चेहरा कसा आहे हे अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मतदार संघाचा आमदार हा शांतता प्रिय, सुसंस्कृत, सुशिक्षित असावा अशीच इच्छा संपूर्ण मतदार संघातील मतदारांची असल्याचे मागील तिन्ही विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांच्या पारड्यात आपली अमूल्य मते टाकून विजयी केल्याचे दिसून आले आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे यांनी मैदानात उतरण्याची जय्यत तयारी केली असताना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेकडून राजन तेली विधानसभेच्या रिंगणात उतरत असल्याने महाविकास आघाडीत एकसंधता नसल्याचे दिसून येते. परिणामी सावंतवाडी विधानसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता दुणावली आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहिला असता ज्या ज्या वेळी मतांची विभागणी झाली त्या त्यावेळी दीपक केसरकर सहजपणे विजयी झालेत. यावेळी देखील मतांची विभागणी झाल्यास दीपक केसरकर यांना ही निवडणूक सोपी जाण्याचीच शक्यता जास्त आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा