सावंतवाडीतील शिल्पग्राम प्रकल्पाची तोडफोड….
संपादकीय
सिंधुदुर्ग हा तळकोकणातील निसर्गसंपन्न, सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये सिंधुदुर्गाचा केंद्रबिंदू म्हणून ओळख असणाऱ्या शहरात राजकीय हत्या, दंगली झाल्या आणि अवघ्या राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राडा संस्कृतीची ओळख झाली. परंतु सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक असं शहर आहे ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे, राजघराण्याचा उज्वल इतिहास आहे, पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराजांच्या पुण्याई मुळे सावंतवाडीची ओळख ही शांत, सुंदर, सुसंस्कृत शहर अशी आहे. त्यामुळे सावंतवाडीत तरुणाईची छोटीशी मारामारी देखील चर्चेचा विषय बनते. अनेकवर्षं सावंतवाडीतील राजकीय वर्चस्व हे शांत सुसंस्कृत लोकांचेच होते त्यामुळे शहरात शांतता नांदत होती. परंतु अलीकडेच सावंतवाडीत आलेली दबंगशाही, दादागिरी, राडा संस्कृती ही आली कोठून? त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सावंतवाडीवासीयांना पडला नाही तर नवलच….. परंतु सावंतवाडीत सुरू झालेल्या राडा संस्कृतीला सावंतवाडी वासीयच जबाबदार आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शनिवारी रात्री सावंतवाडीतील महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या व सावंतवाडी नगरपालिकेच्या ताब्यातील शिल्पग्राम प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराच्या काचा फोडण्यात आल्या. शनिवारी रात्री शिल्पग्राम मध्ये झालेल्या पार्टी नंतर झालेल्या वादातून काही जणांकडून शिल्पग्रामच्या प्रवेशद्वाराच्या काचा फोडण्यात आल्या. झाडांच्या कुंड्या उचलून फेकण्यात आल्या. येथील कर्मचाऱ्यांशी वाद घालत राडा करण्यात आला. पार्टीतील काही जणांनी ही वादावादी थांबविण्याचा प्रयत्न देखील झाला होता. परंतु काही जणांना आवरणे कठीण झाले. शिल्पग्राम हा केसरकर यांच्या कारकिर्दीतील पर्यटनदृष्टया महत्वाकांक्षी मानला गेलेला मोठा प्रकल्प आहे. गेल्या वर्षांपासून नूतनीकरण करून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या मालकीच्या प्रकल्पात झालेला हा राडा का झाला, कोणी केला, आणि ही राडा संस्कृती सावंतवाडीत आली कुठून? असे अनेक प्रश्न आज सावंतवाडीत उपस्थित होत आहेत.
सावंतवाडी पालिकेत कित्येक वर्षांनी सत्ता बदल झाला, आणि हा सत्ता बदल झाल्यानंतरच शांत असलेल्या सावंतवाडीत भाजी मार्केट, आठवडा बाजार असे वाद सुरू झाले. मटक्याच्या टपऱ्या जागोजागी उभ्या राहिल्या. त्यामुळे गैरधंद्याना वाव मिळाला, अभय मिळाले आणि त्यातूनच शहरात नसलेली, कधीही न रुजलेली, आणि सावंतवाडीने कधीही न पोसलेली राडा संस्कृती आज पाळेमुळे रोवताना दिसत आहे. या राडा करणाऱ्यांना आत्ताच ऊत का आला? त्यांना कोणाचा पाठिंबा मिळतो, कोण अभय देत? हे अनुत्तरित प्रश्न उभे राहत आहेत.
शिल्पग्राम मध्ये झालेला हा राडा तिथे बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, त्यामुळे राडा करणारे नक्कीच पकडले जातील, परंतु त्यासाठी सावंतवाडीतील नगरपालिकेच्या सत्ताधार्यांनी पोलिसात तशी फिर्याद दाखल केली पाहिजे. अशी वाढत चाललेली राडा संस्कृती जर आज पाठीशी घातली तर भविष्यात ती कमी होण्यापेक्षा फोफावत जाण्याचीच जास्त भीती आहे. त्यामुळे सावंतवाडी पालिकेची या राडा संदर्भात काय भूमिका आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण त्यातूनच भविष्यातील सावंतवाडी शहराच्या संस्कृतीचा आरसा दिसणार आहे.