*राजकीय परिस्थिती काहीही असो आपण अपक्ष लढणारच: संजू परब यांची दर्पोक्ती*
*माजी आमदार राजन तेली काय करणार..?*
सावंतवाडी
सावंतवाडी मतदार संघ कोकणातील सर्वात शांत व विचारवंतांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाचे नेतृत्व ही.हा.कै.शिवरामराजे भोसले, कै.जयानंदजी मठकर अशा दिग्गज, थोर विचारवंतांनी केलं आहे. अशा विचारवंतांनी ज्या मतदारसंघातून केवळ निवडणुकाच लढवल्या नाहीत तर मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं. त्या सावंतवाडी मतदारसंघातून बाहेरून आलेल्या आणि या विचारवंतांच्या विचारांशी विचार जुळत नसलेल्या कोणीही निवडणूक लढवू नये याकरिता सावंतवाडी मतदार संघातून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी राजकीय परिस्थिती काहीही असो आपण पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष मैदानात उतरणार, यावेळी सावंतवाडी विधानसभा लढविणारच, असा ठाम निर्धार केला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत संजू परब हे विधानसभेचे उमेदवार म्हणून आघाडीवर होते, परंतु माजी आमदार राजन तेली यांनी पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष उमेदवारी दाखल करत दीपक केसरकर यांच्यासमोर दुसऱ्यांना आव्हान उभे केले होते, परंतु मतांची फाटाफूट होऊन देखील दीपक केसरकर हे दहा हजारपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन निवडून आले होते आणि राजन तेली यांना दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला होता. दोन वेळा सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजन तेली गेली पाच वर्षे विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. परंतु गेल्या पाच वर्षात राज्यातील सत्ताधारी पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष असून देखील सावंतवाडी मतदारसंघात विकासात्मक कार्य करण्यापेक्षा राजन तेली यांनी केवळ दीपक केसरकर कसे अपयशी ठरतात हे जनतेसमोर आणण्यासाठीच नाम.दीपक केसरकर यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानली. या सर्व घडामोडी घडत असताना सावंतवाडी मतदारसंघातून आमदारकीची स्वप्न पाहणारे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी बाहेरून आलेल्या उमेदवाराला सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारी देऊ नये अशी मागणी करून राजन तेली यांच्या विरोधात मोर्चा उघडला. त्यामुळे गेली पंधरा वर्षे “मी आमदार होणारच” असे म्हणत सावंतवाडी मतदारसंघ जवळ करणाऱ्या राजन तेली यांना पुढील प्रवास वाटतो तितका सोपा राहिलेला नाही. राजन तेली हे कणकवली येथील रहिवासी असले तरी त्यांनी सावंतवाडी सारखा सुरक्षित मतदारसंघ जवळ केला आणि सावंतवाडी शहरात जागा विकत घेऊन स्वतःसाठी निवासस्थान उभे केले. परंतु सावंतवाडी शहरात ज्यांची संपूर्ण हयात गेली अशा त्यांच्याच पक्षातील विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या संजू परब यांनी राजन तेलीना सावंतवाडीकर म्हणून मांडण्यास विरोध दर्शवला त्यामुळे संजू परब यांनी अपक्ष का होईना परंतु यावेळी रिंगणात उतरणारच असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
भाजपाच्या मळगाव ग्रामपंचायत मध्ये महायुती असताना देखील नामदार दीपक केसरकर यांनी सरपंच उपसरपंच यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने संजू परब यांनी काहीही झाले तरी अपक्ष निवडणूक लढविणार असे सांगून महायुतीमध्ये सावंतवाडी मतदारसंघात काहीही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान सावंतवाडी मतदार संघ महायुतीमध्ये शिंदे गटाच्या वाटेला गेला तर महाविकास आघाडी कडून उबाठा शिवसेना उमेदवार म्हणून देखील लढण्याची तयारी राजन तेली यांनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजन तेली सावंतवाडी विधानसभेच्या उमेदवारीसाठी उबाठा शिवसेनेच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे चित्र समोर येत आहे. या संदर्भात बोलताना एका पत्रकाराने राजन तेली यांना थेट प्रश्न विचारला होता कि, माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी केसरकर यांना पराभूत करायचे असेल तर राजन तेलीच सक्षम आहेत,त्यांना उबाठा शिवसेनेमधून उमेदवारी द्यावी असे उद्धव ठाकरे यांना सांगितले. या प्रश्नावर राजन तेली यांनी मिश्किलपणे हसत धन्यवाद असे प्रत्युत्तर दिले होते. पुढे बोलताना राजन तेली म्हणाले की आपण कोणाच्याही संपर्कात नाही, वाटल्यास आपला मोबाईल चेक करा. परंतु मी दीपक केसरकर यांचा प्रचार करणार नाही. सावंतवाडी विधानसभा प्रमुख उबाठा गटाचे रुपेश राऊळ यांनी परवाच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजन तेली शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागतच करू असे म्हटले होते . त्यामुळे उबाठा शिवसेना गटाचे सावंतवाडीतील विधानसभा उमेदवार राजन तेली हेच असतील अशी खात्री ऊबाठाच्या कार्यकर्त्यांना झाली आहे.
दरम्यान, राजन तेली यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला तर, अपक्ष उमेदवार म्हणून संजू परब रिंगणात उतरणार हे निश्चित मानले जात आहे. याच पार्श्वूमीवर संजू परब यांनी तेली यांच्या पत्रकार परिषद नंतर, भाजापा कार्यालयात राजकिय परिस्थिती काहीही असो, आपण निवडणुक लढविणार असल्याचे रणशिंग फुंकल्याने सावंतवाडी विधानसभा मतदार संघात रंगतदार लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.