खळबळजनक घटना; बेपत्ता ७ वर्षीय मुलाचा सांगाडा आढळला पाण्याच्या टाकीत

खळबळजनक घटना; बेपत्ता ७ वर्षीय मुलाचा सांगाडा आढळला पाण्याच्या टाकीत

दिड महिन्यांपासून भिवंडीतून बेपत्ता झालेल्या एका सात वर्षीय मुलाचा मृतदेह एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे. भिवंडीतल्या भोईवाडा भागातल्या समरुबाग कंपाऊंडच्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी संध्याकाळी उशिरा उघड झाली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सदर ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवून दिले आहे. याबाबत पोलिसांनी नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

आहत (वय 7 वर्ष) असे मृत मुलाचे नाव असून तो 25 नोव्हेंबरला बेपत्ता झाला होता. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी शोध सुरू केला होता.

दरम्यान या परिसरात संध्याकाळी उशिरा परिसरातील काही मुले या ठिकाणी क्रिकेट खेळत होती. त्यावेळी क्रिकेट खेळताना मुलांचा बॉल पाण्याच्या टाकीत पडला आणि त्यानंतर ही घटना उघड झाली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत नागरिकांनी मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढला असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर करीत आहेत. सात वर्षीय मुलाच्या मृतदेहाचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ गाजली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा