You are currently viewing 11 ऑक्टोबर वाढदिवसानिमित्त सुपर कम्प्युटरचे जनक पद्मभूषण डॉ विजय भटकर   

11 ऑक्टोबर वाढदिवसानिमित्त सुपर कम्प्युटरचे जनक पद्मभूषण डॉ विजय भटकर   

 

आज विजय भटकर यांचा नावलौकिक संपूर्ण जगात आहे, असे असले तरी हा माणूस जसा वेळ मिळेल तसा आपल्या गावाला येतो. आपल्या गावात राहतो. गावातील लोकांमध्ये मिसळतो. त्यांचे सुखदुःख समजून घेतो आणि आपल्या परीने त्यांना मदत करतो, अनेक मुले मोठी झाली म्हणजे परदेशात जातात, पुणे मुंबईला जातात आणि आपल्या गावाला विसरतात, परंतु विजय भटकर मात्र याला अपवाद आहेत. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातील मुर्तीजापुर खेरडा रोडवरील मुरंबा या गावाला भटकर साहेबांचे आजही निवासस्थान आहे. महाराष्ट्रातील नव्हे जगातील अनेक लोकांना त्यांनी मुरंब्याला आणलेले आहे. घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी या न्यायाने ते गावासाठी काम करीत असतात. भटकर साहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ असून ते सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळतात. आपला पूर्ण वेळ त्यांनी समाजासाठी राखून ठेवलेला आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या वाढदिवसाला मुरंबाला एकत्र येतो. आमचा गजानन भारसाकळे नावाचा प्राध्यापक मित्र आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून भटकर साहेबांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात व धुमधडाक्यात साजरा करीत आहे. भटकर साहेबाला मुरंबाला घेऊन येणे. मुरंबामध्ये विज्ञान प्रदर्शनी स्नेह मेळावा आयोजित करणे हे कौशल्य गजानन भारसाकळे यांनी आत्मसात केले आहे. जेव्हा भटकर साहेबांना मी भेटलो तेव्हा त्यांची प्रत्येक आठवण माझ्या डायरीमध्ये मी नोंद केली आहे. मला आठवते खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भटकर साहेब डॉ विश्वनाथ कराड यांना घेऊन अमरावतीला आले. त्यांच्याबरोबर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर पुण्याचे योगाचार्य पाळेकर आदी मान्यवर मंडळी होती. आम्ही अमरावतीचा कार्यक्रम आटोपून मुरंबाला जायला निघालो. मुरंबाला आमच्या गाड्या पोहोचल्या:- आम्ही सर्वजण भटकर साहेबांच्या ओसरीमध्ये मध्ये बसलो. जुनाट पद्धतीचे घर होते. पाच-सहा लोक बसू शकतील एवढीच ओसरी होती. तेव्हा बिसलरी यायची होती. विश्वनाथ कराडांना तहान लागली. त्यांनी भटकर साहेबांना सांगितले. भटकर साहेब उठले. आतमध्ये गेले. विश्वनाथ कराडांना वाटले की भटकर साहेब कोणाला तरी पाणी आणावयास सांगतील. पण झाले उलटेच. भटकर साहेब स्वतः पाण्याचा ग्लास घेऊन आले. विश्वनाथ सरांना संकोचल्यासारखे झाले. ते म्हणाले भटकर साहेब कोणाला तरी सांगावे लागत होते. भटकर साहेब म्हणाले अहो मी तुमच्या बरोबर आलो आहे. कार्यकर्ते कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मंडपात आहेत. तुम्हाला तहान लागली आहे. याला त्याला सांगितल्यापेक्षा मीच पाण्याचा ग्लास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. किती ही विनम्रता. आज चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना देखील पाणी आणावयास सांगितले तर त्याचे ते कर्तव्य असूनही त्याला पाणी आणणे कमीपणाचे वाटते.. पण भटकर साहेब म्हणूनच जगावेगळे आहेत. मी पुण्याला गेलो की आठवणीने त्यांच्या भेटीला जातो.. कालही त्यांचे सहकारी श्री अनिल वाघ भेटले. भटकर साहेबांना आजकाल बरं नसते. त्यामुळे त्यांनी बाहेरचे दौरे स्थगित केले आहेत असे सांगितले. मी बिहार मध्ये गेलो. नालंदा विश्वविद्यालयामध्ये प्रवेश करण्याआधी तिथल्या सुरक्षारक्षकांनी आम्हाला अडवले. विश्वविद्यालयाचे रितसर उद्घाटन व्हायचे होते. त्यामुळे कोणालाच प्रवेश दिला जात नव्हता. त्यासाठी परवानगी घ्यावी लागत होती. डॉक्टर विजय भटकर या विद्यापीठाचे कुलपती आहेत हे मला माहीत होते. मी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरून कुलसचिवांना फोन लावला आणि त्यांना मी विजय भटकर यांच्या गावावरून आलेलो आहे असे सांगितले. परवानगीची गरज असेल तर मी विजय भटकर यांना विचारतो असे सांगितले. पण विजय भटकर या नावामध्ये सामर्थ्य आहे. सचिवांनी लगेच आमच्यासाठी गाडी पाठवली आणि रितसर आम्हाला विद्यापीठात घेऊन गेले. आम्ही विद्यापीठांमध्ये सर्वत्र फिरलो. तिथल्या ऐतिहासिक नव्याने तयार झालेल्या इमारती पाहिल्या. इतके सुंदर विद्यापीठ मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. प्रत्येक इमारत जगातील कौशल्य वापरून तयार करण्यात आलेली आहे. नुसतं सिमेंटचे डोलारे उभे केलेले नाहीत. तर प्रत्येक वास्तू जुन्या काळातील नालंदा विद्यापीठाच्या धर्तीवर उभारलेली आहे. खूप वर्षांपूर्वी मला विजय भटकर यांच्यावर पुस्तक लिहायचे होते. त्यासाठी मी पुण्याला त्यांच्याकडे गेलो. सरांनी संमती दिली आणि ते म्हणाले आपण दोन चार दिवस महाबळेश्वरला जाऊ. सोबत राहू आणि पुस्तकाचे काम करू. पण त्यांना वेळ मिळाला नाही. पण माझे हे काम माझे दर्यापूरचे मित्र श्री रामेश्वर यांनी पूर्ण केले. ते भटकर साहेबांच्या पाठीमागेच लागले. पूर्ण माहिती संकलित केली आणि भटकर साहेबांच्या वाढदिवसाला त्या पुस्तकाचे प्रकाशनही केले. प्रा.गजानन भारसाकळे यांनी त्यांना आई महोत्सवामध्ये बोलावले होते. दर्यापूरमध्ये बंडीतून श्री विजय भटकर यांची मिरवणूक निघाली ती आई महोत्सवाच्या सभा मंडपात आली. विमानात फिरणारा माणूस मरसडीमध्ये फिरणारा माणूस बंडी मध्ये आपल्या माणसांमध्ये फिरताना सुखी समाधानी दिसत होता. आजकाल आपल्या मुलांचा शास्त्रज्ञांचा परदेशात जाण्याचा सपाटा लागलेला आहे. विजय भटकर यांनाही खूप निमंत्रण मिळाली. मोठ्या कंपन्यांनी त्यांना मोठमोठ्या ऑफर दिल्या. पण त्यांची पाने मूळ या मातीशी जोडलेली आहे. त्यामुळे त्यांनी सर्व मोठ्या ऑफर धुळकावून लावल्या आणि संगणक हा भारतातल्या घराघरात पोहोचवला. त्यांच्या कंपनीचे नावच आहे डी टी एच म्हणजे डायरेक्ट टू होम. संगणका विषयी लोकांची भीती यांनी घालून टाकली. सुपर कम्प्युटर ची निर्मिती करून विजय भटकर यांनी भारताचा नावलौकिक वाढवला आहे. हा माणूस अतिशय मोठा पण तेवढा साधा आहे. मला आठवते भटकर साहेब जेव्हा जेव्हा मुरंबाला येतात तेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना भेटायला जातो. सर अगदी जेवण करत असतानाही विद्यार्थ्यांशी चर्चा करीत असतात आणि म्हणूनच त्यांचे मोठेपण त्यातून वाढत जाते. विजय भटकर यांना जी दृष्टी लाभलेली आहे त्या दृष्टीचा पुरेपूर उपयोग त्यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेला आहे. आज संगणकामुळे कितीतरी कामे सहज सुलभ झालेली आहेत आणि याचे सारे श्रेय विजय भटकर यांना द्यावे लागेल. अशा या माणसाचा आज वाढदिवस .त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा…!

डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा