You are currently viewing नवरात्र सातवी माळ….

नवरात्र सातवी माळ….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित नवरात्र सातवे पुष्प…*

 

*नवरात्र सातवी माळ….*

 

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||”

 

आजची सातवी माळ/ सातवे पुष्प…

शूर्पणखास समर्पित..🙏

 

“या देवी सर्वभूतेषु क्षुधा-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||”

 

शूर्पणखा

 

रामायण मध्ये शूर्पणखा नावाचे एक दुष्ट प्रवृत्तीचे स्त्री पात्र होते..पण ते ही तितकेच महत्वपूर्ण होते. शूर्पणखा ची नखे खूप मोठी होती.म्हणून तिला लोक शूर्पणखा म्हणून बोलवत असत.

शूर्पणखा….म्हणजे शूर्प नखा…म्हणजेच सूप नखा…सुपा सारखी मोठी नखे होती म्हणून हे नाव असेल असे म्हणले आहे…तर काहींनी तिचे नाक कापल्या नंतर ती जागा सूपा सारखी दिसू लागली म्हणून तिचे नाव

शूर्पणखा रूढ झाले असावे असे म्हणले आहे. अत्यंत कामुक स्वभावाची ही राक्षस कन्या रावणाची बहिण म्हणून रामायण मध्ये जास्त परिचयाची आहे.

 

शूर्पणखा ही ऋषि विश्रवा आणि कैकसी यांची कन्या होती..आणि ती रामायणाच्या मुख्य खलनायकाची म्हणजे लंकापती रावण आणि कुंभकर्ण आणि बिभिषण यांची लाडकी बहिण होती.

लहानपणी हिचे नाव मीनाक्षी होतं कारण तिचे डोळे माशासारखे होते परंतु तिला नंतर चंद्रमुखी नावांनी ओळखलं जाऊ लागलं.

.

शूर्पणखाचा विवाह राक्षस विद्युतजिह्वा बरोबर झाला होता.. विद्युतजिह्वा हा कालकेय दानव वंशाच्या राजा होता,त्याचा हा सेनापति होता. एकदा रावणाच्या विजयाचा जल्लोष चाललेला होता. त्यावेळेला मतभेद होऊन कालकेय आणि विद्युतजिह्वा यांच्यात घनघोर युद्ध झालं आणि त्यात विद्युतजिह्वा मारला गेला.

काही मतप्रवाह नुसार शूर्पणखा राजा कालकाचा पुत्र विद्युज्जिह्व ची पत्नी होती. रावणाची संपूर्ण विश्वात सर्वांना पराभूत करून त्यांच्यावर राज्य करायची महत्वाकांक्षा होती .यामुळे तो अनेक युद्ध जिंकून अनेक राक्षसांना ही ठार मारले होते.त्यातच विद्युज्जिह्व याचा ही मृत्यू झाला होता.आणि त्यामुळे दुःखी शूर्पणखा भावाच्या घरीच राहावयास आली ती कायमची. उरलेले आयुष्य आपल्या भावांच्या समवेत लंका आणि दक्षिण भारताच्या जंगलामध्ये घालवलेले दिसते.

 

ज्या वेळेला राम वनवासात होते, त्यावेळेला एके दिवशी गोदावरी नदीत स्नान करून ते आश्रमात परतत होते. सकाळचे होम हवन आणि पूजन केले आणि ऋषीमुनींच्या सोबत गप्पा मारत होते. त्याच वेळेला ही शूर्पणखा तिथे आली आणि ती रामाचे सौंदर्य पाहून हरखून गेली. त्यांचे सुंदर मुख, लांब लांब हात, काळेभोर विशाल डोळे, मंदगती चाल, मस्तकावर जटाभार आणि राजाला शोभणारे सुंदर रूप पाहिले. सावळ्या कांतीने सुशोभित आणि कामादेवा सारखे आकर्षक,आणि इंद्राप्रमाणे तेजस्वी असं ते रूप पाहिल्यावर ती स्त्री कामातुर झाली.

 

शूर्पणखा ही अत्यंत बेडौल आणि कुरूप होती. विद्रुप होती .आवाज कर्कश्य, भसाडा असा होता. तिने राम लक्ष्मण आणि ऋषींच्या समोर घृणा निर्माण होईल असे हावभाव केले. मग तिच्या लक्षात आल्यानंतर ती परत जंगलात गेली आणि सुंदर स्त्रीचे मनोहरी रूप धारण करून त्यांच्यासमोर परत आली आणि त्यांना म्हणाली, “तुम्ही कोण आहात ? राक्षसांच्या या प्रदेशात तुम्ही कसे आलात?”

श्रीरामांनी आपल्या सरळ स्वभावाप्रमाणे उत्तर दिली. ‘धर्म रक्षणाच्या उद्देशाने’ आम्ही वनात आलो आहोत. मग श्रीरामांनी तिला परिचय विचारला, ‘तू इथे कशी ते बऱ्या बोलाने सांग.’ आणि थोडं धमकावलं. मग तिने सांगितलं, कसलाही आड पडदा न ठेवता ती बोलली, ‘मी एक मायावी राक्षसी आहे. मी रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण यांची बहिणी. खर आणि दूषण हे देखील माझेच भाऊ आहेत. या सर्वांच्या पेक्षा मी वरचढ आहे, बलवान आहे. इतकी माझी ताकद आहे. मी तुझ्यावर प्रथम दर्शनीच प्रेमात पडले आहे. तू पुरुषोत्तम आहेस. तेव्हा मोठ्या प्रेमाने पती म्हणून मी तुला स्वीकारायला आले आहे. मी कुठेही कधीही संचार करू शकते, तेव्हा तुझा तो फायदाच होईल. त्यामुळे मी तुला शोभते आणि माझा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. मी तुझ्या या पत्नीला आणि भावाला खाऊन टाकते. आणि मग आपण दोघे मस्त विहार करू आणि आनंदात राहू. हे ऐकून श्रीरामाला हसू आले. तिला समजावून सांगितले, पण ती ऐकायचं नाव घेईना. श्रीराम म्हणाले, ”माझे लग्न झाले आहे. ही माझी पत्नी आहे. त्यामुळे मला दुसरे लग्न करायचं नाही. त्यापेक्षा माझा हा धाकटा भाऊ खूप मोहक आणि देखाणा आहे. तसेच शीलवान आहे. त्याच्याबरोबर कोणीच स्त्री नाहीये. तो तरुण आहे . रुपवान आहे. तेव्हा तू याचा विचार करून त्याच्याशी लग्न करू शकतेस.”

ती कामातुर , कामवेडी लगेच लक्ष्मणाच्या मागे लागली. त्याला आपल्या सौंदर्याचे वर्णन करू लागली. आणि मी तुझी पत्नी शोभते. माझ्याशी लग्न कर म्हणून मागे लागली. आता लक्ष्मण हसू लागला आणि तिची चेष्टा करू लागला. दोघेही आपल्याला वश होत नाहीत, हे लक्षात आल्यावर ती चिडून दोघांनाही खायला त्यांच्या अंगावर धावली. पेटत्या निखाऱ्यासारखे डोळे असलेली ती स्त्री, खरंच क्रोधाविष्ठ होऊन सीतेकडे झेपावली, तेव्हा श्रीरामांनी तिला अडवले आणि लक्ष्मणाला म्हणाले, की पाहिलं का… अशा क्रूर आणि अनार्यांशी कधी थट्टा विनोद सुद्धा करू नये. या कुरूप, कुलटा आणि लबाड राक्षसीला आता मात्र तू मोकळे सोडू नकोस. श्रीरामाचे हे बोलणं ऐकल्यावर लक्ष्मणाने लगेच तलवार उपसून तिचे नाक आणि कान कापून टाकले. ती अजूनच कुरूप दिसायला लागली. घाबरून शूर्पणखा भयंकर किंचाळली आणि जशी आली होती तशी सैरावैरा वनात पळून गेली.

 

शूर्पणखा प्रथम आपल्या खर नावाच्या भावाकडे गेली. रक्ताने न्हालेली आपली बहीण त्याने पाहिली आणि तिच्याकडून राम-लक्ष्मणाचा वृत्तांत त्याने ऐकला. शूर्पणखा भायाने मूर्च्छित होऊन बेशुद्ध पडली. विद्रुप झाली होती . खर राक्षसाला समजेना, की एवढी बलवान असलेली आपली ही बहीण! तिला कोणी इतकं विरूप बनवलं? कोण एवढा बलवान आहे? देवांचा राजा इंद्र सुद्धा हे कृत्य करायला धजावणार नाही. आता मी त्याच्याकडे बघतोच.

 

 

शूर्पणखानी त्या दोघांचाही बदला घ्यायला आपल्या भावांना सांगितले आणि मला आता या तिघांच्याही रक्ताची तहान लागली आहे, आणि माझी इच्छा पूर्ण करा म्हणून हट्ट धरला. आणि तिथून रावण, खर, दूषण, कुंभकर्ण यांच्याशी वैर सुरू झाले. दोन गटात शत्रुत्व निर्माण झाले, ते या शूर्पणखामुळे. तिने राम लक्ष्मण कुठे बसलेत ते दाखवले .

पुढे त्यांचे म्हणजे खर दूषण आणि इतर राक्षसांचे आणि रामाचे लक्ष्मणाचे युद्ध झाले. आणि सर्व राक्षस जमिनीवर मृतावस्थेत पडलेले पाहून शूर्पणखा क्रोधाने वेडी झाली.

 

यावेळेला अनेक राक्षस एकत्रितपणे राम लक्ष्मणावर हल्ला करत होते. परंतु या दोघांनी या सर्वांना यम सदनास पाठवले. कुणाचेच काही चालेना. तेव्हा सीतेच्या अपहरणाची कल्पना अकंपन नावाच्या राक्षसाने सुचवलेली युक्ती रावणाला पसंत पडली आणि त्या दृष्टीने त्याने विचार सुरू केला. पुढे मारीच राक्षसाच्या मदतीने रावणाने सीतेचे अपहरण केले. पुढच्या भागाचे रामायण आपल्याला माहीतच आहे. म्हणजे सीतेचे अपहरण करण्यास मुख्य कारणीभूत ठरलेली ही शूर्पणखा होती. म्हणून व्हीलन म्हणून आज तिचा उल्लेख करणे क्रमप्राप्त होते.

 

असा ही एक मतप्रवाह वाचायला मिळाला की आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी शूर्पणखाने राम आणि रावणात दुष्मनी निर्माण केली असावी. आणि शेवटी रामाच्या हातून रावण वध होऊन तिचा प्रतिशोध पूर्ण झाला.

 

रावण वधासाठी ही कारणीभूत ठरलेली रामायणातील एक दुष्ट का होईना पण महत्वपूर्ण स्त्री होती म्हणून तिला मी महत्वाचे स्थान देऊन तिचे स्मरण केलं… इतकचं…

आपल्या समाजात ही अशा व्हिलन भूमिका पाहायला मिळतात…पण जय हा त्यांचा न होता चांगल्या प्रवृत्तींचा होतो हे आपण अनुभवतो..आपल्यात एक म्हण आहे…निंदकाचे घर असावे शेजारी….

तसे अशी लोक असतील आजूबाजूला तर आपले यश लखलखीत होऊन समोर येतेच…

रावणाच्या म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणाऱ्या अशा स्त्रीला ही मी मानाचा मुजरा करते….

………………………………………………

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

9/10/2024

प्रतिक्रिया व्यक्त करा