*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*६) लाल रंग*
इंद्रधनुतील पहिला रंग
तांबडा तयाचे नाव असे
लाल जास्वंद गणेशाला
भक्त म्हणती प्रिय असे
अर्धोन्मिलीत लाल गुलाब
प्रस्ताव प्रीतीचा देई
प्रियेच्या गालावर लाली
मौन रुकाराची ग्वाही
रक्तवर्णी माणिकाचे
पदक रुळे वक्षावरती
अंगठीतील माणिकही
चित्त वेधूनी घेई किती
लाल मिरचीचे तिखट
कमी अधिक तीव्रतेचे
झणझणीत वा सपक
चवीनुसार खवय्यांचे
लालबुंद टमाट्यांनी
बहु शोभा ये पदार्थास
टरबूज आणिक डाळिंब
औषधीगुणयुक्त खास
आरोग्यास हितकारक
सफरचंदं काश्मीरची
सर्वसामान्यांनाही आता
भूल पडे स्ट्रॉबेरीची
लाल बेरजेचे चिन्ह
खुण असे रेडक्राॅसची
लाल प्रकाशकिरण म्हणे
सर्वाधिक तरंग लांबीची
रखरखीत उन्हाळ्यात
लालभडक गुलमोहर
नववधूला शोभून दिसते
लाल चुनरी माथ्यावर
प्रदेशानुसार मनुष्यात
फरक बाह्यरंगी फक्त
अखिल मानवजातीचे
लालच रंगाचे परि रक्त
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
८-१०-२४
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.