संभाजीनगरचे डॉ. पुरुषोत्तम भापकर सनदी अधिकारी म्हणून प्रसिद्ध तर आहेतच. पण एक कवी म्हणून लेखक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. जिल्हाधिकारी असूनही जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वात प्रथम येणारा व कार्यालयातून सगळ्यात उशिरा जाणारा माणूस म्हणजे जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर. अमरावतीला जिल्हाधिकारी असताना साहेबांनी जेवढे उपक्रम राबवले जेवढे लोकोपयोगी कामे केली तेवढी फार कमी लोकांनी केलेली असतील. हा माणूस 24 तास काम करणारा आहे. त्यांच्या कार्यकाळात अमरावती जिल्ह्यात भयंकर पूर आले असताना हा माणूस झोपलाच नाही. पूर्ण पूर परिस्थितीवर हातात काठी घेऊन लक्ष देऊन होता. अधिकाऱ्यांना सूचना करीत होता .प्रोत्साहन देत होता. पेढई नदीवर जेव्हा धरण बांधण्याचा शासनाचा निर्णय झाला तेव्हा अमरावती जिल्ह्यातील धरणग्रस्त लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. रोज रात्री दहा-अकरा वाजता जिल्हाधिकारी श्री पुरुषोत्तम भापकर आंदोलनकर्त्या उपोषणकर्त्या लोकांचा आढावा घ्यायचे. कधी कधी त्यांच्याशी चर्चा करायचे. त्यांच्या लक्षात आले यांचा धरणाला विरोध नाही आहे. विरोध आहे त्यांच्या ज्या जमिनी जाणार आहेत त्यांच्या मोबदल्याबद्दल. सरकार त्यांना पंधरा ते वीस हजार रुपये प्रति एकर भाव द्यायला तयार होते. शेतकऱ्यांना ते मान्य नव्हते. भापकरसाहेब कामाला लागले. मंत्र्यांना भेटले. प्रस्ताव तयार केला. आणि प्रत्येक शेतकऱ्याला पाचपट किंमत देण्याचा निर्णय घेतला. सर्व शेतकरी प्रसन्न झाले आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. भापकर साहेब अमरावतीला असताना सर्वात प्रथम कार्यालयात यायचे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला शिस्त लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्वतः हातात झाडू घेतला. आणि जिल्हाधिकारी कार्यालय नाही तर जिथे जातील तिथे स्वच्छता अभियानामध्ये सर्वात प्रथम पुढाकार घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी हातात झाडू घेतला मग तो कर्मचाऱ्यांना घ्यावाच लागतो. भापकर साहेबांचा काळ हा फोटो सेशनचा काळ नव्हता .तेव्हा खरोखरच स्वच्छता अभियान राबविले जात होते. भापकर साहेबांनी शेतकऱ्यांसाठी लोकांसाठी वेगवेगळ्या पदावर काम करीत असताना खूप चांगले काम केले .म्हणून आज त्यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. ते स्वतः लेखक आहेत. कवी आहेत. गायक आहेत. वक्ते आहेत. त्यांच्यावर चित्रपट पण निघाला आहे. हा माणूस किती साधा असावा. एक वेळ मी त्यांच्या सालवडगावला गेलो. तेव्हा साहेब संभाजीनगरला विभागीय आयुक्त होते. त्यांना जेव्हा कळले की मी त्यांच्या गावाला आलो आहे .साहेब मला म्हणाले .मी जितक्या लवकर पोहचता येईल तितक्या लवकर येतो. साहेब आले. आमची गावात रस्त्यावरच भेट झाली. साहेब आले म्हणून गावकरी आले. गावाच्या मंदिरात एक कार्यक्रम सुरू होता. गावकरी म्हणाले साहेब कार्यक्रमाला चला. साहेब म्हणाले. चला. साहेबांना कपडे बदलायचे होते. घरी गेलो तर वेळ लागेल. म्हणून त्यांनी चालकाला सांगून गाडीतून दुसरा शर्ट बोलावला. आणि रस्त्यावरच शर्ट बदलवला. रस्त्यावर शर्ट बदलवणारा आयएएस अधिकारी मी अजून तरी पाहिला नाही आणि आता तर पाहण्याची शक्यता पण नाही. आम्ही कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम झाला. आम्ही साहेबांच्या घरी गेलो. जेवण करायला बसलो. रात्रीची वेळ होती. लाईन गेली. मला वाटले एवढे मोठे आय ए एस अधिकारी. घरी सगळ्याच सुविधा असतील. पण साधे इन्वव्हर्टर पण त्यांच्याकडे नव्हते. कंदील लावण्यात आला. आणि कंदिलाच्या प्रकाशात आम्ही जेवण केले. मी भापकर साहेबांच्या वडिलांना विचारले. तुमचे चिरंजीव एवढे मोठे आयएएस अधिकारी आहेत. तुमच्याकडे इन्व्हर्टर पण का घेतले नाही. ते म्हणाले साहेब ते इन्व्हर्टर चार्ज व्हायला तितक्या वेळ आमच्याकडे लाईन पण नसते. आमच्या गप्पागोष्टी झाल्या. माझा कार्यक्रम दुसऱ्या गावाला होता. एवढ्या रात्री साहेब मला गावाच्या सीमेपर्यंत सोडायला आले. परवा मी संभाजीनगरला त्यांच्या घरी गेलो. साहेब मला माझ्या गाडीपर्यंत सोडायला आले. एक आय ए एस अधिकारी पदावर असताना आणि नसताना सारखाच वागतो. त्याचा अनुभव मला पुरुषोत्तम भापकर यांना भेटताना आला. परवा मी साखर आयुक्त श्री हरीदास व त्यांचे प्रकाशक त्यांच्या अभ्यासिकेमध्ये बसलो होतो. चारही बाजूने पुस्तके होती. मी त्यांना सांगितले साहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. आम्ही एक आठवडाभर कार्यक्रम घेणार आहोत. तुम्हाला एक दिवस यावे लागते. ते म्हणाले मी एक नाही दोन तीन दिवस येतो. त्यांनी लगेच अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार यांना फोन लावला. सौरभ कटियार यांनी औरंगाबादला साहेब आयुक्त असताना त्यांच्या हाताखाली सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. मी अमरावतीला दोन-तीन दिवसांसाठी येत आहे असे त्यांनी जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार यांना सांगितले. साहेबांशी चर्चा करताना मला एक लक्षात आले त्यांना तारखेसहित घटना आठवतात. अमरावतीला पहिला पूर केव्हा आला होता. दुसरा पूर केव्हा आला होता .सिंचनाचा बॅकलॉग किती होता. कसा भरून काढला .किती रक्कम आली होती .ते अगदी सहज सांगत होते. मी त्यांना म्हटले साहेब तुम्ही अमरावतीला जिल्हाधिकारी होऊन तर आता दहा वर्षे झालीत .तुम्हाला सगळ्या तारखा सगळ्या घटना कसे काय आठवतात. साहेबांचे उत्तर खूप चांगले होते. ते म्हणाले. काठोळे मी प्रत्येक काम मनापासून करतो. हृदयापासून करतो. म्हणून ते कायमचे हृदयामध्ये वस्ती करून राहते. परवा जळगावला आमचे मित्र व ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री रवींद्र जाधव हे वारले. मी जळगावला गेलो. जाधवसाहेबांचा गोतावळा फार मोठा. त्यांच्या अंत्ययात्रेला दोन आयएएस अधिकारी आवर्जून आले होते .एक नागपूरचे माजी जिल्हाधिकारी व सध्याचे आदिवासी विभागाचे अपरायुक्त श्री रवींद्र ठाकरे व दुसरे श्री पुरुषोत्तम भापकर. श्रद्धांजली वाहताना त्यांना गहिवरून आले. साहेबांच्या आठवणी त्यांनी जळगावकराना सांगितल्या. साहेब अमरावतीला जिल्हाधिकारी असताना कृषी अधीक्षक श्री किसन मुळे यांच्या समवेत माझ्या घरी येऊन गेले. मी केलेल्या कामाची पावती त्यांनी आमच्या घरी चर्चे दरम्यान दिली. आज साहेब अमरावती सोडूनही दहा वर्षाचा कालखंड गेलेला आहे. साहेब शिक्षण आयुक्त असताना अमरावतीला आले. मी केव्हा सोलापूर जिल्ह्यात होतो. माझे मिशन आयएआयचे काम सुरू होते. साहेबांचा फोन आला. मी लगेच निघालो. अमरावतीला साहेबांना भेटलो. त्यांना भेटले म्हणजे कसे प्रसन्न वाटते. प्रशासकीय बाबी बरोबरच ज्या सामाजिक साहितीक सांस्कृतिक गोष्टींवर चर्चा होतात त्या खऱ्या अर्थाने जीवनाला मोल देऊन जातात. साहेब अमरावतीला जिल्हाधिकारी असताना आम्ही त्यावर्षी आयएएस च्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या आलेल्या श्रीमती संपदा मेहताचा सत्कार ठेवला होता. मॅडम सध्या राष्ट्रपती भवनात कार्यरत आहेत. भापकरसाहेब प्रमुख पाहुणे होते. पण वेळेवर साहेबांना काम आले. साहेबांचा मला फोन आला. काठोळे मला येता येणार नाही. पण माझा प्रतिनिधी म्हणून मी माझ्या सौभाग्यवतीला पाठवतो .तसेच माझी गाडी पण पाठवतो .संपदा मॅडमचा योग्य तो सत्कार करा. आणि त्यांना माझी अडचण सांगा. एका नुकत्याच आयएएस झालेल्या सनदी अधिकारी होणाऱ्या संपदा मेहताच्या सत्काराला त्यांनी सन्माननीय वहिनी साहेबांना पाठवून योग्य सत्कार केला. भापकर साहेब आहेत ते असे .त्यामुळे ते लोकांच्या लक्षात होते. लक्षात आहेत आणि राहतील. जितने वाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग तरीकेसे करते है. साहेबांचे शेतीवर खूप प्रेम आहे.ते स्वतः शेतीमध्ये काम करतात. औरंगाबादला त्यांनी स्वतःहून बदली करून घेतली. कारण इथून त्यांचे सालवडगाव जवळ आहे. शेतीमध्ये ते विक्रमी उत्पादन काढतात.स्वतः शेतीमध्ये राबणारा हा माणूस खऱ्या अर्थाने आगळावेगळा आहे. साहेब न्यायाने साहेब काम करीत होते. काम करीत आहेत. आणि काम करीत राहणार आहेत .ते आयएएस असले तरी त्यांचे मन मात्र कवीचे आहे लेखकाचे आहे संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे आहे आणि मी तर पुढे जाऊन म्हणेल की या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याला मातृ हृदय लाभलेले आहे. आणि म्हणूनच ते जे काम करतात ते काम तुमच्या हृदयाला भिडते. हा माणूस उच्चपदस्थ अधिकारी वाटत नाही. कोणता जिल्हाधिकारी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत कार्यालयात थांबतो. इतक्या रात्री उपोषण मंडपाला भेट देतो. सतरंजीवर बसून त्यांचे प्रश्न समजून घेतो. नुसते प्रश्न समजून घेऊन गप्प बसत नाही तर त्यांना पाचपट मोबदला देतो .त्यासाठी अभ्यास करतो. लिखापळी करतो. मंत्र्यांना भेटतो. ही सगळी त्यांची वागणूक म्हणजे मातृहृदयी आहे. म्हणून अशा या कवी मनाच्या सनदी अधिकाऱ्याला मनापासून मानाचा मुजरा.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003