सावंतवाडी :
ज्येष्ठ अभिनेत्री, साहित्यिक कल्पना बांदेकर यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर झाला आहे. कलावंत विचारमंच, कमल फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने दिला जाणारा तसेच कमल अमृत नृत्य, कमल उद्योग समूह यांच्या सौजन्याने लोककवी वामनदादा कर्डक, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके कवी वसंत बापट कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणार हा राज्यस्तरीय कलावंत पुरस्कर आहे. एकूण ४२ पुरस्कारात सिंधुदुर्गातून कल्पना बांदेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाशिक येथे अध्यक्ष सुनील मोंढे यांच्या हस्ते १३ ऑक्टोंबरला या पुरस्काराने कल्पना बांदेकर यांना सन्मानित केले जाणार आहे.
कल्पना बांदेकर गेली ३० वर्षे कला क्षेत्रात कार्यरत आहेत. नाट्य, एकांकिका, लघु चित्रपट, मालिका, वेब सिरीज, सिनेमा अश्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. याच बरोबर मालवणी कविता, लिखाण, बाल कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. अनेक साहित्यिक संस्थांशी त्या निगडित आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्या कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.