You are currently viewing मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे मानले आभार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे मानले आभार

सावंतवाडी :

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाचे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने आभार मानण्यात आले. मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा द्यावा यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सह महाराष्ट्रातील साहित्यिक आणि मराठी भाषा प्रेमी यांची गेली अनेक वर्षे मागणी होती. या कित्येक वर्षाच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी सह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विशेष करून राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला, त्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या अभिनंदनचा ठराव कोमसाप सावंतवाडी तालुक्याच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी वेळेत व्हावी आणि मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी केंद्र व राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत असा देखील निर्णय बैठकीत घेण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची कार्यकारिणीची बैठक सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृहावर अध्यक्ष पत्रकार संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सचिव प्रा.प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजन तावडे, प्रांतिक सदस्या लेखिका सौ.उषा परब, जिल्हा खजिनदार भरत गावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ.दीपक तुपकर, सदस्य ॲड.अरुण पणदूरकर, ॲड.नकुल पार्सेकर, कवी दीपक पटेकर, सौ. प्रज्ञा मातोंडकर, सौ.ऋतुजा सावंत-भोसले, सौ.मंगल नाईक आदी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी १३ ऑक्टोबरला सायंकाळी ४.०० वा. सावंतवाडी येथे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या साहित्य सदस्यांचा गौरव केला जाणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन करून समृद्ध असलेल्या मराठी भाषेचे संवर्धन व जतन होण्यास चालना मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा