येस यूवर आॅनर दादा”.. .
जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर अनेक कार्यक्रमाला उपस्थित असतो.. पण आजची संध्याकाळ माझ्यासाठी फार वेगळी होती. आमच्या सिंधुदुर्गचे सुपूञ आणि महाराष्ट्र व गोव्याचे बार काउन्सिलचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि या जिल्ह्याची शान आमचे मिञ अॅड. संग्राम देसाई यांचा कुडाळ नगरीत झालेला सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा. संग्राम यांनी निमंत्रण दिले होते पण त्यांचे बंधू रणजित यांनी पण निमंत्रण पाठवले. निमंत्रण नसते तरी मी गेलो असतो याचे कारण प्रतिकुल परिस्थितीत स्वकर्तृत्वाने गवसणी घालणाऱ्यांच मला फार आकर्षण आहे.
या सोहळ्यासाठी अर्थात ज्याना संग्राम हे गुरुस्थानी मानतात ते सगळ्यांचे दादा खासदार नारायणराव राणे उपस्थित होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. राणे कुटुंबियांचे आणि संग्राम देसाई यांचे एक वेगळ नातं आहे जे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. संग्राम हे त्यांचे वकील आहेत त्यापेक्षा दादा आणि संग्राम यांच्यात एक भावनिक नात आहे.
आज हा कार्यक्रम पहाताना मला, संग्राम यांच्या पिताश्रींची आठवण झाली. कट्टर शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख हा त्यांचा प्रवास. एक निष्णात वकील, सडेतोड मांडणी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. वाचनाचा दांडगा व्यासंग त्यामुळे संदर्भांच प्रंचड भांडार. माणगाव खोऱ्यातील आंबेरी येथील डी. डी. पाॅईंटवरची भेट मला आज आठवली. मी, जेष्ठ साहित्यिक स्व. विद्याधर भागवत व स्व. आदरणीय डीडी. सुमारे दोन तास त्या आंबेरी नदीच्या काठी डि. डि. पाॅईंटवर बसलो होतो. तेव्हा संग्रामचे वडील आणि भागवत सर दोघेही टेंबेस्वामींच्या आध्यात्मिक सामर्थ्यावर चर्चा करत होते.
आजच्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना मला असं वाटलं होत की संग्राम हे खूप भावनाप्रधान होऊन बोलतील पण त्यानी आपले अनुभव सांगताना इतक्या खुमासदार भाषेत सांगितले की त्यांच्या प्रत्येक वाक्याला सभागृहात हशा पिकत होता. दादा जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शानाला आले होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी आपल्या मिञासमवेत गेलेले आणि नुकतीच लाॅची शेवटच्या वर्षाची परिक्षा दिलेले संग्राम हे सुरक्षा रक्षकांच्या कचाट्यात सापडले आणि मोठ्या शिकस्तीने दादांची भेट झाल्यावर झालेला आनंद ही घटना त्यांनी अशी काही फुलवून सांगितले मला तर त्यांच्यात वकिलापेक्षा अभिनेताच दिसला.
आज व्यक्त होताना त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या साठी “कायदेशीर मस्त पंच” मारला. चार महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दादा आणि भाई यांच्या मनोमिलनावर हा पंच होता.. ज्या पंचचा आनंद सभागृहात उपस्थित असणाऱ्या सगळ्यानीच घेतला… आणि दिपकभाई पण अगदी खळखळून हसत होते.
संग्राम म्हणाले, “दहशतवादी व अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी टाडा हा नवीन कायदा अस्तित्वात आला… वकील म्हणून या कायद्याची कायदेशीर परिभाषा मला समजली,.. पण या जिल्ह्यात या दहशतवादाची परिभाषा जी दिपकभाईनी आणली ती माञ वकील असूनही मला आजतागायत समजली नाही”…
आपल्या प्रवासतील अनेक खुमासदार किस्से त्यांनी कथन केले. महाराष्ट्र, गोवा, दमण व दिव या राज्यातील तब्बल ३८ जिल्ह्यातून निवडून येणे आणि अडीच लाख वकिलांचे प्रभावीपणे नेतृत्व करणे म्हणजे ही घटना गगनाला गवसणी घालणारीच आहे. छोट्या जिल्ह्यातून मुंबईसारख्या महानगरात जावून न्यायपालिकेमध्ये आपल एक वेगळी ओळख निर्माण करणे ही साधी गोष्ट नाही.
स्वर्ग नावाची काही जागा असते का माहित नाही पण सुखी असण म्हणजे स्वर्ग असेल आणि त्यातल समाधान हेच स्वर्गसुख हीच खरी जीवन जगण्याची जीवनशैली त्यांनी आत्मसात केलेली आहे. आजच्या संपूर्ण कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने संग्राम यांच्या प्रेमापोटी आले होते पण या कार्यक्रमात कुठेही राजकीय वास नव्हता हे विशेष.
संग्राम यांची चॅरिटी फार मोठी आहे.. पण ते त्याचे कुठेही ढोल बडवत नाही. वितभर करुन हातभर प्रसिद्धी करणे त्यांना आवडत नाही. माणसं जपणे हा त्यांचा स्थायी भाव. जानेवारीत मी माझ्या मुलीच्या विवाहा प्रित्यर्थ आयोजित केलेल्या स्वागत सोहळ्याचे निमंत्रण त्यांचे घर बंद असल्याने ठेवून आलो होतो. दुसऱ्या दिवशी त्यांचा मला मेसेज आला, निमंत्रण मिळाले, मी बाहेर गावी असणार.. रणजित येईल”..
सुमारे सात ते आठ वर्षापूर्वी एका मिञाच्या प्रकरणात हायकोर्टात अटकपूर्व जामीन घ्यायचा होता. मी जेव्हा फोन केला तेव्हा राञीचे अकरा वाजले होते. तेव्हा ते दादांच्या ओमगणेश मध्ये कणकवलीत होते. मला म्हणाले, तुम्ही तासाभरात कुडाळात या.. आणि राञौ साडेबारा वाजता भेट झाली..आणि पुढील विषय मार्गी लागला.
आजच्या त्यांच्या व्यक्त होण्यात दांदा हेच केंद्रबिंदू होते. त्यामुळे कोर्टात खटले लढवताना व युक्तिवाद करताना नेहमीच एस, मी लाॅर्ड किंवा एस्. युवर आॅनर असचं म्हणावं लागत… मात्र आज त्यांनी आपले गुरु दादांची परवानगी घेऊन म्हणाले, “यस यूवर आॅनर दादा “…
… अॅड. नकुल पार्सेकर..