वृत्तसंस्था :
राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) नुकतेच स्पष्ट केले आहे की, हॅकर्सने तुमच्या खात्यामधील पैसे लंपास केल्यास किंवा तुमच्या खात्यासंबंधित काही ऑनलाईन गैरव्यवहार केला तर त्यास पूर्णपणे बँक जबाबदार राहील. परंतु त्यासाठी एक गोष्ट सिद्ध व्हावी लागेल की, ग्राहकाची फसवणूक झाली आहे, किंवा याप्रकरणाशी ग्राहकाचा काहीही संबंध नाही. मात्र जर ग्राहकाच्या चुकीमुळे त्याचं नुकसान झालं तर त्यास बँकेला जबाबदार धरता येणार नाही. एनसीडीआरसीचे पीठासीन सभासद सी. विश्वनाथ यांनी याबाबतचा निर्णय दिला आहे.
यावेळी ते म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड हॅक होण्याची किंवा अनधिकृत मार्गाने बनावट क्रेडिट कार्ड बनवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.एनसीडीआरसीने म्हटलंय की, ग्राहकासोबत कोणताही गैरव्यवहार झाला, त्याच्या खात्यामधील पैसे चोरीला गेले, हॅकर्सनी पैसे लुबाडले अथवा कोणताही ऑनलाईन फ्रॉड झाला तर त्याला ग्राहक नव्हे त बँक जबाबदार असेल. एखाद्या ग्राहकाने क्रेडिट कार्ड हरवलं आणि त्याच्या खात्यामधून आर्थिक व्यवहार होऊन त्याचं नुकसान झालं तर त्यालादेखील बँकच जबाबदार असेल. कारण जर असं होत असेल तर याचा अर्थ त्या बँकेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग यंत्रणेत काहीतरी दोष असेल.