*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*
*नवरात्र चौथी माळ….*
सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||”
आजची चौथी माळ/ चौथे पुष्प…
कैकयी मातेला समर्पित..🙏
“या देवी सर्वभूतेषु बुद्धी-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||”
कैकयी
माता कैकयी अयोध्या नरेश राजा दशरथाची लाडकी कनिष्ठ पत्नी होती. कैकय देशाचा राजा अश्रपती आणि शुभ लक्षणा यांची कैकयी ही मुलगी होती.
माता कैकयीच्या जन्मानंतर तिच्या आईला देशातून बहिष्कृत केलं होतं, निर्वासित केलं होतं. आणि त्यामुळे तिचे पालन पोषण मंथरा नावाच्या कुबडी नर्स हिने केलं होतं. कैकयीला एकूण सात भाऊ होते त्यातील तिचा जुळा भाऊ युद्धजित म्हणून होता.
एकदा देव आणि दानवांच्या युद्धासाठी राजा दशरथ युद्ध करायला गेले. त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांची पट्टराणी कैकयी सुद्धा गेली होती. कारण कैकयी युद्ध कलेत खूप निपुण होती. ती राजा दशरथाची युध्दातील कुशल मार्गदर्शक होती. युद्ध करताना त्यांच्या म्हणजे दशरथाच्या रथाचे चाक निखळताना दिसले. त्याचवेळेला राणीने चाक आपल्या हाताने घट्ट पकडून ठेवून, तुटण्यापासून रक्षण केले. युद्ध संपल्या नंतर जेव्हा राजा दशरथाला हे समजले, त्यावेळेला त्याने खुश होऊन राणी ला दोन वर प्रदान केले. पण राणी कैकयी ने ते वर योग्य वेळ आल्यावर मी मागेन असे सांगितले.
माता कैकयी प्रौढ पतीची तरुण आणि देखणी पत्नी होती. त्यामुळे राजा दशरथ सतत तिच्या महालात असे. शिवाय राजा दशरथानी तिच्या वडिलांना तिच्या पोटी येणाऱ्या मुलाला राजा बनवण्याचे वचन दिले होते. आणि म्हणून ज्या वेळेला रामाला युवराज्याभिषेक करायचा ठरवला , त्यावेळेला कैकयी च्या वडिलांना ती वार्ता कळू दिली नव्हती आणि कैकयीलाही नाही. माता कैकायीला ही वार्ता प्रथम मंथरेकडून कळली. पण कैकयी मुळात दुष्ट नव्हती आणि धूर्तही नव्हती. कपटी तर मुळीच नव्हती. ती साधी सरळ होती. पण सवती मत्सर करणारी एक साधारण स्त्री होती. परंतु आपल्या सवतींच्या मुलांवर ती खूप प्रेम करीत असे. भरता पेक्षाही तिचा रामाकडे जास्त ओढा होता. राम तिला प्राणप्रिय होता. पुढे कालांतराने ज्यावेळेला माता कैकयीला मंथरेकडून जेव्हा समजले, की रामाला युवराज्याभिषेक होणार आहे , तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि बातमी देणाऱ्या मंथरेला तिने आपल्या गळ्यातील मोत्याची माळ बक्षीस देऊन टाकली. परंतु चतुर मंथरा तिला मुर्खात काढून भविष्याची कल्पना देते. आणि तिचे कान भरायला सुरुवात करते. ती बोलते की ज्या सवतीला म्हणजे कौसल्लेला आजपर्यंत उपेक्षिले गेले होते, तिचा रामाचा युवराज्याभिषेक झाल्यावर वरचष्मा होईल. महत्त्व वाढेल. ती राजमाता होईल. त्यावेळेला तुझ्या वाटेला उपेक्षिताचे जिणे येईल आणि भरत हा कायम जन्मभर रामाचा दास म्हणून राहील. याची जाणीव करून देते. तिने कैकयीचे स्त्रीत्व, मातृत्व जागं केलं. तिला आपला हक्क मागायचा आग्रह मंथरेनी केला. आणि मग त्यानंतर माता कैकयीने अक्षरशः तमाशाच केला. राजा दशरथाची स्थिती केविलवाणी करून टाकली. कारण राजा दशरथाला मागे दिलेल्या वराची तिने आठवण करून दिली. आणि त्या वराद्वारे तिने रामाला 14 वर्ष वनवासास पाठवण्यासाठी आग्रह धरला.आणि भरतास युवराज्याभिषेक झाला पाहिजे म्हणून अडून बसली. राजा दशरथ धक्का बसून मूर्च्छित झाले. त्याने रडत भेकत तिची आर्जवे केली. चिडून शिव्याशाप सुद्धा दिले. तरीही माता कैकयी बदलली नाही. आपल्या मतावर ठाम राहिली. राजा दशरथ वचनात अडकल्यामुळे अखेर तिचा शब्द अव्हेरू शकले नाही आणि शेवटी त्यांना रामाला वनवासाला पाठवावेच लागले .
माता कैकयी पुत्र प्रेमाने आंधळी झाली होती. आणि मंथरेच्या सांगण्यात फसल्यामुळे पुढे तिला पश्चातापही झाला. तिचा पुत्र प्रेमामुळे केलेला हा प्रयत्न निष्फळ ठरला. आणि भरताची संमती गृहीत धरून तिने मोठी चूक केली. कारण तिच्याच पुत्राने तिला तिच्या कृत्याबद्दल कटू शब्दात निंदा केली आणि म्हणाला , ‘माता न तू वैरीणी’. तो तिचे तोंडही बघायला तयार नव्हता. भरताने तिला आई म्हणून नाकारले होते. आणि हीच मोठी शिक्षा माता कैकयीला मिळाली होती. कैकयीला आपली चूक कळून चुकली होती, पण खूप उशीर झाला होता. कारण भरत आजोळहून परत यायच्या आधीच राजा दशरथाच्या मृत्यूचा धक्का तिला बसला. वैधव्य आले. सर्वांकडून तिची छी s s थू s s होऊ लागली.
भरत ज्यावेळी चित्रकुटाकडे श्रीरामांकडे जाताना भारद्वाज ऋषींना भेटला होता. त्यावेळी भरत आपल्या आई विषयी बोलताना क्रुद्ध, अविचारी,गर्विष्ठ, स्वतःला भाग्यवान आणि स्वार्थी समजणारी , ऐश्वर्यलुब्ध , दुर्जन असून दुष्ट व पापबुद्धीची बाई आहे ही, अशी कठोर शब्दात तिची ओळख करून दिल्याचे पुरावे रामायणात आहेत.
असे शब्द तिने पती राजा दशरथ कडून ऐकले होते,पण पुत्राकडून अपेक्षा नव्हती.
खरतर ती मुळात सरळ स्त्री होती.कुणी तरी कान भरले,आणि ही पिसाटल्या सारखी वागली…ती खरचं दुष्ट बुद्धीची असती तर ती रामाला भेटायला चित्रकुटावर आली नसती. रामाला तोंड ही दाखवले नसते.
ज्यावेळी भरत राम सीता यांना भेटायला वनात गेले होते ,त्यावेळी माता कैकयी सुद्धा बरोबर गेली होती..तिने त्यावेळी श्रीरामाची हात जोडून माफी ही मागितली..व परत माघारी यायची विनंती केली..माझी चूक झाली म्हणून हात जोडले…पण श्रीरामाने तिला वंदन करून पिताश्री यांची आज्ञा मला पूर्ण करावीच लागेल,म्हणून नम्र पणे नकार देऊन पुढे मार्गस्थ झाले.पण तत्पूर्वी त्यांनी म्हणजे श्री रामांनी भरत आणि शत्रुघ्न यांना माता कैकयीशी प्रेमाने वागायची आज्ञा केली.आणि प्रेमाने वागण्याची शपथ ही घ्यायला लावली.रामाच्या वनवासाला नियतीच कारणीभूत असावी असे श्री रामाने ओळखले होते…हे विधिलिखित त्यांनी जाणले.आणि त्यांनी माता कैकयीला माफ केले…
आज आपल्या समाजात आज ही चुगलखोर करणाऱ्या स्त्रिया आहेत…दुसऱ्या स्त्री बद्दल किंवा इतरांबद्दल वाईट गोष्टी पसरवणाऱ्या स्त्रिया आपल्या आजुबाजूलाच आढळतील.एखाद्या घरात सासू -सुनेचे, किंवा नणंद -भावजय यांचे बरे चालले असेल, तर त्यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचे काम बहुदा आजूबाजूच्या स्त्रियाच करत असतात…तेंव्हा त्या बाहेरच्या चुगलखोर स्त्रियांना दुर्लक्षित करून, त्यांच्या पासून 10हात दूर राहण्यात आपले भले आहे, हे ओळखून प्रत्येक स्त्रीने खंबीर राहून आपला संसार सांभाळावा…हे उत्तम……
माता कैकयी ही रामायणातील प्रमुख पात्र होते. ती सर्वांची लाडकी ही होती.देखणी आणि वयाने लहान व नीटनेटकी राहणारी घरंदाज स्त्री होती. एका शुल्लक गोष्टीने तिचे मन भरकटले, पण उशीरा का होईना , तिला त्याची जाणीव झाली, हे ही नसे थोडके.
अशा या माता कैकयी सारख्या बुद्धिमान, चतुर स्त्रीला माझा मानाचा मुजरा…
………………………………………….
.©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
6/10/2024