You are currently viewing राखाडी रंग

राखाडी रंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित नवरात्र निमीत्त अप्रतिम काव्यरचना*

 

*राखाडी रंग*

 

योग्य वेळी-अवेळी वर्षा

मेघ राखाडी-कृष्णवर्णी

बळीराजाची मन:स्थिती

चिंताग्रस्त – समाधानी

 

बोलकी करण्याचे कसब

रंगविहिन रेखाचित्रे

आठवणी गतकाळाच्या

धवल/कृष्ण छायाचित्रे

 

हात श्रमिकांचे सुंदर

खरखरीत, काळवंडलेले

‘श्रमएव जयते’ मानावे

त्यांच्याविन जीवन अडलेले

 

प्राथमिक शाळेमध्ये गट्टी

पाटी आणिक लेखणीशी

पावित्र्याचा, शुचितेचा

संबंध राखाडी भस्माशी

 

रौप्य नाणी, भांड्यांची

श्रीमंतांची मक्तेदारी

आधार जर्मन-भांड्यांचा

गरीबाघरच्या संसारी

 

वळचणीला बसुन

गुटुर्रगु घुमतो पारवा

घुबडाचा घुघुत्कार

अशुभ का मानावा

 

रस्ता डांबरी/ सिमेंटचा

ऊनसावली जमिनीवर

पाषाण-प्रतिमेला वंदन

लवुन दगडाच्या पायरीवर

 

प्रदुषणाची अभ्रे धुरकट

दूर्लक्ष नव्हे मुळी बरे

अर्थ राखेचा ‘रक्षतू माम्’

राखावी बहुतांची अंतरे

 

अंतिम समयी फक्त उरते

चिमूटभर राख देहाची

त्यावरूनी का ओळख व्हावी

सौम्य, सोज्वळ राखाडी रंगाची

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

५-१०-२४

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा