केसकरांना महायुतीतून पुन्हा संधी देणे महायुतीसाठी अपशकुन ठरेल – एकनाथ नाडकर्णी
राणेंना दिलेल्या वेदना आजही कायम, आडाळी प्रश्नात राजकारण नको…
दोडामार्ग
निवडणुकीच्या तोंडावर आपल्या स्वार्थासाठी सोबत घेण्याची भाषा करणार्या दीपक केसकरांचे स्वार्थी राजकारण नारायण राणे विसरले असतील. मात्र गेल्या अनेक वर्षाच्या आमच्या वेदना कायम आहेत. त्यामुळे महायुतीतून केसरकर नकोच त्यांना संधी दिल्यास तो महायुतीसाठी अपशकुन ठरेल, अशी टीका भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी मांडली आहे.
दरम्यान गेल्या पंधरा वर्षात उद्योगांच्या घोषणा करून मंत्री दीपक केसरकरांनी जनतेची दिशाभूल केली आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर आडाळी एमआयडीसीत उद्योग आणण्याची नाटकं करत आहेत. ज्या कंपनीच्या भूमिपूजनाची त्यांनी घोषणा केली आहे, त्याच्याशी केसरकरांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे भूमिपूजनाच्या आडून स्वार्थाचे राजकारण करु नये, असे ही ते म्हणाले. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, दीपकभाई आता थांबा पुरे झालं तुमचं राजकारण. ज्या कंपन्या स्वतःहून आडाळीत येत आहेत त्यांना आपले उद्योग उभारू देत. तुमच्या घाणेरड्या राजकारणामुळे येथील औद्योगिक क्षेत्र बदनाम झालं तर येणारे उद्योजक देखील माघारी परत जातील. तुमच्या नाकर्तेपणामुळे एकतर उद्योजक आले नाहीत, त्यामुळे जनता त्रस्त आहे. आता निवडणुका आल्याने केसरकारांना आडाळी एमआयडीची उचकी लागली आहे. खासदार नारायण राणेंना प्रत्येक गोष्टीत विरोध करणाऱ्या केसरकरांनी त्यावेळी आडाळी एमआयडीसीला देखील विरोध केला होता. आता तेच केसरकर नारायण राणेंना स्वार्थासाठी सोबत घेण्याची भाषा करतात. कदाचित राणेंचे मन मोठं असल्याने ते केसरकरांकडून झालेलं राजकारण विसरले असतील. पण आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मनातील वेदना आजही कायम आहेत. केसरकारांचे स्वार्थाचे आणि दुटप्पी राजकारण आम्ही विसरू शकत नाही. केसरकर हे निष्क्रिय आमदार आणि मंत्री आहेत, त्यांना पुढे संधी देणं हे महायुतीसाठी देखील अपशकून ठरेल. निवडणुकीच्या घोषणेची तारीख जवळ आली तशी केसरकरांची घोषणाबाजी सुरु झाली. गेल्या दहा वर्षात २ कोटीची गुंतवणूक ज्यांना आणता आली नाही ते केसरकर चक्क इंडस्ट्रीयल हब तयार करायला निघालेत यासारखा दुसरा विनोद नाहीय. आडाळी एमआयडीसी फुल करून आता त्यांना माटणेत एमआयडीसी आणायची आहे. २०११ मध्ये उद्योगराज्य मंत्री सचिन आहीर ना माटणेत आणून मिनी एमआयडीसी चे गाजर दाखवले होते. पण येथे १०० एकर शासकीय जागेचा जावाईशोध त्यांना कसा लागला हेही हसायस्पद आहे. त्यानंतर आम्ही तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे आडाळी एमआयडीसी चा २०१३ मध्ये प्रस्ताव दिला. अवघ्या आठ महिन्यात त्यांनी २८८ हेक्टर जागेवर एमआयडीसी मंजूर केली. आणि केसरकारांची माटणे एमआयडीसी मात्र अद्याप घोषणेतच अडकली आहे. केसरकरांची घोषणा म्हणजे वांझोट्या बाता अशी स्थिती बनली असून ते स्वतः मतदार संघात एक चेष्टेचा विषय बनले आहेत. त्यामुळे आमदारकीचा निरोप घेताना आता त्यांनी नको त्या फंदात पडू नये.