जिल्हयामध्ये प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
18 वर्षावरील नागरिकांना मिळणार बीसीजी लस
आरोग्य विभागाची मोहिम जिल्ह्यातील आठ तालुक्यात लसीकरण सुरुवात
सिंधुदुर्गनगरी
क्षयरोग दुरीकरण करण्याचे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने 18 वर्षावरील जोखमीच्या गटातील लोकांना बीसीजी लस देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात साठ वर्ष वय असलेली व्यक्ती, बी एम आय 18 पेक्षा कमी असणे, मधुमेही व्यक्ती, स्वयंघोषित सध्या किंवा पूर्वी धुम्रपान करणारे व्यक्ती, जानेवारी 2021 पासून सक्रिय टीबी रुग्णांच्या संपर्कात असणारे जवळील सहवासित, मागील 5 वर्षात टीबी झालेल्या व्यक्ती अशा सहा निकषात बसणाऱ्या 60 हजार 942 पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई रुपेश धुरी यांनी दिली आहे.
संपुर्ण महाराष्ट्रत 2025 पर्यंत क्षयरोग दुरीकरण करण्याचे राष्ट्रीय ध्येय ठेवले आहे. त्या अनुषंगाने राज्य क्षयरोग विभाग, लसीकरण विभाग व आयसीएमआर यांच्या वतीने बीसीजी लसीकरण जिल्हयातील आठ तालुक्यात सुरु करण्यात आले आहे. बीसीजी लस ही लहान मुलांप्रमाणे प्रौढांसाठीही उपयुक्त ठरत असुन इतर आजांरांविरोधातही लस परिनामकारक ठरल्याचे संशोधनातुन सिध्द झाले आहे. त्यामुळे जिल्हयातील 60,942 लाभार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे. मात्र ही लस ऐच्छिक असुन ज्यांनी संमती दिली त्यांनाच ती दिली जाणार आहे. यासाठी टीबी विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली असुन त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबाजावणीसाठी सर्व खाजगी, सरकारी यंत्रणेने एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. जिल्हा क्षयरोग अधिकरी डॉ. हर्षल जाधव यांनी लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हास्तरावरुन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे तसेच लसीकरणाकरिता सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
या लसीचा कोणताही दुष्परिणाम आढळून आलेला नाही. भारतामध्ये 1971 पासुन सार्वत्रिकरित्या लहान बाळांना जन्मतः लगेचच लसीकरण देण्यात येते. जेणेकरुन सदर बाळांना भविष्यामध्ये क्षयरोग होऊ नये. तथापि 18 वर्षानंतर लसीचा परिणाम कमी होऊ शकतो, म्हणून 18 वर्षावरील जोखीम असणाऱ्या व्यक्तीना ही लस देण्याचे शासनाचे उदिदष्ट आहे. भविष्यामध्ये जोखीम असणाऱ्या लोकांना क्षयरोगापासून संरक्षण मिळावे यासाठी आपल्या जवळच्या लसीकरण सत्रामध्ये जाऊन ही लस टोचून घ्यावी असे आवाहन जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी केले आहे. आज अखेर जिल्हयात एकूण 21,155 लाभार्थ्यांना ही लस देण्यात आली असुन अजुनही उर्वरित लाभार्थ्यांना लस देण्याचे कार्य चालू आहे.
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, बँकेचे पासबुक, पेन्शन दस्तऐवज, कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र दाखवून बीसीजी लस घेता येवू शकते.