You are currently viewing सावंतवाडी मतदारसंघात मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या सौ.अर्चना घारे- परब निश्चित

सावंतवाडी मतदारसंघात मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या सौ.अर्चना घारे- परब निश्चित

*विधानसभा रणसंग्राम*

*सावंतवाडी मतदारसंघात मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या सौ.अर्चना घारे- परब निश्चित*

*चिपळूण आणि सावंतवाडी राष्ट्रवादी(श. प.) गटाकडे; सावंतवाडीची जागा केली प्रतिष्ठेची*; *राष्ट्रवादीचे बडे नेते शनिवारी सावंतवाडीत..*

काँग्रेस पक्ष फुटून राष्ट्रवादी अस्तित्वात आल्यानंतर सावंतवाडी मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला..! सावंतवाडी मधून प्रथम राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले निवडून आले होते, त्यानंतर नाम.दीपक केसरकर यांनी सावंतवाडीची जागा राष्ट्रवादीकडे राखली होती. परंतु दीपक केसरकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्यानंतर सावंतवाडीचे तत्कालीन आमदार असलेले दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि तेव्हापासून केवळ सावंतवाडीतच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीला उतरती कळा लागली, आणि राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात तिसऱ्या नंबर वर फेकला गेला. त्यानंतर काही वर्षे राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळाले नाही परंतु गेल्या पाच सात वर्षात पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असलेल्या आणि सावंतवाडीच्या सुकन्या सौ. अर्चना घारे परब यांच्याकडे पक्षाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली, त्यानंतर घारे परब यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
गेली पाच-सहा वर्षे राष्ट्रवादी पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढविण्यासाठी सौ. अर्चना घारे परब यांनी सामाजिक कार्य करत लोकांच्या जवळ जाण्याचा, जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सौ. अर्चना घारे परब या यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक घराघरात पोहोचल्या आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी सावंतवाडी मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अर्चना घारे परब यांच्या नावाची घोषणा केली.
चिपळूण आणि सावंतवाडी हे दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रतिष्ठेचे बनविले आहेत. त्यामुळे सावंतवाडी मतदार संघाची निवडणूक म्हणजे रणभूमी असेल की काय अशी शंका मतदार बंधू भगिनींना पडली आहे.
राष्ट्रवादी पक्षातून दीपक केसरकर यांनी बाहेर पडून शिवबंधन बांधले, त्यावेळी शरद पवार यांच्यावर असलेला आपला राग व्यक्त करताना दीपक केसरकर यांनी शरद पवार यांना कात्रजचा घाट दाखविणार असे विधान केले होते. पुढे त्यांनी एकहाती निवडणूक जिंकून पवारांच्या राष्ट्रवादीला जिल्ह्यातून जवळ जवळ हद्दपारच केले होते. त्यामुळेच राष्ट्रवादी शरद पवार गटाने कोकणातील दोन जागा आपल्यासाठी मागून घेताना चिपळूण आणि सावंतवाडी विधानसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनविली आहे. त्याकरिता राष्ट्रवादी पक्ष आपली संपूर्ण ताकद सावंतवाडी मतदार संघात लावणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपले वलय निर्माण करणाऱ्या दीपक केसरकर यांच्या समोर कडवे आव्हान निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते पाच ऑक्टोबरला सावंतवाडीत दाखल होणार आहेत. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भव्य जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेनंतर दीपक केसरकर यांच्या विरोधात अर्चना घारे परब अशी थेट लढत असल्याचे चित्र पहायला मिळणार आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आल्याने निवडणुकीची संपूर्ण तयारी केलेल्या सौ.अर्चना घारे परब यांनी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून माघार घेतली होती. परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दुसरे कोणीही सावंतवाडी मतदारसंघात लढण्यास इच्छुक नसल्याने आणि गेल्या पाच सात वर्षांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सावंतवाडी मतदारसंघात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मतदार संघातील घराघरात पोहोचलेल्या सौ. अर्चना घारे परब यांना ही निवडणूक जिंकणे फारसे अवघड जाणार नाही असे चित्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सौ अर्चना घारे परब यांच्या पाठीशी संपूर्ण ताकतीनिशी उभा राहणार आहे. त्यामुळे सौ.अर्चना घारे परब यांची उमेदवारी नाम. दीपक केसरकर यांना अवघड जागेवरच दुखणं ठरण्याची शक्यता आहे.
दीपक केसरकर सावंतवाडी मतदार संघातून गेल्या तीन टर्म मध्ये सहज निवडून आले होते. मागच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप असा तीन पक्षाचा प्रवास एका रात्रीत करणारे माजी आमदार राजन तेली यांनी नाम.दीपक केसरकर यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले होते. परंतु गेल्या पाच वर्षात राजन तेली जरी उमेदवारीसाठी प्रयत्न करत असले तरी मतदारसंघातील अडचणींच्या वेळी आणि विकास कामांकरिता मतदार संघात फारसे फिरताना दिसले नाहीत. त्यामुळे राजन तेली यांना अपक्ष म्हणून जरी उभे राहिले तरी मतदार किती प्रमाणात स्वीकारतात हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये दीपक केसरकर शिवसेना (शिंदेगट) पक्षाकडून सावंतवाडी विधानसभेच्या रणमैदानात उतरले तर नक्कीच नारायण राणे यांची साथ त्यांच्या पाठीशी असणार आहे. परंतु भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.रवींद्र चव्हाण आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये फारसे सख्य नसल्याने नाम.रवींद्र चव्हाण युतीचा धर्म पाळून कुठंपर्यंत दीपक केसरकर यांच्या पाठीशी उभे राहतात आणि मतदारसंघात त्यांचा प्रचार करतात यावरच तसेच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आणि उबाठा शिवसेनेमध्ये बंडखोरी होऊन शिवसेना उमेदवार मैदानात उतरला तर दीपक केसरकर यांच्या विजयाचे गणित सोपे होणार आहे. बंडखोरीमुळे विजय हा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा इतिहास आहे.
दीपक केसरकर यांच्या पाठीशी भलेही मतदार संघातील जनता ठामपणे उभी राहिली तरी, केसरकर यांचा विजय हा भाजप पक्षामधील अंतर्गत मतभेद आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता यावरच जास्त अवलंबून आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा