बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रास लागले नाहीत..

बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रास लागले नाहीत..

ट्रम्प यांचे ‘झुंड’ सरळ अमेरिकेच्या संसदेत घुसले. त्यांनी संसदेवर हल्ला केला. अमेरिकेच्या संसदेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. हे धक्कादायक आहे. अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल! असे म्हणत सामना अग्रलेखातून शिवसेनेने मोदींना टोला लगावला आहे.

*वाचा आजचा सामना अग्रलेख*

अमेरिकेच्या लोकशाहीचे पुरते वस्त्रहरण झाले आहे. अमेरिका कालपर्यंत जगाला लोकशाही आणि मानवतेचे धडे देत होती. जगातील लोकशाहीचे एकमेव रखवालदार म्हणजे ‘चौकीदार’ आम्हीच आहोत अशा थाटाचे त्यांचे वर्तन होते.

इराकपासून लिबियापर्यंत अनेक सार्वभौम देशांतील लोकशाही धोक्यात आल्याचा कांगावा करायचा. तेथील सद्दाम हुसेन, कर्नल गदाफींसारखे राज्यकर्ते लोकशाहीची हत्या करीत असल्याचा खटला उभा करायचा व त्या देशांतील लोकांना चिथावणी द्यायची. तेथील सैन्यात विद्रोह निर्माण करायचा. एखादे बंड घडवून सद्दाम, गदाफींना ठार मारायचे व त्या देशाच्या रक्तरंजित लोकशाहीचे आपण मालक बनायचे, हा खेळ अमेरिका वर्षानुवर्षे खेळत आहे. त्याच अमेरिकेतही लोकशाही तकलादू आहे व त्या देशातही प्रे. ट्रम्पसारखे सत्तापिपासू लोक आहेत हे जगाने पाहिले.

प्रे. ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने त्यांना सत्ताभ्रष्ट केले. ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमधील कारकीर्द म्हणजे चोवीस तास चालणाऱ्य़ा माकडचेष्टाच होत्या. त्या माकडचेष्टांचा अंत लोकशाही मार्गाने झाला. पण ट्रम्प हे सहजासहजी सत्ता सोडायला तयार नाहीत असा अंदाज व्यक्त झाला. तो शेवटी खराच ठरला. त्यांनी निवडणूक यंत्रणेवर हेराफेरीचा आरोप केला. ट्रम्प न्यायालयात गेले. तेथेही त्यांना फटकारले गेले. मात्र आता असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे की, निवडणुकीचा निर्णय फिरविण्यात यावा यासाठी प्रे. ट्रम्प यांनी यंत्रणेवर दबाव आणला. भ्रष्टाचाराचे मोह निर्माण केले, पण यापैकी एकही यंत्रणा ट्रम्प यांना बधली नाही. ट्रम्प यांनीच नेमलेले हे सर्व लोक होते. पण त्या सगळ्यांनी अमेरिकेच्या संविधानाशीच आमची बांधीलकी असल्याचे स्पष्ट केले. हे सर्व प्रयोग कोसळले तेव्हा एखाद्या गुंडाप्रमाणे ट्रम्प यांनी लोकांना चिथावणी दिली. ट्रम्प यांचे ‘झुंड’ सरळ अमेरिकेच्या संसदेत घुसले. त्यांनी संसदेवर हल्ला केला.

अमेरिकेच्या संसदेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. हे धक्कादायक आहे. अमेरिकेच्या संसदेत जो हिंसाचार घडला त्याबद्दल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव दुःख व्यक्त केले आहे. मोदी म्हणतात, वॉशिंग्टनमध्ये दंगल आणि हिंसेच्या बातम्या पाहून मी व्यथित झालो आहे! सत्तेचे सहजपणे आणि शांतीपूर्ण पद्धतीने हस्तांतर होणे गरजेचे आहे. लोकशाही प्रक्रियेला विकृत करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही!! आमच्या पंतप्रधानांची वेदना समजून घेतली पाहिजे; पण या भयंकर ट्रम्पच्या गळ्यात गळे घालून कालपर्यंत जगातले अनेक राज्यकर्ते फिरत होते. इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन हे तर प्रे. ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा असे सांगत जगभर फिरत होते. ट्रम्प हा शांततेचा पुतळा आहे असे जॉन्सन साहेबांना का वाटावे? या शांततेच्या पुतळ्याने भाडोत्री गुंड लोकशाहीच्या मंदिरात घुसवून अतिरेकी कारवायाच केल्या. अमेरिकन संसदेतील गोळीबारात चार लोक मेले आहेत. अमेरिकेवर ‘9/11’चा हल्ला झाला. तो अतिरेकी व दहशतवाद्यांनी घडवला. त्या हल्ल्यातून अमेरिका उभी राहिली. त्या हल्लेखोर ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून मारले व पाताळात गाडले. पण प्रे. ट्रम्प यांनीच लादेनचा वारसा चालवत अमेरिकेच्या संसदेवर हल्ला घडवून आणला आहे.

 

प्रे. ट्रम्पसारखे लोक राज्यकर्ते म्हणून निवडून दिले जातात ही मोठी शोकांतिका आहे. खोटी आश्वासने, फसव्या घोषणा, भरपूर थापा व माकडचेष्टांना लोक भुलतात व चूक करून बसतात. त्याचीच किंमत आज अमेरिका चुकवत आहे. जो बायडेन हे अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. बायडेन यांना सत्ता हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ट्रम्प समर्थकांनी धुडगूस घातला. यावर जो बायडेन म्हणतात, ‘आजचा धुडगूस म्हणजे खरी अमेरिका नव्हे. हे धुडगूस घालणारे आंदोलक देशद्रोहाच्या उंबरठ्यावर आहेत.’ बायडेन यांचे म्हणणे बरोबर आहे. पण त्या देशद्रोहींच्या झुंडशाहीचे नेतृत्व स्वतः अमेरिकेचे अध्यक्षच करीत होते. या अध्यक्षांना काय शासन करणार? मुळात ट्रम्पसारख्या उन्मादी, मस्तवाल, चारित्र्यहीन माणसाची निवड राष्ट्राध्यक्षपदी होणे हीच अमेरिकन लोकशाहीसाठी दिवाळखोरी होती. पण सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या ट्रम्प यांना अकलेशी वैरच होते. प्रे. ट्रम्प हे अतिश्रीमंत भांडवलदार आहेत, पणपैसा आहे म्हणून अक्कल येतेच असे नाही.

 

याच ट्रम्प यांच्या उपस्थितीत ‘हाऊ डू मोदी’सारखे सोहळे अमेरिकेत पार पडले. ते कमी पडले म्हणून आपल्या अहमदाबादेत 50 लाख लोकांना जमवून ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाची सलामी देण्यात आली. ट्रम्प यांचे वर्तन व बोलणे हे सुसंस्कृत माणसासारखे कधीच नव्हते. त्यांचा सार्वजनिक वावर हा शिसारी आणणाराच होता. अशा माणसासाठी मोदी सरकारने अहमदाबादेत लाल गालिचे अंथरले होते. हा समस्त गुजराती बांधवांचा, गांधी, सरदार पटेलांचाच अपमान आहे. बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रास लागले नाहीत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांनी गुजरातेत नेऊन मिरवले. त्या चिनी राष्ट्राध्यक्षाने आता लडाखमध्ये त्यांचे सैन्य घुसवले. ट्रम्प यांना अहमदाबादेत नेले, त्यांनी येताना कोरोना आणला व आता लोकशाहीची सरळ हत्याच केली.

आमचे परराष्ट्र धोरण हे प्रवाहपतित होत आहे. भुलभुलैयाच्या मोहात पडून नुकसान करून घेत आहे. त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. ट्रम्प यांनी आता सत्तेचे हस्तांतरण करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजे जगावर मोठे उपकारच केले म्हणायचे! हिंदुस्थानातील लोकशाहीकडून अमेरिका, ब्रिटनने धडे घ्यायला हवेत. निवडणुकीत पराभव होताच इंदिराजी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा प्रत्येक नेत्याने शांतपणे सत्तेचे हस्तांतरण केले आहे. उद्या मोदींचा पराभव लोकशाही मार्गाने झाला तर तेसुद्धा त्याच परंपरेचे पालन करतील. म्हणून प्रिय मित्र असूनही ट्रम्प यांच्या झुंडशाहीचा धिक्कार पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. अमेरिका व हिंदुस्थानच्या लोकशाहीत साम्यस्थळे नाहीत. विसंगतीच जास्त आहे. आमच्याकडे निवडणुकांत पराभव होऊ नये यासाठीच हिंसाचार, धर्मद्वेषाचे राजकारण पेटवले जाते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना हतबल केले की त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची वेळच येत नाही. प्रे. ट्रम्प हे आमच्या देशात येऊन काय शिकले? अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल!

प्रतिक्रिया व्यक्त करा