You are currently viewing सावंतवाडीत सुपरकिंगचे तरुणाईला आकर्षण

सावंतवाडीत सुपरकिंगचे तरुणाईला आकर्षण

*सावंतवाडीत सुपरकिंगचे तरुणाईला आकर्षण*

*ऐतिहासिक सांस्कृतिक शैक्षणिक वारसा असलेल्या शहराची वाटचाल कोणत्या दिशेने..?*

सावंतवाडी हे पुण्यश्लोक बापूसाहेबांच्या पुण्याईने ऐतिहासिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून गणले जात आहे. सर्वच बाबतीत सावंतवाडी शहर हे पूर्वीपासूनच सुधारित शहर म्हणून ओळखले जाते. सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांमुळे सावंतवाडी शहराकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काहीसा वेगळा होता. त्यामुळेच शांत सुसंस्कृत शहर म्हणून सावंतवाडीची अवघ्या महाराष्ट्रात ओळख आहे. परंतु गेली काही वर्षे शहरात सुरू असलेले दारू, जुगार, आणि मटका सारख्या उद्योगांमुळे शहराचे भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे आशेने पाहिले हाते त्या शहरातील तरुणाईची वाताहत झाली आहे. अवैध धंद्यांच्या आहारी गेल्याने चांगल्या उच्चभ्रू घरातील तरुण मुले देखील चुकीच्या मार्गावर गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऐतिहासिक, शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहराची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे..? असा प्रश्न साहजिकच सावंतवाडीवासियांच्या मनात उत्पन्न होत आहे.
एकीकडे प्रतिष्ठित लोकांचे वास्तव्य असलेलं, राजघराण्याचे कवच लाभलेलं शहर म्हणून सावंतवाडीकडे पाहिले जाते आहे. महाराष्ट्राचे शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री नाम.दीपक केसरकर यांचा मतदारसंघ म्हणजे सुसंस्कृत, सुशिक्षित लोकांचा वरदहस्त लाभलेलं शहर..तर दुसरीकडे सावंतवाडी शहरात दारूचे अवैद्य धंदे, पाणंद, आमराई, डोंगर आदी ठिकाणी जुगाराचे फड बसतात…आणि कहर म्हणजे शहरातील ८०% टपरी वजा स्टॉल मध्ये कोणताही माल विक्रीला जात नाही तिथे केवळ आणि केवळ मटका हा उद्योग पाळेमुळे खोलवर रोवून ताठ मानेने उभा आहे. जिल्ह्यात उभारलेला छत्रपतींचा पुतळा वर्षाच्या आत पडतो परंतु मटका सारख्या अवैध धंद्यांवर खाकी वर्दीचा हातोडा कधीच पडत नाही किंबहुना हा मटका उद्योग कधीही बंद पडत नाही.. आणि खेळणाऱ्यांची कमी नाही. त्यामुळे कधीही बंद न पडणारा उद्योग म्हणून अनेक धंदेवाईक, राजकारणी लोकांनी मटका उद्योगात करियर करण्याचे ठरवून खाकिला हाताशी धरत मटका सावंतवाडीत सर्वात जास्त उलाढाल असलेला उद्योग बनला आहे. सावंतवाडी शहरात आता तब्बल ६ मटका कंपन्या कार्यरत आहेत त्यात कल्याण, मेन बाजार (मुंबई) आणि आता नव्यानेच बाशिंग बांधून मंडपात प्रवेशकर्ता झाला तो म्हणजे सुपरकिंग..!
सुपर किंग मटक्याचे तरुणाईला विलक्षण आकर्षण असून तरुणाई सुपर किंग मटक्याच्या पूर्णपणे आहारी गेलेली आज सावंतवाडी शहरात जिकडे तिकडे दिसत आहे. त्यामुळे हा मटक्याचा बाजार सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. हा बाजार म्हणजे कमी वेळेत जास्तची उलाढाल. कुडाळ, गोवा येथूनही मटक्याचे पैसे सावंतवाडी बाजारात येत आहेत. त्यामुळे एका दिवसात सावंतवाडी मध्ये मटका बाजाराची लाखोंची उलाढाल होत आहे. यात सुपर किंग मटका खेळणारे तरुण हे साधारणपणे ३० वर्षाच्या आतील आहेत. जी पिढी आज कमावते हात बनणे आवश्यक होती तीच पिढी सहज पैसा उपलब्ध होतो या उद्देशाने मटक्याच्या आहारी गेलेली पाहायला मिळते. शिक्षक शिक्षिका आणि सरकारी नोकरदार वर्ग असणारी दाम्पत्ये नोकरीला असल्यावर घरात एकटे दुकटे असणारे तरुण सहजपणे गल्लीत जिकडेतिकडे दिसणाऱ्या मटका टपरीकडे आकर्षित होतात. त्यामुळे मटका हा तरुणाईच्या भवितव्यावर लागलेला डाग असल्याचे बोलले जात आहे.
मटक्यामुळे टपरी वाले पोट भरतात, घरसंसार चालवतात पण याच व्यवसायात नवनवीन फंडे आणून नव्या पिढीला बरबादीच्या मार्गावर नेण्याचे काम साहजिकच मटका घेणारे आणि मटका किंग करत आहेत. ज्या मुलांचे आईवडील सरकारी नोकरदार आहेत अशा मुलांना कर्जाच्या स्वरूपात लाखोंची उधारी दिली जाते आणि अवैध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना अडकवले जाते. कारण मटका वाल्यांना खात्री असते की बदनामीच्या भीतीपोटी आपले पैसे बुडणार नाहीत. मुले अडचणीत सापडली की, सरकारी नोकरी करणारे आई बाप व्याजासहित ते कर्ज फेडतात आणि विषय मिटवतात.. प्रतिष्ठा जपण्यासाठी चिडीचूप राहतात, त्यामुळे मटका वाल्यांचे फावले आणि राजरोसपणे सावंतवाडी शहरात मटका उद्योग फोफावला असून खुलेआम सुरू आहे.
वर्षभरापूर्वी सावंतवाडीत चरस गांजा विकणारे अमली पदार्थांचे रॅकेट पकडण्यात आले होते. त्यावेळी शहरात गर्द सहज मिळते अशी वल्गना करण्यात येत होत्या. पुढे अमली पदार्थ विकणारे रॅकेट पकडले गेले असल्याचे बोलले गेले परंतु पकडलेल्या आरोपींचे पुढे काय झाले..? त्यांना कुठे ठेवले..? शिक्षा झाली का..? हे मात्र आजपर्यंत गुलदस्त्यात राहिले आहे. परंतु आजही सावंतवाडी शहराच्या शेजारील घाट मार्गाने उतरल्यावर जाणाऱ्या हायवेवरील गावातून अमली पदार्थांचा व्यापार होत असल्याचे हळूहळू बोलले जात आहे. उत्तरेकडील राज्यातील लोकांना हाताशी धरून अमली पदार्थांचा व्यवसाय केला जात असल्याचे देखील बोलले जात असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळेच शहरातील बरीच मुले अवैध्य धंद्यांकडे आकर्षित होऊ लागली आहे. अवैध व्यवसायात अडकणाऱ्या या मुलांना पोलिसांची देखील भीती राहिली नसून ते पोलिसांसोबत चांगले संबंध राखून फिरत असतात. परिणामी वरवर सुसंस्कृत सुशिक्षित दिसणारी तरुण पिढी अवैध्य धंद्याच्या चिखलात खोलवर रुतत चालली आहे…आणि मायबाप हताशपणे पाहत बसले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा