*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम गझल रचना*
*वृत्त अनलज्वाला*
गझल
*गांधी…!*
विचारांतुनी खोट्या बाजू सरले गांधी
नोटेवरचे खोटे खोटे जपले गांधी
सत्य अहिंसा परमोधर्मच जीवन सूत्री
सन्मार्गावर गेले ज्यांना कळले गांधी
सत्ताधारी गांधी नामे उपक्रम घेती
एका दिवसा करीता मुखी उरले गांधी
सत्तेसाठी धर्म नि जाती जळत ठेवल्या
ध्येयामध्ये कधी कुणाच्या दिसले गांधी?
गांधीवाद नि गांधी तत्वे ज्ञान पुस्तकी
विकत घेतली मते पाहुनी तुटले गांधी
सत्याग्रह हे शस्त्र दुधारी घातक होते
कुणापुढे ना लाचारीने झुकले गांधी
काळानुसार वैचारिकही बदल पाहिले
कधी महात्मा अन् खलनायक बनले गांधी
उंची कपडे ऐटित नेते पाहुन सदनी
पंचा नेसुन पुतळ्यामधुनी हसले गांधी
विचार त्यांचे उच्च राहणी साधी होती
मरणोत्तरही विचारांमधे जगले गांधी
© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६