– विजय वडेट्टीवार
मुंबई
जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 2 हजार 192 कोटी 89 लाख 5 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत 2 हजार 297 कोटी 6 लाख रूपये नोव्हेंबर 2020 मध्ये वितरीत करण्यात आले होते . तर आता दुसऱ्या हप्त्यापोटी 2 हजार 192 कोटी 89 लाख 5 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी रु.10 हजार प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रती हेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत.
या बाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती श्री वडेट्टीवार यांनी दिली.