You are currently viewing साकव्य प्रमुख साहित्यिक श्री.पांडुरंग वसंत कुलकर्णी यांना “युवा ध्येय” चा राज्यस्तरीय “ध्येय जीवनगौरव २०२४” पुरस्कार

साकव्य प्रमुख साहित्यिक श्री.पांडुरंग वसंत कुलकर्णी यांना “युवा ध्येय” चा राज्यस्तरीय “ध्येय जीवनगौरव २०२४” पुरस्कार

*सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी प्राप्त झाला पुरस्कार*

 

नाशिक:

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.अध्यक्ष, साहित्यिक तथा उद्योगपती श्री.पांडुरंग वसंत कुलकर्णी, नाशिक यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी ध्येय उद्योग समूहाच्या ध्येय युवाचा “राज्यस्तरीय ध्येय जीवनगौरव २०२४” पुरस्कार प्राप्त झाला आहे. उद्या बुधवार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी महाकवी कालिदास नाट्यमंदिर, शालिमार, नाशिक येथे सकाळी १०.०० वा. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दिनकर टेमकर, मा.शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या हस्ते व ज्येष्ठ संपादक व लेखक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.उत्तम कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. यावेळी लेखक व मोटिवेशन ट्रेनर श्री.दिनेश आदलिंग, मा.शिक्षण अधिकारी अरुण धामणे, परशराम पावसे, सुनील बेणके, श्रीकृष्ण कुलकर्णी, शिक्षण तज्ञ संदीप वाकचौरे, ह. भ. प. डॉ. टि.के. सदगीर, मा.दिलीप बिन्नर, व कार्यक्रमाचे निमंत्रक, संपादक युवा ध्येय तथा अध्यक्ष युवा उद्योग समूह श्री लहानु निवृत्ती सदगिर उपस्थित राहणार आहेत.

श्री.पांडुरंग कुलकर्णी हे अभियंता असून त्यांनी १७ वर्षे आतंरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये जनरल मॅनेजर, डायरेक्टर आदी पदांवर नोकरी केली आहे. नोकरी मध्ये राजीनामा देऊन उर्वरित काळ त्यांनी स्वतःच्या पाच कंपन्या स्थापन करून उद्योगपती म्हणून नावलौकिक मिळविला आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी व्यवसायातून निवृत्ती घेत साहित्य क्षेत्रात स्वतःला वाहून घेतले. जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचची स्थापन करून त्या माध्यमातून निःशुल्क कार्यशाळा घेत अनेक साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून दिले. सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय काम करताना गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक मदत केली आहे. विविध संस्थांमध्ये ते अध्यक्ष, तसेच सदस्य म्हणून कार्यरत आहेत. वारकरी, शेतकरी अशीही त्याची दुसरी ओळख असल्याने सामन्यातील असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांना परिचित आहेत.

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी युवा उद्योग समूहच्या युवा ध्येयचा राज्यस्तरीय ध्येय जीवनगौरव पुरस्कार २०२४ त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा