You are currently viewing सिंधुदुर्गच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला भ्रष्टाचारामुळे लागले बदनामीचे ग्रहण..?

सिंधुदुर्गच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला भ्रष्टाचारामुळे लागले बदनामीचे ग्रहण..?

संपादकीय….

*सिंधुदुर्गच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला भ्रष्टाचारामुळे लागले बदनामीचे ग्रहण..?*

*सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील राडा जबाबदार कोण..?*

*सिंधुदुर्गात बाऊन्सर संस्कृती आणली कोणी..?*

कोकणचा कॅलिफोर्निया होईल एवढं अलौकिक सौंदर्य कोकणात आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा तर कोकणच्या शिरपेचातील मुकुटमणी म्हणायला हरकत नाही. परंतु सिंधुदुर्गातील पर्यटन केव्हा वाढणार ज्यावेळी सिंधुदुर्गात शांतता असेल तेव्हाच..! सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला परंतु गेली काही वर्षे जिल्ह्याला राडा संस्कृतीचे लागलेले ग्रहण आज देखील सुटले नाही आणि आता तर राडा करण्यासाठी म्हणा किंवा मोठेपणा मिरवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने उदयास आली ती बाऊन्सर संस्कृती..! सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील आजचा झालेला राडा हा देखील बाऊन्सर आणून जिल्ह्यातील कंत्राटदारांवर दबावतंत्राचा वापर केल्यानेच झाला असे प्रथमदर्शनी दिसतं आहे. कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी तसा आरोप देखील केल्याचे दिसून आले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम खात्यात आज सावंतवाडी पंचायत समितीच्या ई टेंडर पद्धतीने पार पडलेल्या निविदा प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र जमा करून घेण्याची तारीख/वेळ दिली होती. एक कोटीच्या वरील निविदा प्रक्रियेमध्ये टेंडर भरलेल्या व्यक्तींकडून ऑफलाईन पद्धतीने सर्व कागदपत्र जमा करून घेतली जातात असं अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कापडणीस यांनी सांगितले आहे. परंतु यावेळी टेंडर मॅनेज केले जाते की काय..? असा गैरसमज झाल्याने पुढील राडा प्रकरण झाले, यात सरकारी कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही किंवा सरकारी मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले. एकीकडे त्यांनी म्हटले की सदर प्रकरण सावंतवाडी पंचायत समिती निविदेवरून घडलं असावं आणि शेवटी ते असेही म्हणतात की सदर राडा आणि सावंतवाडी पंचायत समितीच्या निविदेचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नक्की काय म्हणायचे आहे..? हेच समजत नाही की, त्यांना कोणीतरी शिकवून पत्रकारांना उत्तर देण्यास सांगण्यात आले..? याचाही बोध होत नाही. झालेल्या प्रकाराबद्दल लोकप्रतिनिधींनी तक्रार दाखल केल्याचे सांगताना घडलेला प्रकार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात घडल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने काय कारवाई केली..? याबाबत देखील काही उत्तर मिळालेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम खाते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेपासून आजपर्यंत विविध समस्यांमुळे लोकांच्या रडारवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले नाम.रवींद्र चव्हाण हेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असून आणि रवींद्र चव्हाण यांनी एका दैनिकाला बांधकाम खात्यावर होत असलेल्या आरोपाबद्दल खरमरीत मुलाखत दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात राडा झाला. त्यामुळे अनेक शंका कुशंका घेत सार्वजनिक बांधकाम खाते म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण की काय..? असा प्रश्न अनेकांच्या मनात उत्पन्न होऊ लागला आहे.
भारताच्या इतिहासात घडली नाही अशी राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा दुर्घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडणे हे दुर्दैवी आहे. परंतु त्यातून कोणताही बोध घेतला नसल्याने कोकण रेल्वेच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण ही देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली कामे भ्रष्टाचाराच्या, गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. कुडाळ रेल्वे स्टेशनवर लागलेल्या गळती मुळे युवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्लास्टिक कापड बांधून निदर्शने केली. केवळ वरवर मुलामा देऊन विविध प्रकारच्या लाईट लावून एखादा एअरपोर्ट असल्यासारखी चमक कामांना आणली गेली पण कामे आतून पूर्णपणे भ्रष्टाचाराने पोखरलेली असल्याचे जोरदार आरोप सार्वजनिक बांधकाम खात्यावर होऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्हातील छ.शिवाजी महाराजांचा पुतळा, रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वार सुशोभीकरण कामात गैरव्यवहार, मजूर सोसायटीच्या नावावर बेनामी पोट ठेकेदारी, पावसाळ्यापूर्वी बांधलेले साकव पावसात वाहून जाणे, हायवेची दुरावस्था, अंतर्गत राज्य महामार्ग आदींची झालेली बोगस डांबरीकरण कामे आणि त्यांची परिस्थिती पाहता सार्वजनिक बांधकाम खाते म्हणजे खरोखरच भ्रष्टाचाराचे माहेरघर असल्याची जाणीव जिल्ह्यातील जनतेला होऊ लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभार स्वच्छ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. सावंतवाडीच्या तत्कालीन उपकार्यकारी अभियंता असलेल्या महिलेची सुड भावनेने केली गेलेली बदली, परंतु त्यानंतर त्या महिला अधिकाऱ्याची पुन्हा सावंतवाडीत नियुक्ती झाली होती, आणि त्याच महिलेच्या जागी तात्पुरता कारभार देत आणलेल्या सर्वगुणसंपन्न अधिकाऱ्यांवर स्तुतीसुमने उधळली गेली होती, कार्यालयात येताना खुर्चीला वंदन करून येताना व आपल्या कामाप्रती प्रामाणिक असल्याचे सांगतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता परंतु आज त्याच अधिकाऱ्यावर छ.शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेबाबत आरोप होत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅ.नाथ पै, मधु दंडवते असे देशाच्या संसदेत नावाजलेले नेते होऊन गेले. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंनी देखील पुढे त्यांचा वारसा चालवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले. परंतु देशाच्या राजकारणात आपल्या नावाचा डंका वाजविणाऱ्या या नेत्यांनी कधी बॉडीगार्ड म्हणा किंवा ठेवणीतले नाव म्हणजे बाऊंसर घेऊन फिरले होते का..? नाही ना..!
मग आजच्या नेत्यांना बॉडीगार्ड का लागतात..? बाउन्सर ही फॅशन झाली आहे का..? की मोठेपणा दाखविण्यासाठी बाऊन्सर संस्कृती जोपासली जाते आहे..? की बाउन्सर असल्यावर दादागिरी करून कोणतीही कामं करता येतात..? दबावतंत्र वापरता येतं?
आजकाल जिल्ह्यात उदयास येत असलेली तरुण लोकप्रतिनिधींची पिढी बाऊन्सर घेऊन का फिरते..? असा प्रश्न अनेकांना पडला आहे…आणि या बाउन्सरना पोसायला एवढा पैसा या काल सकाळच्या लोकप्रतिनिधींकडे येतो कुठून..? असे प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये झालेला राडा हा देखील सकाळ पासून बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर खुर्ची टाकून बसलेल्या बाऊन्सरनी केलेल्या दमदाटी व दादागिरीमुळे झाल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे..आणि उबाठा शिवसेनेच्या वैभव नाईकांसह कार्यकर्त्यांनी त्या बाऊन्सरना शर्ट फाटेपर्यंत दिलेला मार ही त्यावरील तिखट प्रतिक्रिया म्हणायला हरकत नाही.. या राड्यामुळे बाळासाहेबांची असलेली शिवसेना अजूनही जिवंत असल्याचे जाणवले आणि बाऊन्सर घेऊन फिरणारे देखील सुरक्षित नाहीत तर बाऊन्सर ही केवळ शायनिंग असल्याचेही अवघ्या जिल्ह्याला समजले.

प्रतिक्रिया व्यक्त करा