You are currently viewing परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई न झाल्यास कायदा हातात घेऊ…

परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई न झाल्यास कायदा हातात घेऊ…

परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई न झाल्यास कायदा हातात घेऊ…

स्थानिक मच्छिमारांचा संतप्त इशारा: मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर दिली धडक..

मालवण

गेले काही दिवस मालवणच्या समुद्रात परराज्यातील हायस्पीड एलईडी ट्रॉलरचा धुमाकूळ वाढला असून अनधिकृत अशा बुल ट्रॉलिंग पद्धतीने होणाऱ्या मासेमारीमुळे मत्स्यसंपदेची लूट होत असून स्थानिक मच्छिमारांच्या बोटींवर चाल करून त्यांच्या समुद्रात टाकलेल्या जाळ्यांचे मोठे नुकसान हायस्पीड ट्रॉलर करत आहेत. यामुळे मच्छिमारांच्या जीवितासही धोका निर्माण झाला असून याबाबत मत्स्य व्यवसाय विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने मालवणातील संतप्त मच्छिमारांनी आज मालवण येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक दिली असता एकही सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने मच्छिमारांच्या संतापात आणखी भर पडली.

यावेळी मच्छिमारांनी मत्स्य विभागाचा निषेध व्यक्त करत परप्रांतीय ट्रॉलर्सवर कारवाई न झाल्यास मच्छिमारांनाच कायदा हातात घ्यावा लागेल, असा आक्रमक इशारा दिला.

मालवणच्या समुद्रात मलपी व इतर ठिकाणच्या परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण वाढल्याने आज मालवण मधील स्थानिक मच्छिमारांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. मात्र त्यावेळी कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने मच्छिमारांनी मत्स्यकार्यालया बाहेर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जगदीश खराडे, भाऊ मोर्जे, जयदेव लोणे, आबा वाघ, सुजीत मोंडकर, बबलु मोंडकर, संघर्ष कोयंडे, आर्यन मालंडकर, अन्वय प्रभु, सन्मेष परब, अमीत कांदळगावकर, रश्मीन रोगे, राजेश कांदळगावकर, महादेव केळुसकर, जिवन भगत, हेमंत मोंडकर, बाबुष डीसोजा, राजा खवणेकर, प्रशांत तोडणकर, विष्णू मालंडकर यांसह अन्य मच्छिमार उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मच्छिमारांनी परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्समुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली. रश्मीन रोगे म्हणाले, परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स येथील समुद्रात बरा वावच्या आतील क्षेत्रात येऊन मासेमारी करत आहेत. या ट्रॉलर्सकडून स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यांची नुकसानी होत आहे, हे ट्रॉलर्स चाल करून येत असल्याने मच्छिमारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मत्स्य विभागाची जुनी गस्ती नौका वेग मर्यादा पाहता कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. मत्स्य व्यवसाय मंत्र्यांनी नवीन हायस्पीड गस्ती नौका देण्याचे सांगितले होते. रत्नागिरीत गस्तीनौका आली. मात्र सिंधुदुर्गात संवेदनशील परिस्थितीत असताना अद्याप गस्तीनौका आली नाही. दुसरीकडे ड्रोन कॅमेरा माध्यमातुन अनधिकृत मासेमारीवर लक्ष ठेवणार असे प्रशासनाने सांगितले होते त्याबाबतही कार्यवाही झाली नाही. लक्ष वेधूनही मत्स्य विभागाकडून कारवाई होत नाही, कारवाई होण्यासाठी मत्स्य विभागाला मच्छिमारांचे बळी पाहिजेत का? असा संतप्त सवाल रोगे यांनी केला.

यावेळी मिथुन मालंडकर म्हणाले, हायस्पीड ट्रॉलर्सच्या अतिक्रमणामुळे स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यात मासे मिळेनासे झाले आहेत. मत्स्य विभागाने या हायस्पीड मासेमारी ट्रॉलरवर कारवाई करावी, या मागणीसाठी आज आम्ही मत्स्य कार्यालयात आलो. मात्र याठिकाणी एकही सक्षम अधिकारी उपस्थित नाही. सुट्टी ण घेताही अधिकारी कार्यलयात उपस्थित नाहीत. मत्स्य व्यवसाय विभाग मच्छिमारांसाठी आहे कि इतर कामांसाठी आहे ? मत्स्य विभागाने मालवणसह सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात होणारी परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी थांबवावी अन्यथा मच्छिमार कायदा हातात घेऊन परप्रांतीय ट्रॉलर्स पळवून लावतील असा इशाराही मालंडकर यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा