You are currently viewing शब्दशृंगार

शब्दशृंगार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्दशृंगार….*

 

शब्दांची ती किमया मोठी शब्द बोलती गोऽऽड

मनात शिरती हृदयी थेटच शब्द किती बिनतोड

गुलूगुलू ते शब्द करती झुला झुलविती मनी

झुल्यावरती शब्द खेळती माझ्या ग अंगणी…

 

प्रिया बोलता शब्द लाजती जमिन उकरती खाली

न बोलता किती बोलती अस्फूट ओठ नि लाली

नयनातून ओसांडून वाहती धारा बनती किती

टपटप टपटप जणू टपकती हिरे माणके मोती..

 

शब्दफुलांची माला अर्पिते कुणी अनुरागिणी

विरही झुरती शब्द किती ते मौनातील विराणी.

बलाकमाला शुभ्र पांढरी अवकाशाच्या पटी

धारा बनूनी ढग बरसती प्रियकराच्या भेटी…

 

गडगड खडखड शब्द गरजती बिजली थरार होते

तिच्या मुखातून जणू बोलती मी येते येते येते

शब्द उनाड ते कुणा दुखवती आसू बनूनी गळती

शब्द जोडती शब्द तोडती ही शब्दांची महती…

 

शब्द बोलती शब्द हासती शब्द रडती गाती

असे उधळती कधी कधी ते मुळी न लागती हाती

गोंजारून ते घेती हृदयी नि:शब्द तिथे मग निजती

कुशीत आईच्या ते शब्द ओसांडून वहाती..

 

किती लिहावे शब्दांना या त्यांच्या वाचून अडते

प्रिया सामोरी येता मग ते हृदयी कसे धडधडते.

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा