*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री सौ सरिता परसोडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धुंद झाली निशा*
पान्हावल मन माझं गंधाळली दिशा
रातराणीसवे आज धुंद झाली निशा..
इंद्रधनुचा रंग आज सखे सांगून गेला काही
पाखरांचा थवा कुठे कधी दिसलाच नाही
पोपटी त्या हिंदोळ्यावर राघू मैना घेई झोके
त्यांना बघताच चुके माझ्या हृदयाचे ठोके
सोनेरी ती छटा लेऊन आली पश्चिम ती दिशा..
रातराणी सवे आज धुंद झाली निशा..
तुझ्या आठवांचे गीत फेर धरतात ओठी
वसुधेच्या गालावर तेव्हा लाली आली मोठी
पापण्यांच्या ओलावल्या पुन्हा सख्या कडा
कातरवेळी पारिजात टाकून गेला सडा
दरवळ श्वासातला सांग लपवू मी कसा
राताराणी सवे आज धुंद झाली निशा..
सौ सरिता परसोडकर पुसद✍🏻