You are currently viewing महाराष्ट्राची भुलाबाईची गाणी

महाराष्ट्राची भुलाबाईची गाणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*

 

*महाराष्ट्राची भुलाबाईची गाणी*

 

भुलाबाई ची गाणी हा शब्द ऐकल्याबरोबर, छान जरीचं

परकर पोलकं घातलेली,पाठीवर लांब दोन वेण्या,रंगीत रिबन बांधलेली, बुचाच्या फुलांची वेणी बनवून ती, वेणीवर माळलेली, हातात टिप-या, चपटा पण मोठा डबा, अर्थात घरोघरी मिळणा-या खाऊसाठी , घेऊन फिरणारी माझी मीच मला दिसू लागली.

 

तेव्हा शाळा अकरा ते पांच होती . त्यामुळे लवकरच घरी येऊन छान तयार होऊन आम्ही वाड्यातल्या मैत्रीणी, एकमेकींकडे,नी जवळ रहाणा-या शाळेतील मैत्रिणीकडे भुलाबाई ची गाणी म्हणत फिरत असू. भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा ( कोजागिरी पौर्णिमा)

असा महिनाभर हा गाण्यांचा सोहळा चाले. भुलाबाई म्हणजे शंकर पार्वतीची मातीची मूर्ती सुंदर मूर्ती!

पितृपक्षात एकीकडे घरची मोठी माणसं,पितरांचे स्मरण करीत श्राद्ध तर्पण करीत असतांनाच आम्ही मुली भुलाबाई ची भाद्रपद पौर्णिमेला स्थापना करीत असू. मूर्ती

छान मखरात बसविली जाई. मागे मोठा आरसा लावला जाई. धूप दीप ओवाळले जाई. देवीला ही बुचाच्या फुलांची वेणी घातली जाई. गाणी म्हणून झाली की,आवडता, खाऊ ओळखण्याचा कार्यक्रम चाले. श्री बालाजीचि सासू असे पहिल्यांदाच म्हटले जाई. प्रत्येक अक्षर हे खाऊचे नांव आहे. यातला खाऊ नसेल तर बंद डब्याचा वास घेऊन,डबा वाजवून खाऊ ओळखला जाई. खाऊ ओळखून झाला की तोच प्रसाद म्हणून मिळत असे की लगेच पुढचे घर गाठले जाई. खूप मजा यायची. सगळी गाणी तेव्हा पाठ होती. कोजागिरीला तर आई अकरा खाऊ करीत असे. पण त्या दिवशी खाऊ ओळखायचे नाहीत. नैवेद्य दाखवून तसाच मिळत असे. महिनाभर नुसती आम्हा मैत्रीणींची धूम चाले. खूप मज्जा यायची.

 

भुलाबाई ची गाणी म्हणजे त्या काळच्या कौटुंबिक सामाजिक, परिस्थितीचा आरसाच होता. घेणारा त्यातून बोध ही घेत असे. घराघरांतून सुनेला,सासुरवाशिणीला कसा त्रास दिला जाई यांचे मजेशीर वर्णन असे. सासूची त्रास

देण्याची वृत्ती,दिराचा खट्याळपणा,नणंदेच्या आगाऊपणा तर सास-याची प्रेमळ वृत्ती गाण्यातून दिसून येई असं सासर द्वाड ग बाई, कोंडोनिया मारीतं ,असं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं. असं सासर माहेरतला फरकही दाखविला जाई. त्याकाळी खूप लहान वयात,खेळण्याच्या वयांत मुलींची लग्न होतं असत. लहान वयांत संसाराची जबाबदारी येऊन पडत असे.ती खेळण्याला,मजा करायला वंचित होत असे. नी म्हणून तिला सासर नको वाटते हेच या गाण्यातून सांगितले आहे.नी ते बरोबरही होते. नंतरच्या काळात यांत सुधारणा झाली ती या लोकगाण्यातील संदेशामुळेच!

 

सा बाई सू बाई सा बाई सू, जाईच्या मांडवात महादेवा तू! एकेक फुलांची नावं घेत, गाणं वाढवत न्यायचं! सगळ्या फुलांची छान ओळख होते.

यादवराया राणी रूसून बैसली कैसी? सासुरवाशी घराला येईना कैसी? मग सासू दीर,नणंद सगळे समजावयास जातात,एकेक दागिना द्यायला बघतात पण ती येत नाही पण पती छानसं मंगळसूत्र घेऊन आणायला गेल्यावर मात्र खुशीखुशीत घरी येते. स्त्रीसाठी ,पत्नीसाठी त्याकाळी पतीदेव ,नवरा किती महत्वाचा होता हेच यांतून अधोरेखित होतंय. .येथून दाणा पेरत जाऊ माळीयेच्या दारी हळूच गुलाबाई पाय टाका, साखळ्या तुमच्या भारी….असे एकेक अवयवांचे नांव नी त्यांच्याशी निगडित अ सलेला दागिना असे गाणे तयार होते. त्याकाळचे असे विविध ,वजनाने भारी दागिन्यांचे वर्णन ऐकून, पारंपारिक दागिन्यांची ओळख तर होतेच,नी आर्थिक परिस्थितीचा अंदाजही बांधता येतो.

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता ,गुलोजीला मुलगा झाला ,नांव ठेवा दत्ता., अशाप्रकारे यमक जुळवित गाणे म्हटले जाई. या विवीध गाण्यातून छान शालजोडीतील चपराक दिली जाई. अशी अनेक प्रकारची समाज प्रबोधन करणारी ही गाणी म्हटली जात. सासुरवाशिणीच्या भावभावनांचे प्रगटीकरण यांतून दिसून येते. तिचं भावविश्व कसं पतीभोवतीच फिरत रहात होतं याचं चित्रीकरण स्पष्ट दिसतंय. मुलं पती ,संसार. यांतच ती मनाने भावनेने गुंतत असे.‌

पुढे काळ बदलला, बालविवाह ही बंद झाले. स्त्री शिकली,संवरली अर्थार्जन करू लागली. करिअरिस्ट झाली ,तिला स्वातंत्र्यही मिळाले. पण अजूनही ब-याच अंशी तिचं घर, तिचा संसार, तिची मुलंबाळं, तिचं सासु सास-यासहीत कुटुंब या भोवतीच तिचं भावविश्व गुंफले जातंय. नी भारतीय समाजांच हेच वैशिष्ट्य आहे. कुटुंब व्यवस्थेला आपण टिकवून ठेवलंय नी त्यात स्त्रीचा मोठा वाटा आहे. . नी या व्यवस्थेतच आपलं सामाजिक बळ आहे,प्रगती साधली जातेय.

हेच भारतीय समाजाच मर्म स्थान आहे,हो न!

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा