*पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याआधीच्या पालकमंत्र्यांवर त्या अधिकाऱ्याकडून पैसे घेतल्याचे अप्रत्यक्षरित्या केले आरोप- आमदार वैभव नाईक*
*रविंद्र चव्हाण यांनी त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून निलंबन का केले नाही?*
*तत्कालीन पालकमंत्री आता सत्तेत असल्यामुळेच अधिकाऱ्यावर कारवाई टाळली का?*
*आमदार वैभव नाईक यांचा सवाल*
जिल्हा परिषद प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दर महिन्याला १० कोटी रुपये मिळवून देण्याची खुली ऑफर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. पालकमंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्याची बदली करून त्याचे दुकान बंद केल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यावरून याआधीचे पालकमंत्री नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर, आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या अधिकाऱ्याचे दुकान सुरु ठेवले होते आणि त्यांच्या कार्यकाळात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप रविंद्र चव्हाण यांनी याआधीच्या पालकमंत्र्यांवर केला आहे. त्यामुळे रविंद्र यांनी भ्रष्टचाराचा चेंडू आता तत्कालीन पालकमंत्र्यांच्या दिशेने टोलावला आहे. मात्र रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील पुतळ्यात आणि नौदल दिनानिमित्त जिल्हानियोजन मधून खर्च झालेल्या निधीत भ्रष्टाचार झाला त्याचे काय? असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले जर संविधानिक पदावर असलेल्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना जर एखादा अधिकारी ऑफर देत असेल तर त्या अधिकाऱ्याची केवळ बदली करण्यापेक्षा त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या अधिकाऱ्याला निलंबित का केले नाही? त्या अधिकाऱ्याचे दुकान सुरु ठेवणारे तत्कालीन पालकमंत्री आता सत्तेत असल्यामुळे अधिकाऱ्यावर कारवाई टळली का? त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालून रविंद्र चव्हाण यांनी अप्रत्यक्षरीत्या भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्याचेच काम केले. प्रशासनाला लागलेली अशा अधिकाऱ्याची कीड समूळ नष्ट करणे गरजेचे होते. आताही वेळ गेलेली नाही त्या अधिकाऱ्याचे नाव रविंद्र चव्हाण यांनी जाहीर करून त्या अधिकाऱ्याची ईडी चौकशी लावली पाहिजे जेणेकरून भ्रष्टाचार उघड होऊन कोणकोणत्या पालकमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्याकडून पैसे मिळवले हे जनतेसमोर येईल.
माजी पालकमंत्री नारायण राणे, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आणि माजी पालकमंत्री उदय सामंत हे सध्या विद्यमान पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासमवेत सत्तेत आहेत. रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे तत्कालीन पालकमंत्र्यांच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होते. अशा भ्रष्टाचारामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. केवळ ठेकेदारांच्या सोयीची कामे मंजूर करण्यावर भर दिला जातो. लोकांचे प्रश्न सोडविले जात नाहीत, जनतेला न्याय मिळत नाही म्हणून जनता दरबारात प्रश्नांची सरबत्ती होते.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पुतळ्याची जबाबदारी आपली नसून नौदलाची आहे असे त्यांचे म्हणणे असेल तर पुतळ्याच्या कामाची आणि परिसर सुशोभीकरणाची गुणवत्ता का तपासली गेली नाही? ती जबाबदारी पालकमंत्री म्हणून त्यांची नव्हती का? जर यात त्याचा आणि त्यांच्या विभागाचा संबंध नव्हता तर पोलीस स्टेशनमध्ये पालकमंत्र्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तक्रार का केली. ती तक्रार नौदल अधिकाऱ्यांकडून का करण्यात आली नाही? कोणत्या आधारावर आणि कोणत्या अनुभवावर २४ वर्षीय जयदीप आपटेला पुतळ्याचे काम देण्यात आले. राणेंसोबत जयदीप आपटेचे फोटो आहेत त्यामुळे त्यांच्या शिफारशीनुसार पुतळ्याचे काम देण्यात आले का? त्याचबरोबर पुतळा कोसळण्याच्या संवेदनशील विषयात पोलिसांनी केलेली कारवाई जनतेसमोर का आणली नाही? जयदीप आपटे याने काय जबाब दिले ते जनतेसमोर येणे गरजेचे होते. पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती तर नौदल दिनाचा खर्च देखील नौसेना करते मग जिल्हानियोजन मधून जिल्ह्याच्या विकासाला आलेला ५.५ कोटी रु. निधी त्यासाठी का खर्च करण्यात आला? मात्र हे सर्व गुप्त ठेवून कोणाला वाचविण्याच्या प्रयत्न होत आहे असे अनेक प्रश्न माझ्याच नव्हे तर प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात आहेत. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला हे आता समितीच्या अहवालात देखील उघड झाले आहे. मात्र शिंदे- फडणवीस सरकारच घटनाबाह्य असल्याने ते भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणार नाहीत. हा विषय भरकटवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टचार करणाऱ्यांना जनतेने कायमस्वरुपी घरी बसवावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.