*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*भारताची प्रगती व जगातील स्थान..*
लोकांनी लोकांसाठी स्थापन केलेली जगातील
सर्वात मोठी व टिकून राहिलेली लोकशाही
म्हणजे भारत किंवा हिंदुस्तान होय. या भारत
भूमीचा पूर्वेतिहास पाहता अतिशय सुखी समृद्ध
व सुसंस्कृत अशी ही भूमी होती. काठीला सोन्याचे घुंगरू बांधून भारतभर फिरता येत असे, असे म्हणतात. सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात. थोडक्यात खाऊनपिऊन लोक सुखी होते. कशाची ददात नव्हती. भारतभर
गुरूकुलातून उत्तम शिक्षण मिळत होते. वेद
उपनिषदे यावर भर होता. रामायण महाभारत
ग्रंथांचा प्रभाव व भक्तिभाव होता.
मुस्लीम आक्रमणे झाली नि सारीच परिस्थिती बदलली. प्रजा हतबल व असुरक्षित झाली.
शेतजमीन,अब्रूचे व मंदिरांचे धिंडवडे निघाले. सुरक्षितता पूर्ण लयाला जाऊन दिवाभीताचे
जगणे नशिबी आले.जलमी मुगल सत्तेने नाड्या
आवळल्या व जीवन मुष्किल झाले.
हळू हळू शिवनेरीवर आशेचा सूर्य उगवला. नव्या पहाटेची चाहूल लागली.आशा पल्लवित
होऊन शौर्य व पराक्रमाची परिसीमा होऊन
छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य स्थापन होऊन जीवनाला स्थैर्य येते न येते तोवर पाश्चिमात्य
ढग आकाशात गर्दी करू लागले, पेशव्यांच्या
अटकेपार झेंड्याला इंग्रजांचे ग्रहण लागले आणि त्यांच्या कवायती सेनेने किमया करून
भारतभर एकछत्री अंमल सुरू झाला. गुलामीचे
महाभयंकर संकट कोसळले. सारीच स्वातंत्र्ये
गहाण पडली ती दिडशे वर्षे.
स्वातंत्र्य संग्राम चालला. अनेक हुतात्मे बळी
गेले. आपण स्वतंत्र झालो पण मनाची गुलामी
इंग्रजांनी आमच्यात मुरवली. आमची गुरूकुले
मोडित काढली व सरकारी (बाबू)गुलाम निर्माण केले. प्रचंड अज्ञान दारिद्र्य होते. आमचे प्रजासत्ताक स्थापन होऊन आम्ही आमच्या घटनेत काम करू लागलो. गेल्या साठ वर्षात जगा बरोबर आम्ही पण थोडे थोडे पुढे येत राहिलो. प्रगती झाली नाही असे नाही.अडथळे लोकसंखेचे होते, आहेत, राहणार आहेत.मुख्य प्रश्न खरे तर तोच आहे.अडथळे त्यामुळेच येतात. प्रयत्न करूनही पाहिजे तेवढे यश जगाच्या तुलनेत पदरात पडत नाही.
दुसरी गोष्ट राष्ट्रनिष्ठा जिचा आमच्यात प्रचंड
अभाव आहे. ( इतर देशातले लोक लोकल मधील कुशन फाटलेली दिसली की स्वत: सुई
दोऱ्याने शिवतात, आम्ही आतला फोम ओढून
पिशवित भरून घरी आणतो, किंवा मरू दे
आपल्याला काय करायचे आहे म्हणत दुर्लक्ष
करतो. एवढे एकच उदा. पुरेसे आहे.)
पण आता सध्या मात्र परिस्थिती आमुलाग्र
बदलू पाहते आहे. यंत्रयुगाने चांगलीच पकड
घेऊन नव्या पिढीचेही डोळे उघडले आहेत.
मोबाईल क्रांतीने जग मिनिटाच्या अंतरावर
आले आहे. घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.
व गेल्या ८/१० वर्षात सक्षम नेतृत्वाच्या अधिपत्याखाली भारताने जगात अव्वल स्थान
पटकवून भारत एक महासत्ता बनतो आहे. जगात आजुबाजूला भयावह परिस्थिती असून
काही देशांची कमालीची वाताहत होऊन ते देश
भिकेला लागले तर काही भारताच्या सर्वांगीण
प्रगतीकडे व नेतृत्वाकडे पाहून भितीने कासवा
सारखे पाय आत घेऊन शांत बसले आहेत. आक्रमक व सतत आमची सीमा धगधगती
ठेवून आमचे जवान नाहक मारणारे देश भयभीत झाले आहेत की सर्जिकल स्ट्राईकने
शत्रू आपल्या स्वयंपाक घरात केव्हा घुसेल
याचा नेम नाही याची त्यांनी चांगलीच दखल
घेतली आहे. भारताने त्यांचे दात चांगलेच
त्यांच्याच घशात घातले आहेत.
खरे तर भारताला शत्रू आता देशातलेच आहेत
ते घरभेदे. भारताचे अन्न खाऊन नीच कृत्य
करणारे. आपली पूर्ण एकी झाली व सर्व भेदभाव विसरून सर्वांनी फक्त राष्ट्रहित ही
एकच गोष्ट ध्यानी धरली तर आपण एक नंबरवर जाऊ शकतो. पण आमचीच डोकी
ताळ्यावर नाहीत. आमच्यात काही दम नाही
व ज्याच्यात दम आहे त्याला आम्ही कामच
करू देत नाही, पाठींबा देत नाही, सतत कुरापती काढून पाय खेचण्याचे काम मात्र
आम्हाला उत्तम जमते. घरादारी असे महाभाग
मोठ्या प्रमाणावर आहेत जे निगेटिव्ह उर्जा निर्माण करून कायम लोकांची दिशाभूल करतात. अशा संधीसाधू लोकांचे प्रमाण भयावह आहे. स्वार्थाची पोळी भाजण्यात व
वारा येईल तिकडे तोंड फिरवण्यात हे लोक
अत्यंत वाकबगार आहेत व हेच खरे देशाचे
शत्रू आहेत. ह्या महाभागांची टाळकी ठिकाणावर येऊन ते नुसते शांत राहिले तरी देशाचे कल्याण होईल हे शंभर टक्के सत्य
आहे.भारताची घोडदौड आता अशीच चालू
राहील यात शंका नाही. आज भारताकडे
वाकडा डोळा करून पाहण्याची कोणाची
हिंमत नाही हे आपण अफगाण व युक्रेन रशिया युद्धात डोळ्यांनी पाहिले व नुकतेच
बांगलादेश मध्ये ही. जगभराचे नेते आता, जे
पूर्वी दखलही घेत नव्हते ते आता भारताच्या
पुढे पुढे करत आहेत. आपल्या उदार व उदात्त
संस्कारानुरूप आपण कायमच मदत करण्यात
तत्पर असतो मग ते संकट कुठलेही असो.
आजही पोलंडमध्ये जामनगरचे राजे दिग्विजय
सिंह यांच्या नावाने सांसद शपथ घेतात या पेक्षा कोणता मोठा पुरावा भारताच्या दातृत्वा
विषयी द्यावा?
विघातक शक्तिंना प्रोत्साहन न देता त्यांची नांगी ठेचण्याचे काम एक उत्तम देशभक्त म्हणून आपण केले पाहिजे ते आपले प्रथम
कर्तव्य आहे. आपल्या घरानंतर प्रथम आपला
देशच आहे हे लक्षात ठेवा नाही तर पश्चातापाशिवाय हाती काही हाती राहणार
नाही. म्हणून बसल्याजागी फक्त बोटे मोडण्या
पेक्षा ह्या बोटांचा व मनगटाचा देशहितासाठी
वापर करू या हेच इतिहासाचेही मागणे आहे.
चला तर मग.. प्रगतीकडे जाणाऱ्या आपल्या
राष्ट्राला, मायभूमीला अधिक प्रगतीकडे नेऊ
या व आपल्या भावी पिढ्या सुरक्षित करू या.
धन्यवाद …
(आणि हो.. ही मते फक्त नि फक्त माझी आहेत. सहमतीची अपेक्षा नाही.)
आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)