“पर्यंटन जिल्ह्यांची ऐशीतैशी”…
…. ॲड. नकुल पार्सेकर, सचिव
पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला दक्षिण कोकणातील कॅलिफोर्निया म्हणजे आमचा सिंधुदुर्ग. विपुल नैसर्गिक संपदा आणि जैवविविधता यांनी श्रीमंत असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग,कोकणी मेव्याची अवीट गोडी दक्षिण देणारा आमचा सिंधुदुर्ग, अस्सल मालवणी माशांच्या कालवणाने तृप्त करणारा सिंधुदुर्ग, नावाजलेले नाटककार, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि समाजकारणी देशाला देणारा सिंधुदुर्ग आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे छञपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारे गडकोट ज्या जिल्ह्यात आहेत असा हा पराक्रमी आणि स्वाभिमानी लोकांचा सिंधुदुर्ग…
पण ज्या पर्यंटन जिल्ह्याची पर्यंटन विषयक टिमकी गेल्या २८ वर्षापासून वाजवली जाते त्याचे नेमकं वास्तव हे या जिल्ह्यातील प्रत्येक राजकारण्याला विचार करायला लावणारं आहे. १९९७ रोजी सेना भाजपच्या सरकारच्या काळात स्व. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे उभारलेल्या शामियान्याच्या व्यासपीठावरून तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. गोपनीथजी मुंडे व तत्कालीन पालकमंत्री आणि कोकणचे जांबांज नेते नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या देशातील पहिला पर्यंटन जिल्हा म्हणून ऐतिहासिक घोषणा झाली. सुमारे अठ्ठावीस वर्षानंतर या जिल्ह्याचा खरोखरच पर्यंटनाच्या द्रुष्टीने विकास झाला का ❓मुळात राजकीय नेत्यांनी पर्यंटन म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे याचा अभ्यास केला का ❓या जिल्ह्यातील पर्यंटन हे फक्त आणि फक्त मालवण शहरापुरतेच स्तिमित राहिले. अर्थात त्याला मा. राणेसाहेबांचे योगदान जसे महत्त्वाचे आहे तसेच त्या शहराला निसर्गाने दिलेले वरदान आणि अर्थातच छञपती उभारलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला त्यामुळे देशभरातून दरवर्षी या जिल्ह्यात येणाऱ्या लाखो पर्यंटकांपैकी ऐंशी टक्याहून जास्त पर्यंटक हे चिवला बिच, तारकर्ली, देवबाग आणि मालवण शहरालाच प्राधान्य देतात. मालवण सोडून जिल्ह्यात इतर तालुक्यातही पर्यंटकाना आकर्षित करणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
देवगड मध्ये स्वच्छ समुद्रकिनारे, शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेले कुणकेश्वर मंदिर, वेंगुर्ला तालुक्यातील वेळागर,शिरोडा, आरवली, सागरेश्वर हा संपूर्ण भाग पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. दोडामार्ग तालुका हा तर नैसर्गिक साधनसंपत्तीची खाण आहे. त्याच जतन आणि संवर्धन करायचे सोडून मायनिंग व भूमाफियांच्या अभ्रद युतीने निसर्गाचे लचके तोडण्याचे काम केले. भौतिक सुखाच्या मागे लागून राजकीय वरदहस्त असलेले अनेक विरप्पन बेसुमार बेकायदेशीर वृक्षतोड करून निसर्गाचे चक्र बिघडवत आहेत.
तिलारी धरण आणि त्या भोवतीच्या परिसरात पर्यंटनाचे अनेक प्रकल्प करणे सहजशक्य आहे मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि श्रेयवादाचे घाणेरडे राजकारण यामुळे हा जिल्हा समस्यांच्या गर्दीत ढकलला गेला आहे.
निवडणूका जवळ आल्या की कोटींची उड्डाणे होतात. एवढ्या छोट्या जिल्ह्यात पाचशे बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासारखं काम या जिल्ह्यातील एकाही नेत्याला का करता आल नाही? आजही पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो बेरोजगार युवक युवतींना सीमेलगतच्या गोवा राज्यात राञी अपराञी का जाव लागत? पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणारे आणि शाश्वत विकास साधणारे अनेक प्रकल्प आणणे सहज शक्य आहे… पण आपले राजकारणी हे तीनशे पासष्ट दिवस फक्त टक्केवारीच आणि निवडणुकीच राजकारण करणाऱ्यात मश्गुल आहेत.
नाही म्हटल तर नारायणराव राणे यांनी याबाबत आपला व्हेटो वापरुन थोडेफार प्रयत्न केला होता. ते काँग्रेसच्या सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री असताना सि वर्ल्ड हा या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा प्रकल्प आणला होता. यासाठी सुरूवातीला तब्बल शंभर कोटींची तरतुदीही केली होती … पण माशी शिंकली… आणि हा सुद्धा प्रकल्प श्रेय वादाच्या राजकारणात अडकला. या प्रकल्पात एवढी ताकद होती की सिंधुदुर्ग पर्यंटन द्रुष्टीने जगाच्या नकाशावर गेल असत.
आंबोली हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले हिल स्टेशन जे सावंतवाडी मतदारसंघात येत ज्या मतदारसंघाचे नेतृत्व गेली तब्बल पंधरा वर्षे मा. दिपक केसरकर करत आहेत…आणि पुन्हा चौथ्यांदा निवडणूकीच्या बोहल्यावर चढणार आहेत. काय परिस्थिती आहे आज आंबोलीची? स्वतःकेसरकरानीच आंबोली येथे पर्यंटन विकास महामंडळाच्या वतीने सुरु केलेल्या सुविधा केंद्राची काय परिस्थिती आहे. सावंतवाडी शहरातही त्यांनी सुरु केलेले अनेक प्रकल्पही धुळ खात आहेत.
शाश्वत विकास करायचा असेल तर या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुशल महिला वर्गाला ताकद दिली पाहिजे म्हणूनच या देशाचे उर्जामंत्री असताना मा. सुरेश प्रभू यांनी बचत गटांची संकल्पना राबवली होती… पण या उद्देशालाच हरताळ फासला गेला. निवडणूकीच्या काळात बचत गटाना पैशाचे वाटप करून त्यांच्या श्रमप्रतिष्ठेलाच तिलांजली दिली. सगळेच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांनी निवडणूक जिंकायचा शाॅटकर्ट अवलंबला असल्याने आणि सरकारनेही या फुकट रेवडीचा मार्ग स्वीकारल्याने जनतेच्या क्रयशक्तीचा बट्याबोळ झाला . जनतेला अपंग बनविण्याची प्रक्रिया सुरु झाली. बेकार तरूणांच्या झुंडी नेत्यांच्या मागून झिंदाबादच्या घोषणा देत फिरत आहेत पण आपल्या पूर्वजांनी कसलेल्या आपल्या काळ्या मातीत कष्टाने सोन उगवण्याचा विचार करत नाहीत हे दुर्दैव आहे.
राजकीय व्यवस्थेतून आणि सत्तेत मिळवलेल्या पैशातून क्षणभर मोठे इव्हेंट करता येतात पण ते अळवावरचं पाणी असत. प्रामाणिकपणे समाजासाठी स्थायी स्वरुपाचे काम केल्यास निवडणूकीत पैशाच वाटप करण्याची गरज भासणार नाही. दुर्दैवाने आज स्व. आप्पासाहेब गोगटे, तब्बल पंचावन्न वर्षे सांगोला विधानसभेचे महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे आदर्श आमदार स्व. गणपतराव देशमुख, बॅ. नाथ पै व प्रा. मधु दंडवते यांचा ज्यानी आदर्शवत वारसा पुढे चालवला ते मा. सुरेश प्रभू, स्व. मनोहर पर्रीकर, मा. विद्यमान केंद्रीय अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक अशी राजकीय दुर्मीळ माणसं दुर्बीणीतून शोधावी लागतील.
आज जागतिक पर्यंटन दिन. निदान आतातरी या जिल्ह्यातील नेत्यांनी श्रेयवादात आणि वैयक्तिक स्वार्थ व हेव्यादाव्यात न अडकता परमेश्वराने या जिल्ह्याला जे मुक्त हस्ते भरभरून दिलेल आहे त्याचा सदुपयोग करुन या जिल्ह्यातील पर्यंटन चळवळीला हातभार लावावा ही या विशेष दिवसाच्या निमित्ताने अपेक्षा…