You are currently viewing रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी झालेली गर्दी मोठ्या अपेक्षेने…??

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी झालेली गर्दी मोठ्या अपेक्षेने…??

*रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी झालेली गर्दी मोठ्या अपेक्षेने…??*

*”आजूनय आमका बांबुळीत होराची सोय करतत, आमच्या सोयसाठी हयसर हस्पिटल कधी करतले..?”*

*मोती तलावाच्या काठावरून……*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी हे संस्थानकालीन शहर आजही जिल्ह्याची सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी म्हटल्यास वावगे ठरू नये.. सावंतवाडी शहरात नाम.दीपक केसरकर यांनी सावंतवाडी महोत्सवाचे आयोजन केले तेव्हापासून तलावाच्या काठावर गर्दीचा उच्चांक अवघ्या जिल्ह्याने अनुभवला होता. दुर्दैवाने गेली काही वर्षे हा तलावाचा काठ माणसांच्या अलोट गर्दीसाठी आसुसलेला होता. कारण केसरकरांची सावंतवाडी नगरपालिकेतील सत्ता गेली तेव्हापासून शहरात तलावाच्या काठावर होणाऱ्या सावंतवाडी महोत्सवाला दृष्ट लागली आणि मनोरंजनाची संध्याकाळ तलाव काठावर रंगायची बंद झाली. सावंतवाडी महोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडीत अशी अलोट गर्दी लोटत होती.. परंतु गुरुवारी सायंकाळी केवळ साध्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर गर्दीचा महापूर लोटला…?
खरंच, अचंबित म्हणा किंवा आश्चर्यचकित करणारा हा प्रश्न अनेकांना पडला असेल… परंतु सावंतवाडी सह आजूबाजूच्या गावातील गोरगरीब जनता या कार्यक्रमासाठी आली(???) ती फक्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी नव्हे तर यापुढे तरी जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारावी या अपेक्षेनेच..!
श्रीमंत शिवरामराजे भोसले पुतळ्यानजीक उभारलेल्या भव्य शामियान्याच्या दोन्ही दिशेच्या रस्त्यावर हजारांच्या संख्येत गावागावातून आलेल्या कष्टकरी, शेतकरी बाया पुरुषांची गर्दी दिसत होती. अनेकांना गावात रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रिक्षा मधून शहरातील डॉक्टरकडे जाण्याचा पर्याय स्वीकारावा लागला असेल, काहींची प्रसूती देखील कधीतरी रिक्षामध्ये, वाटेत, रस्त्यात देखील झाली असेल. कित्येकांना सावंतवाडीत कुटीर रुग्णालयात आल्यावर तातडीने गोवा बांबुळी येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या सूचना केलेल्या आठवत असतील आणि तेव्हा शहरात उपलब्ध असलेल्या खाजगी रुग्णवाहिकेसाठी चार पाच हजार रुपये मोजावे देखील लागले असतील. अशावेळी सावंतवाडी तालुक्यासाठी विशाल परब यांच्या माध्यमातून लोकार्पण होऊन उपलब्ध होत असलेल्या रुग्णवाहिका भविष्यात गोवा किंवा कोल्हापूर येथे रुग्णांना नेण्यासाठी मोफत उपलब्ध होतील अशी आशा वाटली असेल आणि त्यासाठीच रुग्णवाहिकेचे लोकार्पण होताना “याची देही याची डोळा” पाहण्याची संधी मिळते ती घ्यावी अशा दुहेरी उद्देशाने अनेकांनी सावंतवाडीतील रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी हजेरी लावली आणि कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम नसताना देखील लोकांनी अलोट गर्दी केली, त्यामुळे हिम्मत केली अन् ताकद लावली तर लोक येऊ शकतात, फक्त हात वर केला पाहिजे याची शिकवण मिळाली.
खरं पाहता हा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा एखाद्या सरकारी रुग्णालयाच्या आवारात होणे गरजेचे होते. कारण ती रुग्णसेवा आहे, रुग्णांना त्याची जास्त गरज आहे. आजपर्यंत अनेक संस्थांनी, रिक्षा युनियन सारख्या संघटनांनी देखील सावंतवाडी मध्ये रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. परंतु लोकसेवेसाठी रुग्णवाहिका आणताना डोळ्यासमोर रुग्णसेवा हीच प्रामाणिक इच्छा असायची. त्यामुळे रुग्णवाहिका लोकार्पण वगैरे असे साजूक तुपातील नाजूक शब्द कुठेही वापरले गेले नाहीत किंवा त्यांचा गाजावाजा झाला नाही. देणाऱ्या समोर ध्येय चांगले असले की त्याचा लक्ष फक्त सेवेकडे असतो, कुठलाही मेवा मिळविण्याकडे नसतो. त्यामुळे आतापर्यंत कुणाही संस्थेच्या रुग्णसेवेत आलेल्या रुग्णवाहिका या कुणीतरी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीने श्रीफळ वाढवून लोकांच्या सेवेत रुजू झालेल्या आपण पाहिल्या. काहीवेळा तर लोकसेवेत रुजू झालेली रुग्णवाहिका कधी आली याची खबर देखील कुणाला नसते. परंतु सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर आणि खुद्द सावंतवाडीचे राजे ही. हा.श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या साक्षीने झालेला रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा फारच गाजला…आणि सर्वसामान्य सावंतवाडी करांकडून मात्र प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेकांनी रस्ता बंद झाल्याने झालेल्या गैरसोयीवर नाराजी व्यक्त केली, काहींनी आजूबाजूला कोण आहेत हे न पाहता तोंडसुख देखील घेतले. रामेश्वर प्लाझा येथील दुकानदारांचे गेले दोन दिवस धंदा न झाल्याने नुकसान झाले. अशा अनेक समस्यांमुळे काहींनी नाराजी व्यक्त केली.
“रुग्णसेवा म्हणा किंवा जनसेवेसाठी मी काहीतरी करतो आहे” हे दाखविण्याचा अट्टाहास…म्हणजे आजचा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा. या सोहळ्यासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅली करिता गेली १५ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्राचे शिक्षण तथा मराठी भाषामंत्री नाम. दिपक केसरकर हे देखील नाम.रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांच्या सोबत उपस्थित होते हे विशेष. कारण, अलीकडे जिल्ह्यातील राजकीय बातम्या ऐकल्या, वाचल्या की आपल्या लक्षात येते ते म्हणजे नाम.केसरकर आणि नाम.रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये मित्रपक्षांचे सदस्य असतानाही म्हणावी तेवढी जवळीक नाही. किंबहुना रवींद्र चव्हाण यांचे समर्थक संदीप गावडे यांनी तर दिपक केसरकर सहित सर्व शिंदे गटाचे आमदार पाडण्याची केलेली भाषा अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. गेळे प्रकरणात दोन्ही कडून आलेल्या प्रतिक्रिया देखील वाचल्या, ऐकल्या आहेत. त्यामुळे अशा वैयक्तिक कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशाल परब आणि संजू परब हे दोघेही माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या अत्यंत जवळचे…घरातील सदस्य असे म्हटले जाते. मग विशाल परब यांच्या माध्यमातून झालेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात निलेश राणे किंवा राणे कुटुंबातील कोणीही सदस्य उपस्थित का नव्हते..? बॅनर वर फोटोही नाही,हा देखील अनेकांना कोड्यात टाकणारा प्रश्न आहे.
सावंतवाडी तालुक्यासाठी रुग्णवाहिका दिली जाते आहे त्याचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम दूरवरून पाहिला आणि तालुक्यासाठी रुग्णवाहिका मिळाल्याने समाधान देखील व्यक्त केले…पण..,
जाता जाता अनेकांच्या तोंडातून एकच उद्गार येत होते..
*”आजूनय आमका बांबुळीत होराची सोय करतत, आमच्या सोयसाठी हयसर हस्पिटल कधी करतले..?”*
१ मे १९८१ साली म्हणजे तब्बल ४३ वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार राहिलेले नारायण राणे, नाम. दिपक केसरकर, आणि आता नाम.रवींद्र चव्हाण पालकमंत्री राहिलेत. आंगणेवाडीच्या जत्रोत्सव दरम्यान दोन वर्षांपूर्वी *”सिंधुदुर्ग बदलतोय”* असे फलक जागोजागी लागल्याचे आपण जिल्हा वासियांनी पाहिले आणि जिल्हा बदलतोय या आशेवर आजवर दिवस काढलेत…
पण…,
आजही जिल्हावासिय जगण्यासाठी जीव मुठीत धरून प्राण कंठाशी येत असतानाही रुग्णवाहिकेतून गोवा, कोल्हापूर कडे धावताना दिसत आहेत आणि रुग्णवाहिका सेवेत आणून राजकारणी फक्त त्याच धावपळीत भर घालत आहेत…

प्रतिक्रिया व्यक्त करा