You are currently viewing कोव्हॅक्झिन लस निर्माता कंपनी भारत बायोटेक आता देशात लवकरच कोरोनाच्या नेझल स्प्रेची चाचणीही करणार

कोव्हॅक्झिन लस निर्माता कंपनी भारत बायोटेक आता देशात लवकरच कोरोनाच्या नेझल स्प्रेची चाचणीही करणार

कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्याच्या दिशेने दिवसेंदिवस भारत वेगाने पावले टाकत आहे. लसींना मंजूरी मिळून लसीकरणाच्या दिशेने देश वाटचाल करत असतानाच आता आणखी एक खुशखबर मिळाली आहे. कोव्हॅक्झिन लस निर्माता कंपनी भारत बायोटेक आता देशात लवकरच कोरोनाच्या नेझल स्प्रेची चाचणीही करणार आहे.

भारत बायोटेकच्या डॉ. कृष्णा इल्ला यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या कंपनीने वॉशिंग्टन विद्यापीठासोबत करार केला आहे. कोरोनाच्या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. पण नाकावाटे दिली जाणारी ही नेझल वॅक्सीन फक्त एकदाच घ्यावी लागेल. त्यामुळे लसीपेक्षा हा उत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले.

*इंजेक्शन लसीपेक्षा अधिक चांगली*

पुढील दोन आठवड्यांमध्ये नेझल स्प्रेच्या चाचणीला सुरुवात होईल. नाकावाटे दिली जाणारी लस ही इंजेक्शनद्वारे दिल्या जाणा-या लसीपेक्षा अधिक चांगली असल्याचे पुरावे असल्याचेही कंपनीतील अधिकारी डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितले आहे. भारत बायोटेककडून लवकर यासंबंधीच्या चाचणीचा प्रस्ताव डीजीसीआयसमोर ठेवण्यात येणार आहे.

*महाराष्ट्रात २ ठिकाणी चाचणी होणार*

भुवनेश्वर, नागपूर, पुणे आणि हैदराबादमध्ये या लसीच्या चाचणीला सुरुवात होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यासाठी १८ ते ६५ वर्षांपर्यंतच्या ४० ते ४५ स्वयंसेवकांची निवड केली जाणार आहे.

*चेह-यासह संपुर्ण शरीराचे संरक्षण*

कोणताही विषाणू नाकातूनच शरीरात प्रवेश करीत असल्यामुळे नेझल स्प्रेच्या माध्यमातून दिली जाणार लस अधिक परिणामकारक ठरू शकते असा अंदाज आहे. वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधनानुसार नाकावाटे लस दिली गेल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या पद्धतीने विकसित होते. नाकात कोणत्याही पद्धतीचा संसर्गजन्य विषाणू येण्यास यातून रोखता येऊ शकते. इंजेक्शनमुळे मानवाचे संपूर्ण शरीर सुरक्षित होते, असे ठामपणे सांगता येऊ शकत नाही. पण नाकावाटे स्प्रेच्या माध्यमातून लस दिली गेल्यास ती चेह-यासह संपूर्ण शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकते, असे तज्ज्ञांना वाटते.

प्रतिक्रिया व्यक्त करा