…तर जमिनीत घुसून ताबा मिळवू …!
ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा इशारा ; महसूल विरोधातील आंदोलन यशस्वी
दोडामार्ग
सासोलीतील स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करत बेकायदेशीररित्या अकृषक सनद देऊन प्रशासनाला काळिमा फासणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा या मागणीसाठी उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सासोलिवासीयांना घेऊन मंगळवारी दोडामार्ग तहसिल कार्यालयावर मोर्चा नेला.पोलिसांनी हा मोर्चा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अडविला.त्यामुळे पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.अखेर तहसिलदार अमोल पवार यांनी पारकर व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला आत घेत चर्चा केली.यावेळी पारकरांनि उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अधिकारी अनुत्तर झाले.अखेर अकृषिक सनदा रद्द कराव्यात त्या देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि अनधिकृत बांधकाम तोडावे अन्यथा आम्ही त्या जमिनीत घुसून आमच्या जमिनीचा ताबा मिळवू असा निर्वाणीचा इशारा देत आंदोलन मागे घेतले.
सासोली मधील शेतकऱ्यांवर अन्याय करून धनदांडग्या बिल्डर लॉबीला पाठीशी घालणाऱ्या महसुलविरोधात उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी ठरल्याप्रमाणे मंगळवारी आंदोलन केले.या आंदोलनाची सुरुवात दोडामार्ग शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली.त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली.जमीन आमच्या हक्काची , नाही कुणाच्या बापाची , अकृषक सनदा रद्द झाल्याचं पाहिजेत या आणि अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.त्यानंतर हा मोर्चा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडविला.त्यामुळे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी आणि पारकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.