शेतकरी व ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी उद्या होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा – संदेश पारकर
बाबुराव धुरींना आवाहन, दीपक केसरकरांवर टीका…
दोडामार्ग
सासोली येथे घडलेल्या जमीन घोटाळा प्रकरणी उद्या आयोजित करण्यात आलेल्या आंदोलन हे माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी नसून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहे. त्यामुळे सर्वपक्षियांनी आणि सर्व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज येथे केले. दरम्यान या आंदोलनात शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून लोकांच्या प्रश्नासाठी सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
श्री. पारकर यांनी आज येथील सुशीला हॉलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सासोली येथील जमीन परप्रांतीय लॉबीने ग्रामस्थांना फसवून बळजबरीने घेतली आहे. त्या ठिकाणी प्रशासनाने त्यांना सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही योग्य ती दाद मागणार आहोत तसेच त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करणार आहोत. दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित कंपनीने व प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका आम्ही दाखल करणार आहोत. दरम्यान उद्या होणाऱ्या आंदोलनात सर्वांनी सहभाग होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी सर्वांनी एक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यावेळी त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर अकार्यक्षम असल्याची टीका केली. मतदार संघातील प्रश्न असताना ते कधीच सोडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही.