समृद्ध आणि आनंदी जीवनासाठी नैसर्गिक शेतीचा संकल्प करा; ब्रिगे. सुधीर सावंत माजी खासदार
ओरोस :
किर्लोस कृषी विज्ञान केंद्र येथे कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह निमित्त नैसर्गिक शेती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. केंद्र सरकारने कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह कार्यक्रम जाहीर केला आहे. या सप्ताहाचा शुभारंभ किर्लोस कृषि विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष ब्रिगे. सुधीर सावंत माजी खासदार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रिगे. सुधीर सावंत यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी रासायनिक अवशेष मुक्त अन्न निर्मितीसाठी संकल्प करा असे आवाहन केले.
समृद्ध आणि आनंदी जीवनासाठी नैसर्गिक शेतीचा संकल्प महत्त्वाचा असून ही शेती शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्तपणे केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते असे ते म्हणाले. भविष्यात नैसर्गिक शेतीला जागतिक पातळीवर अच्छे दिन येणार असल्याचे ते म्हणाले. किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे नैसर्गिक शेतीमध्ये भरीव योगदान आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.
कृषी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रदीप सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेतीसाठी देशी गाईचे संवर्धन करा व तिच्या शेण आणि गोमूत्रापासून जीवामृत सारखे घटक बनवून शेतात वापरल्यास पिकांचा दर्जा उत्तम प्रकारे वाढतो असे सांगून स्वतःच्या नैसर्गिक शेतीचा अनुभव कथन केला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून आत्माचे प्रकल्प उपसंचालक नामदेव परीट उपस्थित होते. त्यांनी विषमुक्त अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेती हा उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. नैसर्गिक शेतीची उत्कृष्ट कामाबद्दल कृषि विज्ञान केंद्राचे त्यांनी कौतुक केले.
मालवणचे तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती महत्त्व व संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राने संकलित केलेल्या भरडधान्य लागवड तंत्रज्ञान विषयाच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले. कार्यक्रमाच्या शेवटी जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी मानले. सूत्रसंचालन शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत यांनी केले. यावेळी किर्लोस सरपंच श्रीम. साक्षी चव्हाण, मुख्याध्यापक वामन तर्फे, मंडळ कृषी अधिकारी हुसेन आंबाबर्डेकर, कृषी पर्यवेक्षक राणी थोरात, कृषी सहायक स्नेहल जिकमडे, अश्विनी कुरकुटे राधेश्याम डावखोरे आत्माचे अधिकारी निलेश गोसावी, शास्त्रज्ञ विकास धामापुरकर, विवेक सावंत भोसले, सुमेधा तावडे, सिद्धेश गावकर, प्रा. सुभाष बांबुळकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.