मा. शिक्षणमंत्री दिपकभाईंचे अभिनंदन पण…..??
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी जेमतेम साठ दिवसावर येऊन ठेपलीय. प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात विकासाचा रथ वाऱ्याच्या गतीने पळवत आहे. यात आमच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यप्रवण आमदार व विकास पुरुष आणि आमचे परममित्र मा. दिपकभाईं पण आघाडीवर आहेत.
कालच्या प्रिंट मिडियात बातमी वाचली. गेली दहा वर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहतीच्या विकासाची दालने खुली झाल्याची ती बातमी होती. चंदीगड येथील फार्मास्युटिकल कंपनीच्या व महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यासमवेत सदर औद्योगिक वसाहतीची पहाणी करून घोषणा केली की लवकरच या ठिकाणी चंदीगड येथील फार्मास्युटिकल कंपनी सुरू होणार असून सुमारे पाचशे लोकांना रोजगार मिळणार आहे. अवघ्या आठ आणि दहा हजार रुपयांसाठी गोव्यात जीव धोक्यात घालून राञीचा प्रवास करणाऱ्या दोडामार्ग व बांदा परिसरातील बेरोजगारांसाठी मा. मंञ्याच्या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला. याबद्दल मा. दिपकभाईंचे मनापासून आभार आणि अभिनंदन!
या घोषणेनंतर एक सजग सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात एक शंका आहे त्याचे निरसन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी करावे म्हणजे माझा आणि आडाळी वासियांचा संभ्रम दुर होईल.
मुळात सातशेवीस एकर जमिनीत वसणाऱ्या या औद्योगिक वसाहतीला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिरव्या श्रेणीतील (Green category) औद्योगिक वसाहत म्हणून मान्यता दिलेली आहे. या श्रेणीतील प्रदूषण निर्देशांक (PI) हा २१ ते ४० आहे. तर केसरकर यांनी घोषणा केलेला फार्मास्युटिकल्स उद्योग हा सगळ्यात जास्त प्रदूषणकारी असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार त्याचा प्रदुषण निर्देशांक हा ९५ आहे. ६० किंवा त्यापेक्षा जास्त प्रदूषण निर्देशांक असलेले उद्योग हे तांबड्या श्रेणीत (RED CATOGARY) मध्ये येतात. जर आडाळी औद्योगिक वसाहत ही ग्रीन श्रेणीत येत असेल तर मग फार्मास्युटिकल्स हा रेड श्रेणीत येणारा उद्योग कसा काय येवू शकतो?
थोडक्यात निवडणूक आली मतदारांना चष्मे लावून झाले. अत्तराचा सुगंध दरवळला आता ऐन निवडणुकीत औषधांची चव घेऊन बघा…
… अॅड. नकुल पार्सेकर…