You are currently viewing माझी मैत्रीण

माझी मैत्रीण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी मैत्रीण*

 

सध्या गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झालेले आहेत. नुकत्याच महालक्ष्मी माहेरपणाला येऊन गेल्या. त्यांची पूजा अर्चा करताना वर्षभर पुरेल एवढी शक्ती ऊर्जा मिळाली असं वाटतं. पुन्हा आपल्या आपल्या रूटीन कामाला लागायला बळ पुरवणारे हेच ते क्षण जे दोन्ही हात पसरून आपण लुटून घ्यायचे असतात. आपल्या झोळीत सांभाळून ठेवायचे असतात. आपल्या चिंता, आपले कष्ट, आपली दुःख, आपल्या विवंचना असणारच आहेत. त्यांनी तरी कुठे जाव? पण त्यातून सकारात्मक पद्धतीने मार्ग काढायला शिकवणारे हेच ते सण, उत्सव आणि संस्कार असतात. किती किती मागू देवाला असं होतं आम्हा बायकांना, तेही सगळं मुलाबाळांचे, नवऱ्याचं, घराचं चांगलं व्हावं हेच असतं.

खरं तर आपण फक्त स्त्री कधीच नसतो, आपण मुलगी असतो, बहीण असतो, बायको, आई, जाऊ, नणंद, भावजय, सासू आणि किती किती नात्यांनी सर्वांशी जोडलेलो असतो. घराची केअरटेकर आपणच असतो. नोकरी करणारे ही आपणच असतो. मुलांवर संस्कार करणारे ही आपणच असतो. सणवार पाहुणेरावळे सगळं काही सांभाळून तारेवरची कसरत करणारी डोंबारीही आपणच असतो. मग थोडा वेळ थांबून आपल्याच पाठीवर थोपटून शाब्बास ग पोरी म्हणून थाप द्यायला काय हरकत आहे? दररोज येणारे नवीन नवीन अनुभव दुपारच्या किंवा रात्रीच्या एखाद्या निवांत दहा मिनिटाच्या क्षणी लिहून ठेवले तर काय हरकत आहे?

आपल्यातल्या स्त्रीचं जगणं जपायचा प्रयत्न करणं आपल्याला निश्चितच शक्य आहे. फक्त दुःखच उगाळत बसायला पाहिजे, तेच लिहायला पाहिजे मग आपल्याला हलकं वाटेल असेही काही नाही. बस मला आता काय छान वाटते, मला आज काय अनुभव आला,आज कुठली खरी चांगली गोष्ट घडली माझ्या बाबतीत किंवा मी इतरांसाठी एखादी चांगली गोष्ट केली का? एवढी नोंद तर आपण करूच शकतो. बऱ्याच वेळा होतं कसं की या जगण्याच्या धावपळीच्या स्पर्धेमध्ये आपण सगळ्या गोष्टींचा अतिरेक करत राहतो. मी हे पण सांभाळू शकते, मी तेही चांगलं करू शकते, मी इथेही कमी पडणार नाही आणि मी तिथेही उत्तमच करून दाखवीन हा एक वेडा अट्टाहास आजकाल सगळ्याच स्त्रियांमध्ये बघायला मिळतो. यात वाईट काहीच नाही.

आपली जडणघडणच अशी आहे की आपण एकाच वेळी अनेक कामे लीलया उत्तमरीत्या करू शकतो. पण तरी… पण तरी , कुठेतरी स्वतःला लिमिट घालायला शिकायला हव. धावून धावून उर फुटेस्तोवर पळून पळून आपण कितीही गोष्टी साध्य केल्या तरी आपल्या प्रकृतीची त्यात हेळसांड होत नाही ना हे पाहणं हे आपलच काम आहे. जग तुम्हाला गृहीत धरायचं थांबणार आहे का? उलट भित्या पाठी ब्रह्मराक्षस या म्हणीची प्रत्यक्ष पडताळणी हवी असेल तर मग करा खुशाल भिऊन पळून काम.

स्त्रियांनी संघर्ष केला पाहिजे, शिकले पाहिजे, घराबाहेर पडलं पाहिजे अशी वाक्य पूर्वी ऐकवली जायची. आणि खरंच नेहमीच्या आज्ञाधारकपणे खूप मोठ्या संघर्षाने आपण तेही करून दाखवलं. शिक्षणामुळे आपला फायदा तर झालाच शिवाय नोकरी व्यवसाय करायला लागल्यामुळे आपण आर्थिक स्वावलंबी ही झालो. म्हणजेच समाजाच्या संपूर्ण संरचनेत आपले स्थान कुठल्या पायरीवर आहे हेही कळायला लागले. शिकून सवरूनही काही स्त्रियांनी घरी राहणं पसंत केलं. मग त्यांच्याबद्दल चे हेटाळणीचे सूरही ऐकू येऊ लागले. असो, शेवटी मनुष्य स्वभाव आहे.

आपलं दुसऱ्यापेक्षा खूप चांगलं चाललंय हे आवर्जून बोलून दाखवायची सवय तर स्त्रियांना निश्चितच असते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांची पण काही कमी तारांबळ उडत नाही. पण शेवटी प्रत्येकीने आपापले सध्याचे स्टेटस हे स्वखुशीन स्वीकारलेल आहे असे आपण गृहीत धरायचे आहे. आणि ते स्वखुशीन स्वीकारलेलं नसेल तर त्याच्यामध्ये मनासारखा बदल घडवता येईल का हे पाहण्याचा प्रयत्नही करता येतो. मुद्दा हा नाही की तुम्ही पैसे कमावताय आणि घर खर्चाला हातभार लावताय का,,,, मुद्दा हा आहे की तुम्ही आपल्याकडे मुबलक प्रमाणात असलेला वेळ वाया तर घालवत नाही ना?

मुले लहान असताना कुटुंबाकडे लक्ष देणं हे अगदी म्हणजे अगदी योग्यच आहे. पण एकदा मुलं मोठी झाली कर्ती सवरती झाली की त्यांना आपली तितकी गरज उरत नाही. आपण उगाचच हे त्यांच्या हातात नेऊन दे, ते त्यांच्या हातात नेऊन दे असं त्यांच्या मागेपुढे करत वेळ घालवतो. खरंतर हा त्यांचं लक्ष वेधून घेण्याचाच प्रकार आहे. आणि असं करता करता आपण अतिशय जास्त प्रमाणात स्वतःला उपलब्ध करून दिल्यामुळे आपलीच किंमत कमी करत असतो. शिवाय या गोष्टीमुळे घरचे परावलंबी होतात हे आपल्या दृष्टीने चांगले म्हणजे आपले महत्त्व वाढवणारे असले तरी त्यांच्या दृष्टीने तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तोटाच असतो हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून अति तिथे माती असं करायला जाण्यापेक्षा थोडा थोडा वेळ रोजचा स्वतःसाठी काढून आपण थोडं चिंतन मनन लेखन करायला शिकले पाहिजे. थोडा वेळ व्यायामासाठी फिरण्यासाठी देता आला तर उत्तमच. किंबहुना ती आपली स्वतःची जबाबदारी आहे असे समजूनच या गोष्टींचं मॅनेजमेंट केलं पाहिजे.

मध्यंतरी अशीच एक गोष्ट व्हायरल झाली होती की ती स्त्री सगळ्याजणींप्रमाणे धावून पळून प्रत्येकासाठी करता करता इतकी व्यस्त होऊन गेली की तिला फक्त आरशात बघायलाच नव्हे तर स्वतःच्या अगदी महत्त्वाच्या हेल्थ चेक अप साठी टेस्ट साठी सुद्धा वेळ नसायचा आणि त्यातच ती एके दिवशी दुखणं अंगावर झेलत हे जग सोडून निघून गेली. साधारणपणे एक महिन्यानंतर तिच्या मैत्रिणीला परत तिच्या कुटुंबाला भेटायचा योग येतो. तिला वाटलं की आता या लोकांचं सगळं खूप अवघड झालं असेल. ती तिची मैत्रीण तर सगळ्यांचे इतकं करायची की विचारता सोय नव्हती. तिथे पोचल्यावर तिला जेव्हा कळलं की काही नाही थोडे दिवस अडचणीचे गेले. पण मग सासू-सासर्‍यांच्या सेवेसाठी एक नर्स ठेवलेली आहे, झाडलोट आणि बाकीचे घरची काम यासाठी एक बाई ठेवलेली आहे आणि स्वयंपाकासाठी सुद्धा एक चांगला आचारी मिळालेला असल्यामुळे त्या लोकांचे फारसं काही कुठे अडले नाही.

असो, पण यातून मला फक्त एवढंच प्रकर्षाने जाणवलं की आपण हे जे करतो सगळ्यांसाठी त्याची कुठेतरी पोच पावती आपल्याला हवी असते की हा बाई तू हे केलंस, तू किती जीव तोडून करतेस आमच्यासाठी. तुझ्यामुळेच हे सगळं चालू आहे नाहीतर आमचं जगणं शक्य नाही…… वगैरे वगैरे. तर बऱ्याच वेळा या भुलाव्याच्या गोष्टी असाव्यात का, असं वाटतं. या सगळ्यात आपण आपल्या तब्येतीची आहूती देणं थांबवूयात. सांगायचा मुद्दा हा की ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ हे शब्दशः खरं आहे; तेव्हा आपल आयुष्य आपल्याला एकदाच मिळणार आहे हे लक्षात ठेवा. सगळं काही सांभाळत असताना आपण स्वतःलाही सांभाळल पाहिजे. नाहीतर लोकांचं काय ते घोड्यावरूनही जाऊ देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत.

मी, माझी मैत्रीण जेव्हा व्हायला शिकेन तेव्हाच खऱ्या अर्थाने जगायला शिकेन. मी डायरीला माझ्या मनातल्या सुंदर गोष्टी सांगेन, तिला माझी बेस्ट फ्रेंड बनवेन. तेव्हा मी माझी मैत्रीण बनणं हे माझ्यासाठी मला महत्त्वाचं वाटतं आणि मी माझ्याबरोबर माझा वेळ घालवण यापेक्षा सुंदर काही असूच शकत नाही. एक एक ठिपका जोडत मी खूप वेळा रांगोळी काढली. त्यात मनासारखे रंग भरले. स्वतःच्याच निर्मितीवर खूष होऊन आनंदले. अगदी तसंच एक एक डायरीतलं पान म्हणजे माझं दुसरं मनच. जिथे मी स्वतःशी मुक्त संवाद करू शकते. भले त्याचं साहित्यिक मूल्य शून्य असेल , असूदे. कुठे त्याला प्रसिद्धी द्यायची हाव आहे मनाला? मला तर ठिपके ठिपके जोडून रेखाटलेली सुंदर रांगोळी जशी लोभसवाणी दिसते तशीच ही माझी मैत्रीण…माझी डायरी वाटते. मग, आहे ना तुमचीही एखादी अशी खास मैत्रीण? नसेल तर आजच करा आणि ठिपक्यांच्या सुरेख रांगोळीत स्वतःचे रंग भरा… अगदी मुक्तपणे स्वतःच्या अंतरंगात डोकावायला शिका.

 

©®अंजली दीक्षित-पंडित

#अंजली_रविकिरण

प्रतिक्रिया व्यक्त करा