उपपरिवहन अधिकारी विजय काळे यांचे आश्वासन
ओरोस :
रिक्षा तसेच परवानाधारक व्यावसायिकांना पर्यटन व्यवसायासाठी, ऑनलाईन ॲप प्रदर्शित करण्यासाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार, असा विश्वास सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी व्यक्त केला.
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने २७ सप्टेंबरला होणाऱ्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा व्यासायिकांना संघटित करून त्यांच्या ऑनलाईन व्यवसाय वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे रिक्षा व्यावसायिकांसाठी ऑनलाईन ॲप सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपपरिवहन अधिकारी विजय काळे यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेण्यात आली.
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने रिक्षा व अन्य परवाना धारक व्यावसायिकांना ॲप च्या माध्यमातून रजिस्टर केल्यास या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. शासन,व्यावसायिक,पर्यटन महासंघाच्या समन्वयाने ॲप चालल्यास पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यात परिवहन पर्यटन क्षेत्रात योग्य मार्ग बनेल अशी भूमिका पर्यटन व्यावसायीक महासंघातर्फे मांडण्यात आली. विजय काळे यांनी पर्यटन महासंघाच्या या उपक्रमाच्या माहितीसाठी रिक्षा संघटना तसेच अन्य परवानाधारक वाहतूक व्यावसायिकांची आपल्या दालनात बैठक आयोजित करून यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वस्त केले. तसेच सदर ॲपसाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार असलेले स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन २८ वर्षे पूर्ण झाली. जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत.जिल्ह्यतील ग्रामीण पर्यटन वाढीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही रिक्षा व्यावसायिकांची असूनही ऑनलाईन मार्केटिंग क्षेत्रात रिक्षा व्यावसायिक मागे राहिल्याने परवानाधारक रिक्षा व्यावसायिक पर्यटन व्यवसायापासून वंचित आहेत. याचाच विचार करून पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा व्यावसायिक ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून नोंदणीकृत केल्यास जिल्ह्यात पर्यटनासाठी भेट देणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांसाठी व्यावसायिकांचे नंबर उपलब्ध होऊन येणाऱ्या पर्यटकांना परिचित ,अपरिचित पर्यटन स्थळे पाहण्याचे नियोजन करता येईल तसेच पर्यटन स्थळ दरपत्रकही उपलब्ध होईल व सुरक्षित प्रवासाचे माध्यम उपलब्ध होऊन जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी मदत होणारी आहे अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली.
यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे सोशल मीडिया अध्यक्ष किशोर दाभोलकर, सहदेव साळगावकर, रविंद्र खानविलकर, पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर, रामा चोपेड़ेकर , मिलिंद झाड़,श मनोज खोबरेकर, दर्शन वैंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.