You are currently viewing किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी आजपासून होडी वाहतूक सेवा सुरू…

किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी आजपासून होडी वाहतूक सेवा सुरू…

किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी आजपासून होडी वाहतूक सेवा सुरू…

मालवण

नव्या पर्यटन हंगामात येथील किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवेस आजपासून सुरुवात झाली आहे अशी माहिती सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली.
जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात २५ मे ला पर्यटन हंगामाची सांगता झाली होती. गेले तीन महिने बंद असलेले किनारपट्टी भागातील पर्यटन आता सुरू होत असून पर्यटन व्यवसायिकही सज्ज झाले आहेत.
१ सप्टेंबर पासून पर्यटन हंगामास सुरवात होते. मात्र समुद्रातील वाऱ्याचा वेग व पाऊस यामुळे यावेळी उशिराने हंगामाची सुरवात होत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाकरमानी तसेच राज्याच्या विविध भागातून पर्यटकही दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्गला भेट देता यावी यासाठी आजपासून किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे अशी माहिती होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्री सावंत यांनी दिली.
मार्च २०२४ महिन्यात संपलेले परवाना नूतनीकरण करण्यासाठी बंदर कार्यालयाकडून लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये नौकांचा सर्वे अनिवार्य आहे. या सर्वेची फी किल्ला होडी वाहतूक संघटनेच्या सदस्यांनी एप्रिल महिन्यात ऑनलाईन पद्धतीने भरलेली आहे. याची दखल घेत बंदर विभागाने सर्वे बोलावणे आवश्यक होते. मात्र बंदर कार्यालयाकडून अशा प्रकारची कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही येत्या महिन्याभरात सर्व नौका पाण्यात उतरवल्यावर नौकांचा सर्वे आमच्या स्वखर्चाने करून घेऊ. त्या अनुषंगाने आम्ही या हंगामास सुरुवात करत असल्याचे पत्र सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने बंदर निरीक्षकांना सादर करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र वेंगुर्ले येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनाही सादर करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा